वृषाली जोशी-ढोके
रोज प्राणायम करा, ओंकार साधना करा, ओंकार तरी म्हणा. स्ट्रेस कमी होईल हे सारे आपल्या कानावर सतत येते. अनेकजण ती साधना, रोजचा सराव करतातही. जे करत नाहीत त्यांनाही या ओंकाराची साधना (प्रणव साधना) करावी असं वाटतं. पण ओंकार साधना करायची म्हणजे नक्की काय करायचं, कसं करायचं याचे गणित सुटत नाही. ओंकाराला आद्य बीज मंत्र म्हंटले जाते. ओंकार हे ध्वनीचे मूळ स्वरूप आहे. यामध्ये 'अ' 'उ' आणि 'म' असे दोन स्वर एक व्यंजन आहेत. तोंड उघडे ठेऊन अ चा उच्चार केला जातो. तोंड मिटत असताना उ चा उच्चार होतो आणि तोंड पूर्ण मिटल्यानांतर म चा उच्चार होतो. एक ओंकार साधारण दहा सेकंदात म्हंटला जातो जसे की अ चा उच्चार २ सेकंद, उ चा उच्चार ३ सेकंद, आणि म कार थोडा लांबवत ५ सेकंद. ओंकार साधना आपल्याला सोयीस्कर असेल तसे मांडी घालून किंवा अगदी खुर्चीत बसून सुद्धा करू शकतो.
(छायाचित्र-गुगल)
हे करताना काही गोष्टी जरुर लक्षात ठेवाव्यात..
१. जिथे बसून ओंकार जप करणार आहोत ती जागा स्वच्छ, शांत, हवेशीर, पुरेसा प्रकाश असेल अशी असावी.२. सूर्योदयापूर्वीची वेळ ओंकार जप करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी सांगितली गेली आहे. सकाळच्या वातावरणात ऑक्सीजनचे प्रमाण जास्त असते तसेच शांतता ही अधिक असते त्यामुळे मन पटकन एकाग्र व्हायला मदत होते. ३. रोज एकाच जागी एकाच वेळी आणि एकाच आसनावर बसून साधना केली तर अधिक फायदे मिळतात. ४. ओंकारातील अ चा उच्चार आपल्या नाभिपाशी असलेल्या मणिपूर चक्रावर कंपने निर्माण करतात, उ चा उच्चार मानेपाशी असणाऱ्या विशुद्धी चक्रावर कंपने निर्माण करतात तर म चा उच्चार डोक्यातील सहस्त्राहार चक्रावर कंपने निर्माण करतात. ५. प्रत्येक ओंकार म्हणण्यापूर्वी एक भरपूर मोठ्ठा श्वास घेऊन श्वास सोडत ओं म्हणायचा आहे. ६. रोज साधारण १५ ते २० मिनिट ओंकार जप केला तर मनाला कमालीची शांतता अनुभवायला येणार आहे. ७. अगदी तान्ह्या मुलांना देखील ओंकार ऐकवला तर ते एकाग्रतेने ऐकतात असा अनुभव येतो. ८. सकाळीच नाही तर रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिट ओंकार जप करून झोपले तर शांत आणि स्वप्नविरहित झोप लागते. ९. उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनाही ओंकार जपाचा चांगला फायदा होतो. जप नुसता ऐकला तरी उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
ओंकार साधना करण्याचे फायदे
१. एकाग्रता, आकलनशक्ती, निर्णयक्षमता वाढते२. मेंदूतील सुप्त पेशी जागृत होतात.३. थायरॉईड विकार असेल तर अवश्य करावा.४. फुफुस्साला जास्तीत जास्त प्राणवायू मिळतो.५. हृदय विकाराच्या त्रासापासून बचाव हाऊ शकतो.
(लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)