कोरोनाची लाट आली आणि बहुसंख्य लोकांचे ऑफिसला जाणेच बंद झाले. वर्क फ्रॉम होम करणे अनेक जणींना त्रासाचे होत आहे, तर काही जणींना आवडते आहे. पण या वर्क फ्रॉम होममुळे वजन मात्र सारखे वाढते आहे, अशी तक्रार अनेक जणी करत आहेत. वर्क फ्रॉम होम काळात वजन वाढण्याचे कारण म्हणजे घरी राहून वारंवार होणारे फुड टेम्पटेशन. अनेक जणींना या काळात अक्षरश: खा- खा होत असून तोंडात काही टाकले नाही, तर काम करताना लक्षच लागत नाही, असेही काही जणी सांगत आहेत.
थोडं काम झालं की लगेच उठायचं, घरात चक्कर मारायची आणि काही ना काही उचलून तोंडात टाकायचं, असं अनेकींचं रूटीन झालं आहे. ऑफिस असल्यावर खाण्या- पिण्याच्या वेळांवर बंधने आलेली असतात. एकदा लंचब्रेक आणि २- ३ वेळा होणारा कॉफी ब्रेक सोडला तर अन्य वेळी आपण सतत काहीतरी तोंडात टाकू शकत नाही. त्यामुळे पोटाला जरा आराम मिळतो आणि आपोआपच वजन वाढीवर नियंत्रण येते. मात्र घरी असताना मनमौजीपणे सुरू असणारे खाणे- पिणे वजन वाढीसाठी पोषक ठरते आहे.
फुड टेम्पटेशन रोखण्यासाठी हे करून पहा..१. जेवणाच्या वेळा ठरवून घ्याघरी असताना जेवणाची शिस्त पाळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे ऑफिस असताना तुम्ही जसे जेवायचा, तसेच जेवण त्याच वेळेला घरी घेण्याचा प्रयत्न करा. जेवणाच्या वेळा पाळल्या आणि त्याचवेळेला पोटभर जेवण केले तर फुड टेम्पटेशन रोखता येईल.
२. खूप उपाशी राहू नकाभूक लागल्यावर लगेच जेवायला बसा. भूक लागली असेल आणि तरीही तुम्ही खात नसाल, तर अशावेळी काही सुधरत नाही. कामही जमत नाही. मग वारंवार काहीतरी तोंडात टाकण्याचा आणि भूक मारण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणूनच उपाशी राहणे टाळा आणि वेळच्यावेळी जेवा.
३. वजन वाढतेय असे स्वत:ला सांगाजेव्हा काहीतरी खाण्याची इच्छा होईल, तेव्हा स्वत:शी संवाद साधा. आपण वारंवार काहीतरी खात आहोत, हे आपल्यासाठी किती हानिकारक आहे, यामुळे आपले वजन कसे वाढते आहे, हे स्वत:च स्वत:ला सांगा. अशी स्वत:लाच कधीकधी भीती घातली, तरीही खाण्यावर नियंत्रण मिळवता येते.
४. भरपूर पाणी प्याखायला काहीतरी घेण्यासाठी जेव्हा तुम्ही घरात चक्कर माराल, तेव्हा सगळ्यात आधी पाणी जिथे ठेवले असेल तेथे जा. एक ते दिड ग्लास पाणी प्या. यामुळे मग पोटही भरल्यासारखे वाटेल आणि काही खाण्याची इच्छाही होणार नाही. इच्छा झाली तरी कमी खाल्ले जाईल. शिवाय शरीराला योग्य प्रमाणात पाणीही मिळेल.
खूपच खावे वाटले तर....कधीकधी स्वत:ला कितीही समजावले तरी खाण्याची तीव्र इच्छा होतेच. अशावेळी असे काही पदार्थ तुमच्या हाताशी ठेवा, जे वजन वाढीवर नियंत्रण ठेवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या लाह्या, फुटाणे, मुरमुरे, राजगिरा असे पदार्थ घरात ठेवा. काही खावे वाटले तर हे पदार्थ खा. यामुळे वजन वाढत नाही आणि काही तरी खाल्ल्याचे समाधानही मिळते.