बॉलिवूड अभिनेत्री नेहमी स्वत:ला फिट अँड फाइन ठेवण्यासाठी काही ना काही करत असतात. घरचा योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मन आनंदी राहण्यासाठीही त्या विशेष प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांची फिगर एकदम परफेक्ट तर असतेच पण त्यांच्या चेहऱ्यावरही या सगळ्याचा अतिशय चांगला ग्लो येतो. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण हिच्यासारखी स्लीम-ट्रीम फिगर हवी असे अनेक तरुणींना वाटते. पण त्यासाठी दिपिका काय करते हे तुम्हाला माहित आहे? नुकताच तिने आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी तिला शुभेच्छा देताना तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला हिने दिपिकाचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या आगळ्यावेगळ्या शुभेच्छांकडे नेटीझन्सचे लक्ष वेधले गेले.
आपली फिगर शेपमध्ये ठेवण्यासाठी या अभिनेत्री किती मेहनत घेतात हे आपल्याला हा व्हिडियो पाहून कळू शकेल. यामध्ये यास्मिन हिने दिपिका पदुकोणचे फिटनेस रुटीन म्हणून म्हणत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काळ्या रंगाची स्पोर्टस ब्रा आणि ट्राऊझर घातलेल्या दिपिकाचे व्यायामाप्रती असणारे डेडीकेशन सांगण्याचा प्रयत्न यास्मिन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन करत आहे. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्री फिटनेस ट्रेनिंग घेण्यासाठी यास्मिनकडे जातात. यामध्ये कैतरिना कैफ, जान्हवी कपूर, आलिया भट यांबरोबर आणखी बऱ्याच अभिनेत्रींचा समावेश आहे.
ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असून फिटनेसशी निगडीत सतत काही ना काही व्हिडियो किंवा फोटो पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने केसगळती थांबवण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले होते. तर त्याआधी डाएट विषयीही तिने काही गोष्टी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केल्या होत्या. दिपिका व्यायामाच्या बाबतीत एकदम एन्थुझिअॅस्टीक असून ती नेहमी योगा आणि स्ट्रेंथचे व्यायाम करताना दिसते. दोन रॉडला हाताने पकडून आपले शरीर बॅलन्स करताना दिपिका यामध्ये दिसत आहे. यामध्ये दिपिका अतिशय अवघड असे काही स्ट्रेचिंगचे प्रकार करताना दिसत आहे. दिपिका ही नेहमी इन्स्पिरेशन आहे असे म्हणत यास्मिनने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिपिकाला प्रेमाने यास्मिन डीपी म्हणत असल्याचे आपल्याला दिसते.