Join us  

वजन कमी करायचं तर चालत गाठा हा 'मॅजिक' आकडा, फिटनेसतज्ज्ञ सांगतात- वजन घटणारच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2022 1:11 PM

Walking Certain Steps Daily Help Lose Weight Know What Experts Say Weight loss Tips : रोज किती पावलं चाललो तर आपलं वजन कमी होईल याबाबत...

ठळक मुद्देचालताना किंवा कोणताही व्यायाम करताना आपण काय विचार करतो, आपला सेल्फ टॉक काय आहे हेही वजन कमी होण्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. शरीरातील मांसपेशींमध्ये सुधारणा होण्यासाठी तसेच हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी चालणे उपयुक्त असते. 

वाढतं वजन ही अनेकांपुढील एक मोठी समस्या असते. वजन वाढलं की आरोग्याच्या विविध समस्या तर डोकं वर काढतातच पण आपल्या सौंदर्यातही बाधा येते. त्यामुळे वजन कमी करणे हा सध्या अनेकांपुढील एक मोठा टास्क आहे. एकदा वजन कमी करायचं ठरलं की त्यासाठी व्यायाम, आहार, मानसिकता अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत काम करावे लागते (Weight loss Tips). झटपट वजन कमी करायचे तर कोणता व्यायाम करावा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. मग कधी जीम लावली जाते तर कधी योगा क्लास जॉईन केला जातो. (Benefit Of Walking) रोजच्या धावपळीत यांपैकी काही करायला वेळ नसेल तर आपण सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळी आवर्जून चालण्यासाठी तरी घराबाहेर पडतोच. आता रोज किती पावलं चाललो तर आपलं वजन कमी होईल याबाबतही आपल्या मनात संभ्रम असतात (Walking Certain Steps Daily Help Lose Weight Know What Experts Say). 

वजन कमी करण्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. हा व्यायाम करण्यासाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. तसेच खास जागेचीही आवश्यकता नसते. एखाद्या बागेत किंवा अगदी रस्त्यानेही आपण सहज चालू शकतो. यासाठी पैसेही खर्च होत नसल्याने चालण्याचा व्यायाम करण्याला अनेक जण प्राधान्य देतात. मात्र किती चालले तर आपले वजन कमी होईल हे जाणून घेणे आवश्यक असते. साधारणपणे रोज १० हजार पावलं चालणं वजन कमी होण्यासाठी उपयुक्त असते. प्रत्येक व्यक्तीनुसार याचा परीणाम बदलतो. काहींना १० हजार पावलं चालणे वजन कमी करण्यासाठी पुरेसे असते तर काहींना वजन कमी करण्यासाठी याहून काही पावले जास्त चालावी लागतात. व्यक्तीनुसार कोणत्याही व्यायामाचे स्वरुप ज्याप्रमाणे बदलते त्याचप्रमाणे चालण्याचेही असते.

रोज १० हजार पावले चालण्याचे फायदे 

आता एकदम १० हजार पावलं कसं चालायचं असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल. तर एकदम न सुरू करता हळूहळू चालणे वाढवा. साधारणपणे १ तास चालत असाल तर एकदम इतके चालण्यापेक्षा सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास चाला. म्हणजे चालण्याचा वेळ आणि श्रम विभागले जातील. 

१. चालण्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये नक्कीच सुधारणा होते. 

२. हृदयाचे कार्य सुरळीत राहावे यासाठी चालणे अतिशय उपयुक्त ठरते. हृदयरोग ही अतिशय सामान्य समस्या असून त्यापासून दूर राहायचे असल्यास चालण्याचा व्यायाम नियमितपणे करायला हवा. 

३. उच्च रक्तदाब, डायबिटीस, थायरॉईड यांसारख्या समस्यांसाठीही चालण्याचा व्यायाम अतिशय फायदेशीर ठरतो. 

४. शरीरातील मांसपेशींमध्ये सुधारणा होण्यासाठी तसेच हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी चालणे उपयुक्त असते. 

(Image : Google)

चालण्याबरोबरच याकडेही लक्ष द्या, तज्ज्ञ सांगतात...

चालण्यानी वजन कमी होत असलं तरी तेवढई एकच गोष्ट वजन कमी करण्यासाठी पुरेशी असते असं म्हणता येणार नाही. चालण्याबरोबरच आपलं डाएट कसं आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. याशिवाय Non Exercise Activity Thermogenesis (NEAT) हाही भाग अतिशय महत्त्वाचा असतो. चालण्याशिवाय उरलेल्या वेळेत जी Non Exercise Activity आहे ती कशी आहे हेही पाहणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण १० हजार पावलं चाललो आणि बाकी पूर्ण वेळ बैठं काम असेल तर त्याचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही. याशिवाय आपली मानसिकताही वजन कमी करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. रोज १० हजार पावलं चाललो आणि एखाद दिवस आपल्याला चालायला जमले नाही तर त्याचा ताण यायला नको. नाहीतर नियमितपणे चालूनही त्याचा म्हणावा तसा फायदा होणार नाही. तसंच चालताना किंवा कोणताही व्यायाम करताना आपण काय विचार करतो, आपला सेल्फ टॉक काय आहे हेही वजन कमी होण्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. 

सुचेता कडेठाणकर, योग व फिटनेस तज्ज्ञ 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स