गौरी पटवर्धन
काही जणींना एरोबिक व्यायाम करतांना म्हणजे चालताना, धावताना, जिना चढताना, सायकल चालवताना अपर बॉडीसाठीचा व्यायाम करायचा नसतो किंवा करणं शक्य नसतं. मात्र एरोबिक व्यायाम करून झाल्यानंतर अपर बॉडी एक्सरसाइजसाठी काही वेळ राखून ठेवणं फार आवश्यक असतं. झाला आपला व्यायाम, एवढं चालून आलो, धावलो आता काय वेगळा व्यायाम करायचा असं मनात आणू नका. अप्पर बॉडी व्यायामही आवश्यक असतात.
पण त्यात व्यायाम कुठले करायचे? ते समजण्यासाठी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की अपर बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या भागाचा व्यायाम करणं गरजेचं असतं?
अपर बॉडी म्हणजे मुख्यतः हात, खांदे, पाठ, मान, पोट आणि कंबर. आता या सगळ्या अवयवांना, त्यातल्या स्नायूंना व्यायाम देणं खरं म्हणजे फार आवश्यक असतं. तो कसा द्यायचा? तर या सगळ्या अवयवांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. हात आणि खांदे एका भागात तर पोट आणि कंबर. मान आणि पाठ दोन्हीकडे असतात. सामान्यतः रोज एका भागाचा व्यायाम करावा आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागाचा. म्हणजेच आलटून पालटून व्यायाम करावेत. स्नायूंना एक दिवस व्यायाम आणि दुसऱ्या दिवशी तुलनेने आराम. अर्थात तो आराम फक्त तुलनेने म्हणता येईल एवढाच असतो. कारण हाताचे व्यायाम करतांना काही प्रमाणात का असेना पोटाचे स्नायू काम करतच असतात. पण अर्थात तसे तर चालतांना आणि धावतांनाही पोटाचे आणि पाठीचे स्नायू व्यायाम करतच असतात. पण तरीही रोज एका भागाचा फोकस्ड व्यायाम करावा.
हात आणि खांदे यासाठी कुठला व्यायाम करता येऊ शकतो? तर जोर मारणं किंवा डिप्स किंवा पुशअप्स मारणं. अर्थात त्यासाठी मुळात हातात आणि खांद्यात बऱ्यापैकी ताकद लागते. ती नसेल तर तर चक्क भिंतीपासून दोन फूट अंतरावर उभं रहायचं, भिंतीवर हात टेकायचे आणि भिंतीवर पुशअप्स काढायच्या. हा व्यायाम तुलनेने खूप हलका असतो. अगदी नवीन व्यायाम करणाऱ्यांनाही जमू शकतो. भिंतीपासून जितकं जवळ उभं राहू तितका हा व्यायाम अजून सोपा होत जातो. जितकं लांब जाऊ तितकी ताकद जास्त लावायला लागते. प्रत्येकीने आपापल्या ताकदीचा अंदाज घेऊन हे अंतर ठरवावं. त्याखेरीज व्यायामशाळेत करण्याचे अनेक व्यायाम आहेत. वजन घेऊन बायसेप्स, म्हणजे दंडाच्या पुढच्या स्नायूचा व्यायाम करता येतो. गुढग्यावर खाली बसून, वजन घेऊन कोपरापासून मनगटापर्यंतचा हात स्टूलवर ठेऊन फक्त मनगट वळवून कर्लिंग्ज मारता येतात.
तसेच पोटाचे विविध व्यायाम करता येतात. पोट कमी करणं हा तर बहुतांश सगळ्यांचा व्यायाम करण्याचा सूप्त वा उघड हेतू असतोच. त्यातला सगळ्यात प्राथमिक व्यायाम म्हणजे क्रंचेस किंवा सिटअप्स. पाठीवर झोपायचं आणि कसलाही आधार न घेता उठून बसायचं आणि परत आडवं व्हायचं हा व्यायाम दिसायला अगदी सोपा असला तरी ज्याने तो कधीच केलेला नाही त्याला तो करणं तितकंसं सोपं नसतं. त्यामुळे त्यावरचा उपाय म्हणजे खिडकीच्या गजाला किंवा पलंगाच्या पायाला एखादी दोरी किंवा ओढणी बांधायची आणि उठायच्या वेळी तिची थोडी मदत घ्यायची. काही जणींना सुरुवातीला परत झोपतानाही दोरीचा आधार घेऊन व्यायाम करायला लागू शकतो.
अशी मदत घेत व्यायाम करायची आयडिया फिटनेसच्या वेडाने झपाटलेल्या मनाला काही वेळा आवडत नाही. पण त्याला समजावून सांगायचं, की हे आपल्याला करायलाच लागणार आहे, कारण त्यानेच आपला फिटनेस वाढणार आहे.