डॉ. देविका गद्रे
परवा एक सत्तरीच्या आसपासच्या आजी हळूहळू चालत क्लिनिकमध्ये आले. थरथरते हात, मंदावलेली हालचाल, शरीरात ताठरता आणि अशा काहीश्या लक्षणांमुळे बदलत चाललेली शारीरिक स्थिती असं त्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमधून निदान झालेलं होतं कंपवात म्हणजेच पार्किन्सन. अर्थात प्रत्येक वेळी ह्या लक्षणांचं निदान कंपवातच असतं असं नाही. ह्या लक्षणांची बाकीही कारणं असू शकतात. वैद्यकीय निदान झालेले पार्किन्सनचे रुग्ण आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात आढळतात. तर आज जाणून घेऊया की पार्किन्सन म्हणजे नक्की काय, तो कशामुळे होतो आणि त्याची लक्षणे कशी ओळखावीत?१८१७ साली जेम्स पार्किन्सन ह्यांनी वैज्ञानिक आणि वैदयकिय दृष्ट्या पहिल्यांदा ह्या आजाराची नोंद केली. त्यांच्या ह्या संशोधनामुळेच पुढे त्यांचे नाव ह्या आजाराला दिले गेले. कंपवात हा एक न्यूरॉलॉजिकल म्हणजेच मेंदूचा आजार आहे. अजून जरा खोलात गेलं तर ह्याला मूव्हमेंट डिसऑर्डर म्हणजेच शारीरिक हालचालींसंबंधित आजार असे म्हणतात. हळूहळू वयानुरूप हा आजार वाढत जातो. भारतात उतारवयातील लाखो लोक ह्या आजाराने ग्रासलेले दिसतात. स्त्री आणि पुरुष दोघांमद्धे कंपवात समप्रमाणात आढळतो आणि ४० ते ६० वयापर्यंत या आजाराची सुरुवात होऊ शकते. ४० वर्षे वयाआधीसुद्धा कंपवात होऊ शकतो ज्याला जुवेनाईल पार्किन्सन म्हणजेच लहान वयात झालेला कंपवात असे म्हणतात. परंतु हा खूपच कमी प्रमाणात आढळतो.
कंपवात का होतो?
हे समजून घ्यायला इथे आपण डायबेटीसचं उदाहरण घेऊया. डायबेटीसमध्ये शरीरातील इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तसेच कंपवातामध्ये मेंदूतील डोपामिन नावाच्या संप्रेरकाचे प्रमाण कमी होते. हे संप्रेरक आपल्या हालचालींसाठी कारणीभूत असते. म्हणूनच रोजच्या साध्या हालचालींमद्धेसुद्धा अडथळा येऊ लागतो.कंपवात होण्यामागे अनुवंशिक आणि पर्यावरण विषयक गोष्टी कारणीभूत ठरतात. जसे की वारंवार मेंदूला इजा होणे, अयोग्य प्रमाणात कीटकनाशकांचा वापर, मँगनीज वा तत्सम धातूशी वा अनेक केमिकल्सशी जवळचा संपर्क, औदासिन्य कमी करण्यासाठी खूप काळ घेतलेली औषधे या सर्वांचा कंपवाताशी जवळून संबंध आहे. या सर्व गोष्टींवर अद्यापही संशीधन चालू आहे.
कंपवातात कोणती लक्षणे दिसून येतात?
पुढे झुकलेली शारीरिक स्थिती (posture), कोणतेही हावभाव नसलेला चेहरा, एकसुरी आणि अडखळते बोलणे, जेवण गिळण्यासाठी त्रास, चालताना कमी झालेली हात हलवण्याची क्रिया, थरथरत्या आणि अतिशय हळू हालचाली, शरीरात घट्टपणा आणि जवळ जवळ व छोटी पाऊले टाकत चालणे, तोल सांभाळता न आल्यामुळे वेळोवेळी पडणे, अगदी साध्या क्रिया जसे की केस विंचरणे, कपडे घालणे, जेवणे करताना वाढत चाललेला त्रास इत्यादी लक्षणे पार्किन्सनच्या विविध टप्प्यांमद्धे आढळतात.याव्यतिरिक्त लक्षात न राहणे, औदासिन्य येणे, विविध भास होणे, झोपेचा त्रास, वेळोवेळी जाणवणारा थकवा आणि बद्धकोष्ठाचा (कॉन्स्टिपेशन) त्रास ही लक्षणेसुद्धा आढळतात. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपोआप येणारी सामाजिक विरक्ती.
