प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरची (Kareena Kapoor) हिची झिरो फिगर पाहून आपल्यातील अनेकींना आपणही तिच्याइतकेच स्लिम फीट असावे असे वाटत असेल. विशेष म्हणजे दोन मुलांची आई झाल्यानंतरही करीनाने आपला हा फिटनेस (Fitness challenge) कायम ठेवला आहे. आता अभिनेत्रींना हे सगळे शक्य असते वगैरे आपल्याला वाटेल. पण ही फिगर काही एका दिवसांत तयार होत नाही तर त्यांनाही यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. करीना कपूर पहिल्यापासूनच फिटनेस फ्रिक असल्याचे आपल्यातील अनेकांना माहित असेल. ती तिचा व्यायाम, डाएट याबाबत बरीच सतर्क असते. विशेष म्हणजे इतर अभिनेत्रींप्रमाणे जीममध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा करीना घरच्या घरी व्यायाम करणे जास्त पसंत करते. यामध्ये ती इतर व्यायामप्रकारांबरोबरच पारंपरिक प्रकारच्या व्यायामाला पसंती देत असल्याचे दिसते.
आपल्या सगळ्यांची लाडकी बेबो सोशल मीडियावरही बरीच अॅक्टीव्ह असल्याने आपल्या फिटनेस रुटीनविषयीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर करत असते. करीनाने बरेचदा १०८ सुर्यनमस्कार (Suryanamaskar) घालत असून हा तिचा सगळ्यात आवडता व्यायाम प्रकार असल्याचे दिसते. कारण ठराविक दिवसांचा काळ गेल्यावर करीना १०८ सुर्यनमस्कार घालते आणि तिच्या चाहत्यांना फिटनेस संदर्भात मोटीव्हेट करते. एका दमात १०८ सूर्यनमस्कार घालणे हे वाटते तितके सोपे काम नाही. मात्र नियमित व्यायाम करत असल्याने करीनाला हे शक्य होते.
त्यामुळे तुम्हालाही बारीक व्हायचे असेल किंवा किमान बेबोसारखे फिट राहायचे असेल तर तुम्ही हा १०८ सुर्यनमस्कार घालण्याचा व्यायाम नक्कीच ट्राय करु शकता. एका दमात इतके सूर्यनमस्कार घालणे हे आव्हान असून त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती, संयम आणि दररोज व्यायाम करण्याची सवय असणे गरजेचे असते. आता एका दिवसात १०८ सुर्यनमस्कार घालणे लगेच शक्य होणार नाही. पण किमान रोज १० ते १२ सूर्यनमस्कारांपासून तर आपण सुरुवात करु शकतो ना. सूर्यनमस्कार घालण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नसल्याने कामातून १० ते १५ मिनीटे वेळ काढून तुम्ही घरातल्या घरात हा व्यायाम नक्की करु शकता.