- गौरी पटवर्धन
आपण फिट असलं पाहिजे आणि त्यासाठी व्यायाम केला पाहिजे हे सगळ्यांना पटतं. पटतं म्हणजे तसं ठाम मतच असतं.पण तक्रार एकच, की वेळ मिळत नाही. वेळ कसा काढायचा हेच कळत नाही. एक नाही अनेक प्रश्न पडतात, व्यायामाचं नाव काढताच.व्यायाम कुठला करायचा? कधी करायचा? कुठे करायचा? त्यासाठी कपडे कुठले घालायचे ? बूट कुठले घ्यायचे? जिम लावायचं का?व्यायाम करायचा? का कुठला खेळ जॉईन करायचा? आणि सगळ्यात महत्वाचा बायका स्पेशल प्रश्न म्हणजे व्यायाम करायला वेळ कुठून आणायचा?हे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय आपलं व्यायामाचं तंत्र काही सुरु होऊ शकत नाही. मग त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नापासून सुरु केलेली चांगली. व्यायामासाठी वेळ कुठून आणायचा?आपण जर आपल्या दिवसाच्या शेड्यूलकडे बघितलं तर आपल्याला त्यात एक सेकंदाचाही वेळ रिकामा दिसत नाही. दिवसातून २ वेळा स्वयंपाक करणं, घरातल्या सदस्यांच्या वयानुसार एकदा किंवा दोनदा मधल्या वेळचं खायला करणं, भांडी घासणं, भांडी लावणं, डबे भरणं, मुलांची शाळेची तयारी करणं (शाळा ऑफलाईन असली तरी तयारी करावीच लागते), स्वतःच्या ऑफिसची तयारी करणं, ऑफिसला जाणं किंवा वर्क फ्रॉम होम करणं, कपडे धुणं, वळत घालणं, घड्या करणं, कपडे इस्त्रीला देणं, कपडे जागेवर ठेवणं, घरातला सतत होणार पसारा सतत आवरणं, घरातल्या वृद्ध/आजारी व्यक्तींच्या औषधांच्या वेळा सांभाळणं, लहान मुलं असतील तर त्यांचं खाणंपिणं, मुलांचे क्लासेस अशा न संपणाऱ्या कामांमध्ये व्यायामाला वेळ होऊ शकतो का?तर नक्की होऊ शकतो.कसा?तर या सगळ्या कामांना झाला तसाच!
म्हणजे कसा?
तर व्यायाम हा विषय प्रायॉरिटीवर घेऊन. आपला व्यायाम हा विषय जोवर आपल्या स्वतःच्या दृष्टीने महत्वाचा होत नाही तोवर तो इतर कोणालाही महत्वाचा वाटू शकत नाही हे आपण सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या व्यायामाचा समावेश आपण अत्यंत महत्वाच्या कामांमध्ये केला तर त्यासाठी आपण वेळ काढू शकतो. जसं आपल्याला महत्वाचं वाटणारं काम करण्यासाठी आपण इतर तुलनेनं कमी महत्वाची किंवा कमी अर्जंट असलेली कामं बाजूला ठेवतो, तशी व्यायामाच्या एका तासापूर्ती इतर कामं एकतर बाजूला ठेवायची, घरातल्या इतर सदस्यांवर सोपवायची किंवा नाही करायची. नाही केली तरी चालतील अशी कामं कुठली असतात? ती आपली आपल्याला शोधावी आणि ठरवावी लागतात. उदाहरणार्थ, घर चकाचक ठेवणं या गोष्टीला किती महत्व द्यायचं? म्हणजे घर बेसिक स्वच्छ असणं वेगळं, पण अगदी पेपरची घडीसुद्धा कायम आवरून टीपॉयवर ठेवणं हे आपल्या तब्येतीपेक्षा जास्त महत्वाचं आहे का? हे आपल्याला ठरवावं लागतं. एकदा तब्येत महत्वाची हे ठरलं की मग कुठली कामं न करून चालेल आणि कुठली कामं इतर कोणालातरी सांगितलेली चालतील याचा अंदाज घेता येतो.कामांची अशी वाटणी केली म्हणजे मग आपल्याला व्यायामाला थोडासा वेळ मिळतो. सुरुवातीला पंधरा वीस मिनिटंच मिळतील. पण ते चालतं कारण सुरुवातीला आपल्याला तेवढाच वेळ व्यायाम करता येणार असतो. व्यायाम करण्यासाठी वेळ काढता आला की पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे व्यायाम कधी करायचा?