बायकांचं सुटलेलं पोट हा एक कायमच चर्चेचा विषय असतो. खूप खूप एक्सरसाईज केल्यावर कुठे एक इंच पोट कमी झालंय... अशा आशयाच्या गप्पा तर आपण नेहमीच ऐकतो. यावरूनच लक्षात येतं की सुटलेलं पोट कमी करणं हा अजिबातच चेष्टेचा विषय नाही. त्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. काही जणी अगदी चिवटपणे तेवढी मेहनत घेतात. पण एवढे पेशन्स काही प्रत्येकीमध्येच नसतात. म्हणूनच तर सुटलेलं पोट कमी करण्याची वेळच आपल्यावर येऊ नये, म्हणून आतापासूनच काही खाण्यापिण्याची पथ्ये पाळू या आणि फिट राहू या...
वडापाव, पावभाजी, तळलेले चमचमीत पदार्थ, चायनिज हे सगळे आपले अत्यंत आवडीचे पदार्थ. कधीकधी तर रोजच यापैकी एखादा पदार्थ आपण हमखास खात असतो. काही नाही मिळाले, तर अगदी गल्लीच्या कोपऱ्यावर जाऊन पाणीपुरीच्या २- ३ प्लेट्स खाल्ल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. थोडंसच तर खातोय, त्याने काय होतं, असा विचार करून आपण खाण्याचा धडाका सुरू करतो खरा, पण तो काही आपल्या प्रकृतीला मानवणारा नसतो. कारण असंच थोडं थाेडं म्हणता म्हणता रोजच खाल्ल्यामुळे हळूहळू पोटावर चरबी साचत जाते आणि मग पोटाचा पेटारा कधी झाला, हेच आपल्याला कळत नाही. म्हणूनच हे काही पदार्थ खाणं अगदी आतापासूनच एकदम कमी करायला हवं..
१. वडापाव
हा तर बहुसंख्य भारतीयांचा आवडीचा पदार्थ. स्वस्तात मिळतो म्हणून अनेक नोकरदार मंडळी आणि कॉलेजची मुलं थेट वडापावची गाडी गाठतात आणि रोजचा नाश्ता तिथेच उरकतात. थोडीशी भूक लागली की वडापाव खाऊन भूक भागविणारेही अनेक आहेत. ८- १५ दिवसांतून एखादा वडापाव खायला हरकत नाही. पण आठवड्यातून रोजच किंवा ३ ते ४ वेळेला वडापाव खात असल्यास आताच स्वत:ला आवर घाला. कारण
बटाटावड्यातील बटाटा, तेल आणि मैदा यांच्या अतिसेवनामुळे पोट सुटते.
२. फ्रेंच फ्राईज, पिझ्झा
फ्रेंचफ्राईज हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता पदार्थ. गरमागरम फ्रेंच फ्राईज टोमॅटो सॉसमध्ये बुडवायचे आणि खायचे म्हणजे तर रंगतच. पण याचे सतत सेवन केले तर त्यामुळे लवकरच स्थूलपणा येतो. त्यामुळे महिन्यातून एखाद्या वेळेसच फ्रेंच फ्राईज खा. जास्त नको.
३. नुडल्स
स्वयंपाकाचा कंटाळा आला, थोडीशीच भूक आहे, काहीतरी चटपटीत खावं वाटतंय असे कोणतेही कारण बाजारात मिळणाऱ्या इंन्स्टंट नूडल्स खाण्यासाठी पुरेसे असते. कमी वेळेत मस्त डिश तयार होते, त्यामुळे अगदी एक दिवसाआड नुडल्स खाणारेही खूप आहेत. पण नुडल्समध्ये असलेला मैदा तुमच्या पोटाचा घेर कधी बिघडवून टाकतो, हे तुम्हाला नीट समजतही नाही. म्हणूनच इंन्स्टंट नुडल्स खाणं आधी कमी करा.
४. चाट
पाणीपुरी, रगडापॅटीस, शेवपुरी, पावभाजी, बटाटेवडा, वडापाव अशा चाटच्या जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा असतो. शिवाय या सगळ्या पदार्थांमध्ये काहीनाकाही तळलेले असते. म्हणूनच तर सगळ्याच प्रकारचे चाट खाणे टाळले पाहिजे. आठवड्यातून दोन तीन वेळेस खाण्यास हरकत नाही. पण जास्त चाट खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त फॅट्स वाढत जातात.
५. बटर
पावभाजीवर एक्स्ट्रा बटर तसेच खूप सारे बटर घेऊन भाजलेले पाव म्हणजे आहाहा.... पण जीभेला जरी मस्त वाटत असले, तरी बटर काही तुमच्या पोटासाठी चांगले नाही. बटरच्या अतिरिक्त सेवनामुळे तुमचे पोट वाढू शकते. बटरऐवजी चांगले तूप किंवा मग चीज खाणे चांगले.