Join us  

बाळ झाल्यावर किती दिवसांनी, कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2023 11:53 AM

When and How To Start Exercise After Delivery Fitness Tips : बाळाची काळजी घेताना आपलाही फिटनेस तितकाच महत्त्वाचा...

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटला मुलगी झाल्यानंतर काही दिवसांतच तिने आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आलियाचे योगा आणि विविध प्रकारचा व्यायाम करतानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आलियाने नुकतेच १०८ सूर्यनमस्कार घातल्याचे सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगितले होते. त्यामुळे आई झाल्यानंतर बाळाच्या तब्येतीबरोबरच आईचा फिटनेसही तितकाच महत्त्वाचा असतो. हे जरी खरे असले तरी, बाळ झाल्यानंतर किती काळाने व्यायाम करावा, कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा, व्यायाम करताना काय काळजी घ्यायला हवी. याबाबतचे अनेक प्रश्न नव्याने आई झालेल्यांच्या डोक्यात घुटमळत असतात (When and How To Start Exercise After Delivery Fitness Tips). 

आलिया आणि करीना कपूरची फिटनेस ट्रेनर असलेल्या अंशुका परवानी यांनी नुकतीच याविषयी माहिती शेअर केली आहे. त्या म्हणतात, तुम्हाला नुकतेच बाळ झाले असेल तर तुमचा दिवसातला बराच वेळ या बाळाची काळजी घेण्यात जात असेल. पण बाळाची काळजी घेताना तुमच्या स्वत:ची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशावेळी कोणी, कितीवेळ आणि कसा व्यायाम करायला हवा याविषयी त्या काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. त्यामुळे बाळ झाल्यावर तुम्हाला स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष द्यायचे असल्यास या टिप्स महत्त्वाच्या ठरतात. मात्र आपल्या फिटनेस ट्रेनरचाही सल्ला अवश्य घ्यायला हवा. 

१. जर तुमची प्रसूती गुंतागुंतीची नसेल, तर बाळंतपणाच्या 2-3 आठवड्यांनंतर व्यायाम करणे सुरक्षित आहे. शरीरावर अवाजवी दबाव पडणार नाही असे श्वासोच्छवासाचे आणि स्ट्रेचिंगच्या व्यायामाने सुरुवात करायला हवी. 

२. कोणता व्यायाम करावा असा कोणता थंब रुल नाही. प्रत्येक शरीर वेगळे असल्याने तसेच प्रत्येकाचा फिटनेस वेगळा असल्याने आपल्याला सूट होईल अशा व्यायामाची आपण निवड करु शकतो. नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर  2-3 आठवड्यानंतर आणि सी-सेक्शन असेल तर दिड महिन्यानंतर व्यायाम केलेला चालतो. 

३. मात्र सी सेक्शननंतर टाके टाके बरे व्हायला वेळ लागत असेल किंवा काही गुंतागुंत असेल तर मात्र व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. 

४. नियमित वर्कआउट रूटीनमध्ये परत येण्याने स्नायू बळकट होऊन टोन होण्यासही मदत होते. त्यामुळे प्रसूतीनंतर शरीर पुन्हा रुळावर येण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि प्रसूतीनंतरच्या लक्षणांना सामोरे जाण्यासाठीही व्यायामाची चांगली मदत होते. मात्र त्यासाठी आपल्या क्षमता आणि तब्येतीची स्थिती समजून घेणे गरजेचे असते. यासाठी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामप्रेग्नंसी