सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत प्रत्येक बाबतीत अनियमितता दिसून येते. खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित नाही, घरी नेमकं कधी येणार सांगता येत नाही. सकाळी रोजचं रुटीन ठरल्याप्रमाणे पार पडेल की नाही हे सांगता येत नाही. रात्री झोपायला किती वाजतील हे माहित नसतं आणि त्यामुळे सकाळी उठण्याच्या वेळा निश्चित नसतात. या सर्व अनियमिततेच्या आपल्या आरोग्यावर आणि फिटनेसवर परिणाम होत असतो. विशेषत: झोपण्या- उठण्याच्या वेळा निश्चित नसल्या किंवा विचित्र असल्या तर आरोग्य हमखास बिघडतंच. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपलं जावं यासाठी आयुर्वेद सकाळी आपण किती वाजता उठतो आणि उठायला हवं याला विशेष महत्त्व देतो.
घरातील जेष्ठ व्यक्ती नेहेमी लहानांना लवकर झोपा आणि लवकर उठण्याचा नियम शिकवत असतात आणि अनेकजण हा नियम काटेकोरपणे स्वत:ही पाळतात. या नियमामागे आयुर्वेद आहे. पण आपली प्रकृती आणि शारीरिक मानसिक स्थिती अपल्या उठण्याच्या वेळेवर परिणाम करतात. याबाबत आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्सा भवसार म्हणतात की अनेक जेष्ठ आणि वयस्कर लोकांना वाटतं की आपण जर सूर्योदयापूर्वीच उठलो तर दिवसभर आपल्यात उत्साह आणि ऊर्जा असते. शिवाय आपलं शरीर एका निसर्गचक्राला धरुन चालतं. पण सर्वांच्याच बाबतीत सूर्योदयापूर्वी उठणं शक्य होत नाही. पण म्हणून त्यांनी कधीही उठावं असं मात्र नाही. वैयक्तिक र्मयादा आणि कारणांनुसार उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्या तरी योग्य वेळी उठणं ही शरीर आणि मन या दोहोंसाठी आवश्यक बाब आहे. ही योग्य वेळ कोणती आणि त्याचे फायदे काय याबाबत आयुर्वेदात विस्तृत माहिती दिलेली आहे.
ब्रह्म मुहुर्ताला उठा
आयुर्वेदानुसार उठण्याच्या बाबत ब्रह्म मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. परंपरा आणि संस्कृतीनुसार ब्रह्म मुहुर्ताला शुभ मानलं जातं. ब्रह्म मुहूर्त हा सूर्योदयापासून 1 तास 36 मिनिटं आधी सुरु होतो. या वेळेस झोपेतून उठल्यास निरोगी अन उत्साही वाटतं. शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबात ब्रह्म मुहुर्ताला महत्त्व आहे कारण या वेळेस उठल्यास ध्यान केल्यास ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानवृध्दी होते. स्मरणशक्ती आणि कामातल्या एकाग्रतेसाठी सकाळी ब्रह्म मुहुर्तावर उठावं. ब्रह्म मुहुर्ताला वातारणात शांतता आणि शुध्दता असते. या वेळेस उठल्यास मानसिक आरोग्य सुधारतं. या वेळेस मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा केल्यास त्याचा खूप फायदा होतो. ब्रह्म मुहूर्त ही व्यायामाची योग्य वेळ मानली जाते.
उठावं ते सूर्योदयाच्या आधीच
पण अगदी तंतोतंत ब्रह्म मुहुर्तावर उठणं सगळ्यांनाच शक्य नसतं. अशा लोकांनी ब्रहम मुहूर्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान उठावं. कारण या वेळेत निसर्गात, परिसरात सात्विक गुण असतात. यामुळे मनाला शांती आणि अवयवांना ताजेपणा मिळतो. आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात की ब्रहम मुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर सूर्योदयाआधी उठावं. आणि जर सूर्योदयाआधी उठणं शक्य नसेल तर सूर्योदयासोबत उठावं. पण सूर्योदयानंतर उठणं हे चुकीचं आहे.
ऋतुमानानुसार सूर्योदयाची वेळ बदलत असते. हे लक्षात ठेवून आपली प्रकृती, आपलं मन आणि शरीराची स्थिती याची सांगड घालून उठायला हवं. आयुर्वेदानुसार मानवाचं शरीर तीन प्रकारचं असतं. वात, पित्त आणि कफ प्रवृत्ती हे ते तीन प्रकार. या प्रकारानुसार उठण्याच्या वेळा पाळायला हव्यात. तज्ज्ञ म्हणतात की वात प्रकृतीच्या लोकांनी सूर्योदयापूर्वी अर्धा तास आधी उठावं. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी सूर्योदयाच्या पाऊण तास म्हणजेच 45 मिनिटं आधी उठावं तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी सूर्योदयाच्या दीड तास आधी उठावं.
जर झोपलोच उशिरा तर..
अनेकांन अनेक कारणांनी झोपण्यास रात्री खूप वेळ होतो. उशिरा झोपलो म्हणून जाग उशिरा आली असं म्हणून आपल्या उशिरा उठण्याचं सर्मथन न करता उशिरा झोपलो तर उठायचं कधी ही वेळ समजून घेणं आवश्य्क आहे. तज्ज्ञ म्हणतात की ज्यांना कामामुळे किंवा मानसिक ताण तणावांमुळे रात्री लवकर झोप येत नाही त्यांनी तरीही उठण्याचे काही नियम पाळणं आवश्यकच आहे. नियमानुसार वात प्रकृतीच्या लोकांनी उशिरा झोपलं तरी सकाळी 7पर्यंत उठयलाच हवं . पित्त प्रकृतीच्या लोकांनी सकाळी साडे सहाच्या आत उठावं तर कफ प्रकृतीच्या लोकांनी स्काळी सहाच्या आत उठायला हवं.
साडेसहा ते सात ही योग्यच वेळ
रात्री उशिरापर्यंत जागून काम केल्यास सकाळी लवकर उठणं , ब्रह्म मुहूर्त गाठणं किंवा सूर्योदयापूर्वी जाग येणं हे अनेकांना अजिबात शक्य नसतं. तज्ज्ञ म्हणतात अशा लोकांनी किमान साडे सहा ते सात वाजेदरम्यान झोपेतून उठायला हवं.
1. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयासोबत झोपेतून उठल्यास आपल्यात ऊर्जा, आणि सकारात्मकता येते.
या वेळेस उठल्यानं आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहातं.
2. ही वेळ आपल्या शरीरातील बायोलॉजिकल अर्थात जैविक घड्याळाशी सुसंबध्द असते.
3. सूर्योदयासोबतच उठल्यानं पचन क्रिया सुधारते. एकाग्रता वाढते. कोणतीही गोष्ट चटकन समजून घेणं सहज जमतं.
4. स्वाभिमान, शिस्त, आनंद आणि निरोगी दीर्घायुष्य हे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयासोबत उठल्यानं साध्य होतं हे मात्र नक्की.