कंपवाताचे विविध टप्पे कसे ओळखावेत? डॉक्टर रुग्णांचे खालील टप्प्यांमद्धे वर्गीकरण करतात.
टप्पा ०: आजाराची कोणतीही लक्षणे नसणेटप्पा १: शरीराच्या एकाच बाजूला लक्षणे दिसणेटप्पा १.५: शरीराच्या एका बाजूची लक्षणे आणि चालताना अचानक थांबणे, शरीराची बदलती स्थिती (posture), पाठीतून पुढे झुकणे इत्यादीटप्पा २: शरीराच्या दोन्ही बाजूंना लक्षणे दिसणेटप्पा २.५: दोन्ही बाजूंची लक्षणे आणि काही प्रमाणात तोल जाणेटप्पा ३: दोन्ही बाजूस सौम्य ते मध्यम लक्षणे आणि शारीरिक अस्थिरता परंतु स्वावलंबीटप्पा ४: तीव्र लक्षणे परंतु स्वतः चालणे आणि उभे राहणे शक्यटप्पा ५: व्हीलचेअरवर किंवा बेडवर असलेले रुग्णहे Hoehn- Yahr या मापनाच्या पद्धतीचे ढोबळमानाने सर्वांना समजू शकेल असे स्पष्टीकरण.फिजिओथेरपिस्टकडे गेल्यावर ते काही चाचण्या करतात. त्यातील एक म्हणजे पूल टेस्ट (pull test)ह्यात रुग्णाला सरळ उभे राहायला सांगतात. फिजिओथेरपिस्ट रुग्णाच्या मागे उभे राहून रुग्णाला मागच्या बाजूला खेचतात. जर रुग्णाचा तोल गेला तर तो रुग्ण २.५ टप्प्याच्या पुढे गेला आहे असं समजतात. तज्ज्ञांशिवाय ह्यातील कोणत्याही चाचण्या घरी करण्यासाठी योग्य नाहीत.
ह्याव्यतिरिक्त पार्किन्सनमध्ये प्रतिसादात चढ उतार होत असतात. त्याचे खालील ३ प्रकारात वर्गीकरण होते.१) ऑन पिरियड: दिवसातली अशी वेळ जेंव्हा औषधे त्यांच्या पूर्ण शक्तीनिशी शरीरावर काम करतात व ह्यामुळे कंपवातामद्धे लक्षणीय घट दिसते.२) ऑफ पिरियड: दिवसातला असा वेळ जेंव्हा औषधे परिणामकारक ठरू शकत नाहीत व त्यामुळे पार्किन्सनच्या लक्षणात वाढ होऊ शकते.३) वेअरिंग ऑफ फेनॉमेनॉन (wearing off phenomenon): औषधांच्या दोन मात्रांमध्ये परत लक्षणे वाढू लागतात.यासाठी सुद्धा एक उदाहरण घेऊ. जर सकाळी ७ वाजता औषध घेतले तर त्याचा गुण सुरु व्हायला ८ वाजेपर्यंत वाट बघावी लागते. सकाळी ८ ते दुपारी १२ हा आपला ऑन पिरियड झाला ज्यात आपली औषधं अतिशय परिणामकारक ठरतात. ११ वाजल्यापासून औषधाचा गुण कमी व्हायला सुरुवात होते ज्यामुळे परत काही लक्षणे दिसू लागतात. ह्याला वेअरिंग ऑफ म्हणतात.आता ह्या लक्षणांवर उपचार कोणते ह्याचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.
(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)devikagadre99@gmail.comhttps://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/