झटपट, पटपट, इन्स्टंट, या शब्दांची वेगवान नव्या जगाला भूरळ पडलेली आहे. सतत, रोज, नियमित, जास्त काळ हे शब्द आऊटडेटेड वाटण्याचा हा काळ. त्यातूनच मग नवनवीन ट्रेण्ड तयार तरी होतात किंवा मग बाजारपेठ असे ट्रेण्ड तयार करुन ते मार्केट तरी करते. आता सध्या एक नवा ट्रेण्ड चर्चेत आहे. त्याचं नाव विकएण्ड वॉरिअर. म्हणजे सप्ताहाअंती कुठं लढायला जाणारे, समाजसेवा करणारे किंवा जगात काही क्रांतीकारक बदल व्हावे म्हणून लढणारे हे योद्धे नव्हेत. हे योद्ध स्वत:च्याच शरीरावर साठलेल्या चरबीशी आणि पोटावर चढलेल्या टायरीशी लढतात. पण आठवड्यातून फक्त दोनदा, रोजरोज वेळ नाही त्यांच्याकडे. ते रोज व्यायाम करुन घाम गाळत नाही, त्यांच्याकडे वेळच नाही म्हणतात व्यायामाला. म्हणून मग ते आठवड्यातून फक्त दोनदा, विकएण्डलाच रगडून व्यायाम करतात. इतका हाय इंटेसिटी व्यायाम की आठवडाभर खाऊन साचलेली सगळी चरबी जिरलीच पाहिजे. म्हणून त्यांना विकएण्ड वाॅरिअर म्हणतात. आता प्रश्न असा आहे की जेवायचं रोज, खायचं प्यायचं रोज, व्यायाम दोनदाच काम चालेल? त्यानं फायदा होईल?
(Image : Google)
विकएण्ड वॉरिअरचं आणि या ट्रेण्डचं समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं आहे की, जे लोक कधीच व्यायाम करत नाहीत त्यांच्यापेक्षा तर आठवड्यातून दोनदा व्यायाम करणारे सरसच आहेत. ते निदान व्यायाम तरी करतात. मग ते कसे मरतील अचानक? मुद्दा करेक्ट आहे.मात्र ब्रिटिश नॅशनल हेल्थ सायन्सनं केलेल्या अभ्यासाचं म्हणणं आहे की, आठवडाभर काहीच करायचं नाही. खूप खायचं-प्यायचं, पण व्यायाम दोनदाच करायचा, तो ही १२० मिनिटं मध्यमगतीचा किंवा ७५ मिनिटं जलद म्हणजे हाय इंटेसिटीचा. तर त्याचा आपल्या शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. अतीच आणि एकदम व्यायाम केला तर त्याप्रमाणात हार्टचं काम वाढतं आणि त्यामुळे हार्टला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आठवडाभराचा कोटा भरुन काढल्यासारखा स्वत:ला योद्धा समजून व्यायाम युध्दपातळीवर करणं हे अत्यंत घातक आणि अतिशय धोकेदायक आहे. त्यामुळे अकाल मृत्यूचा धोका टळणार तर नाहीच उलट वाढू शकतो. त्यामुळे आठवड्यातून दोनदाच व्यायाम करण्यापेक्षा रोज थोडा तरी व्यायाम करणं अधिक फायद्याचं आहे.