व्यायाम हा आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला माहित असल्याने आपण काही ना काही व्यायाम करायचा असे ठरवतो आणि त्याला सुरुवातही करतो. मग यामध्ये कधी चालणे, योगा, जिम, झुंबा, धावणे, सायकलिंग यांचा समावेश असतो. आता हा व्यायाम आपण एकतर झोपेतून उठल्या उठल्या करतो किंवा दिवसभराच्या कामातून फ्री झाल्यानंतर संध्याकाळी आपण व्यायाम करतो. पण या वेला व्यायामासाठी योग्य असतात का? प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वारालक्ष्मी याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्याच्या वेळेबाबत आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. नाहीतर आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते (Which Time is Wrong for Exercise).
कोणत्या वेळेला व्यायाम करु नये याविषयी...
१. पोट भरलेले असताना
आपले पोट खूप भरलेले असेल त्यावेळी अजिबात व्यायाम करु नये. यामुळे मेटाबॉलिक आणि पचनाशी निगडीत समस्या निर्माण होतात. त्यामुळे पचनक्रियेसाठी पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे पोट भरलेले असताना व्यायाम करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
२. झोपण्याआधी
अनेकांना दिवसभराचे शोड्यूल खूप टाईट असल्याने दिवसा व्यायाम करायला जमत नाही. अशावेळी व्यायाम चुकवायचा नसतो त्यामुळे हे लोक रात्री उशीरा व्यायाम करणे पसंत करतात. मात्र व्यायामाने वात वाढतो आणि डोकं आणि शरीर दिर्धकाळ अॅक्टीव्ह राहते. ज्यामुळे रात्रीची झोप उडण्याची शक्यता असते. व्यायाम झाला पण झोप पुरेशी झाली नाही तर शरीराच्या इतर तक्रारी सुरू होण्याची शक्यता असते. म्हणून झोपण्याआधी व्यायाम करणे योग्य नाही.
३. भूक लागलेली असताना
जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा पोटात काही रासायनिक प्रक्रिया घडते. अशावेळी आपण काहीही न खाता पिता व्यायाम केला तर पोटात अॅसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता असते. यामुळे पोटाशी निगडीत इतरही समस्या निर्माण होऊ शकतात.