बॉलिवूडमधील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नेहमीच आपले फिटनेसप्रेम सोशल मीडियावर शेअर करत असतात. कधी वर्कआऊट करतानाचे फोटो, तर कधी वर्कआऊट झाल्यानंतरचे, वर्कआऊटमुळे घामाघूम झालेले फोटोही अनेकदा शेअर केले जातात. काही वेळा वर्कआऊट करतानाचे व्हिडियोही अभिनेत्री शेअर करतात. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिनेही नुकताच आपला वर्कआऊट करतानाचा व्हिडियो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती हात आणि पायाची ताकद वाढविणारे व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. पांढरा ढगळा टिशर्ट, पिवळ्या रंगाची टाइटस आणि स्पोर्ट शूज घातलेल्या नेहाने हाय पोनी बांधला आहे. या पेहरावात व्यायाम करतानाही नेहा अतिशय देखणी दिसत आहे. शेवटच्या टप्प्यात पोटासाठीही ती काही व्यायामप्रकार करत असल्याचे दिसते आणि त्यानंतर थकून डोक्याला हात लावून बसते. तर मुलींनो तुम्हालाही नेहासारखे स्लिम-ट्रीम दिसायचे असेल तर नुसता तिच्यासारखा मेकअप आणि फॅशन करुन भागणार नाही, तर तिच्यासारखा वर्कआऊटही करावा लागेल.
आपली आवडती अभिनेत्री किंवा अभिनेते यांच्याकडून व्यायामाची प्रेरणा घेऊन बरेच जण व्यायाम करत असतात. तसेच या कलाकारांचे फॉलोअर्सही खूप जास्त असल्याने त्यांनी केलेल्या पोस्टला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतो. आताच्या तिच्या पोस्टला एका तासात २६ हजारांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जण त्यावर प्रतिक्रियाही नोंदवतात. आताच्या पोस्टला नेहाने एक कॅप्शनही दिले आहे. ती म्हणते, "तुम्हाला जीवनशैलीत काही बदल करायचे असतील तर एक्सपर्टची मदत गरजेची असते." प्रदिप भाटीया या आपल्या कोच कम मित्राचे तिने धन्यवादही मानले आहेत. नेहाने याआधीही बऱ्याचदा तिचे जीममधील वर्कआऊटचे व्हिडियो पोस्ट केले होते. याबरोबरच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, करीना कपूर, कैतरीना कैफ, मलायका अरोरा, अंकिता कोंवर याही नियमितपणे आपल्या फिटनेसबाबतच्या गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. तर मराठीतील प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी (मोठी) यांसारख्या अभिनेत्री सोशल मीडियावरुन फिटनेसचे मंत्र देत असतात.
अभिनेत्रींना त्यांच्या फिगरसाठी आणि फिटनेससाठी व्यायाम करणे क्रमप्राप्त असले तरी अनेकींचे ते पॅशन असल्याचेही पाहायला मिळते. नेहा पेंडसे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते. वेगवेगळ्या आउटफिटसमधील फोटोंबरोबरच अनेकदा ती तिच्या पाळलेल्या कुत्र्यासोबतचे फोटो आणि व्हिडियोही शेअर करताना दिसते. तर कधी तिचा मूड ती आपल्या फोटोमधून सांगते. नेहाने हिंदी, मराठी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम अशा अनेक भाषांतील चित्रपटांत काम केले आहे. तसेच तिने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. व्यायामामुळे या अभिनेत्रींचे शरीर तर सुडौल असतेच पण मनही ताजेतवाने व्हायला मदत करते आणि सगळ्यात महत्त्वाचे भरपूर घाम आल्याने त्यांची त्वचाही चांगली दिसते.