सुटलेलं पोट तुम्ही ऐकलंय, पण सुटलेली पाठ .... हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का? ज्याप्रमाणे पोटावर खूप जास्त चरबी साचते, चरबीचे अक्षरश: एकावर एक टायर चढत जातात किंवा मग पोट चरबीमुळे लाेंबकळल्यासारखे दिसते.. तसेच काहीसे पाठीच्या बाबतीतही होते. अनेक जणींच्या पाठीवर एवढी जास्त चरबी साचलेली असते की लांब गळ्याचे घट्ट ब्लाऊज घातले तर पाठ अक्षरश: दोन भागात विभागाली गेलेली दिसते. मधोमध एक रेषा तयार होते. अशाप्रकारे चरबीचे थर साचलेल्या पाठीमुळे अनेक जणी हैराण असतात. कारण मोठ्या गळ्याचे ब्लाऊज आणि ड्रेस त्यांना घालताच येत नाहीत.
पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जसे खूप व्यायामाचे प्रकार असतात, तसेच काही व्यायाम पाठीची चरबी कमी करण्यासाठीही आहेत. हे व्यायाम जर दररोज नियमितपणे १० ते १५ मिनिटांसाठी केले तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि अवघ्या काही दिवसांतच पाठीवरची चरबी कमी हाेण्यास सुरुवात होईल. एरवी आपण जे व्यायाम करतो ते रिकाम्यापोटी किंवा जेवण झाल्यानंतर ठराविक वेळानेच करावे लागतात. पण पाठीच्या व्यायामांसाठी अशा अटीची गरज नाही. हे व्यायम तुम्ही दिवसभरातून कधीही आणि कुठेही करू शकता..
पाठीवरची चरबी कमी करणारे व्यायामहे सगळे व्यायाम करण्यासाठी ताठ उभे रहा. हे व्यायाम केल्यामुळे पाठीवरची चरबी तर कमी होईलच, पण दंडावरची चरबीही विरघळायला सुरूवात होईल. व्यायाम प्रकार १ -दोन्ही हात सरळ आडवे पसरवा. यानंतर हात क्लॉकवाईज दिशेने ५ वेळा आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने ५ वेळा गोलाकार फिरवा. जेवढ्या मोठ्या वर्तूळात हात गोलाकार फिरवणे शक्य होईल, तेवढ्या मोठ्या वर्तूळात हात फिरवा.
व्यायाम प्रकार २- या प्रकारात हात दोन्ही बाजूंनी आडवे पसरवा. यानंतर दोन्ही हात एकसोबत वर न्या आणि पुन्हा एकसोबतच सरळ खाली आणा. अशा पद्धतीने कमीतकमी १० वेळा तरी हातांची हालचाल करा.
व्यायाम प्रकार ३- स्विमिंग करताना आपल्या हाताची जशी हालचाल होते तशी हालचाल करा. फक्त असं करताना हात मागच्या बाजूनेही जास्तीतजास्त खेचले जातील याचा प्रयत्न करा. हा व्यायामही कमीतकमी १० वेळा करा.
व्यायाम प्रकार ४- या प्रकारचा व्यायाम करताना दोन्ही हात छातीजवळ घ्या आणि नमस्काराच्या अवस्थेत एकमेकांना जोडा. यानंतर हात एकमेकांपासून दूर करा आणि शक्य होईल तितके मागे खेचण्याचा प्रयत्न करा. नमस्काराची अवस्था आणि त्यानंतर हात मागे खेचणे अशी क्रिया एकानंतर एक याप्रमाणे कमीतकमी १० वेळेस करा.
व्यायाम प्रकार ५- या प्रकारात दोन्ही हात दोन्ही बाजूंनी आडव्या रेषेत पसरवा. यानंतर एकाचवेळेस दोन्ही हात कोपऱ्यातून वाकवा आणि तळहात खांद्याला लावा. यानंतर पुन्हा हात आडवे करा. ही क्रियादेखील कमीतकमी १० वेळा करा.