डॉ. यशपाल गोगटे
वजन झटपट कमी करायचं असतं. ते तसं झटपट कमी होत नाही. वजन कमी करण्यामध्येआहाराचे पालन करण्याचा सिंहाचा वाटा असतो. नियमित व्यायामाचे फायदे होतात. आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल केले की त्याचे अपेक्षित परिणाम म्हणून वजन कमी होते. पण वजन कमी झाल्यावर पुढे काय? ते कमी झालेले वजन टिकवून कसे ठेवावे?वजन किती कमी करावे ? अनेक जण वजन कमी करायला सुरवात करतात तेव्हा त्यांच्या मनात १०-१५-२५ किलो असे काहीसे वजन कमी करण्याचे आकडे समोर असतात. इतके वजन सहजासहजी कमी होत नसतेत्यामुळे वजन कमी करायला सुरवात केल्यावर अपेक्षित यश मिळत नाही व निराशे पोटी व्यायाम करणे - आहारावर नियंत्रण ठेवणे सोडून दिले जाते. मग नक्की वजन कमी किती करावे- तुमच्या वजनाच्या ५% एवढे वजन कमी केले तरी वजन कमी करण्याचे , चयापचयाचे आजार नियंत्रित राहण्याचे फायदे आपल्याला मिळतात. म्हणजेच ६० किलो वजन असणाऱ्या स्त्रीने ३ किलो वजन कमी केले तरी तिला त्या वजन कमी करण्याचा फायदा होतो. वजन कमी केल्यावर ते टिकवून ठेवणे देखील तेवढेच महत्वाचे असते. वजन कमी करणे मग ते परत वाढवणे आणि नंतर परत कमी करणे या प्रकाराला यो-यो असे म्हंटले जाते. हे शरीराला जास्त नुकसान करते. त्यामुळे थोडेसेच जरी वजन कमी केले पण ते जास्त काळ कमी टिकवून ठेवले तर अधिक फायद्याचे ठरते वजन उतरायला लागल्यावर काही काळाने कितीही प्रयत्न केला तरी वजन उतरत नाही. त्याला वजनाचा ‘प्लॅटो फेज ‘ असे म्हणतात. प्लॅटो फेज वर मात मिळवण्याकरता खाण्याकडे लक्ष देणे व योग्य व्यायाम करत राहणे हे गरजेचे असते.
आपण हे नियमित केले तर प्लॅटो फेज आपोआप तुटते व वजन पुन्हा एकदा कमी व्हायला सुरवात होते. व्यायाम कमी करण्यासाठी जसे आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते तसेच कमी झालेले वजन टिकवूनठेवण्याकरता व्यायाम करणे गरजेचे आहे.वजनाबद्दलची एक कायमची असलेली तक्रार म्हणजे- माझे वजन कमी होते पण ते परत जैसे थे वाढून जाते.या वजन वाढीला रिबॉउंड वेट गेन असे म्हणतात. याची अनेक कारणे आहेत. यात मुख्य म्हणजे मेंदूतहायपोथॅलॅमस मधील वजनाचा एक सेट पॉईंट. पूर्वी जेव्हा दुष्काळ येत तेव्हा हा सेट पॉईंट वजनाला खूप कमी होऊ देत नसे. या उलट आजकालच्या काळात तो वजन कमी करण्यास बाधक ठरतो. वजन कमी व्हायला लागले की शरीरात काही हार्मोन्स तयार होतात त्यामुळे वजन पुन्हा वाढायला लागते. यामुळेच वजन कमी करणे ही तात्पुरती योजना नसून यावर कायम स्वरूपी उपाय करावा लागतो. बरेचवेळा लग्नासाठी किंवा पार्टीसाठी किंवा इतर काही खास फ़ंक्शनसाठी म्हणून वजन कमी करणे योजले जाते. ते पूर्ण झाले कि मग खाणे हादडणे - व्यायाम न करणे सुरु होऊन जाते. अश्यावेळेसही वजन परत वाढायला लागते. त्यामुळे डाएट कधी पर्यंत तर आयुष्यभर! आणि व्यायाम कधीपर्यंत तर तो ही आयुष्यभर !
(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट- आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)dryashpal@findrightdoctor.com