गौरी पटवर्धन
व्यायाम करायचाच म्हणून भयंकर इरेला पेटलेले आणि चारच दिवसात कारणं सांगणारे, कंटाळा येऊन व्यायाम बंद करणारे/करणाऱ्या आपल्या अवतीभोवती काही कमी आहेत का? अनेक जण असे बहाद्दर. खोटं का? बोला,आपण बहुसंख्यही त्यातलेच. काहीजण शिस्तीचे, ते अपवाद. आता प्रश्न असा की, आपलं असं का? होतं ?
आपण काही व्यायाम सुरु करण्याचा खेळ एकदाच करत नाही. आपल्याला दर काही दिवसांनी व्यायाम करण्याची निकड वाटते आणि आपण व्यायाम सुरु करतोच. आणि मग कंटाळा येऊन तो बंद करतो. कारण व्यायामाचा कंटाळा येणं हा व्यायामाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे.
पण तरीही कंटाळ्याच्या बाबतीत एक गोष्ट सकारात्मक असते, ती म्हणजे तो तात्पुरता असू शकतो आणि आपण आपल्या बाजूने जरा जोर लावून तो घालवू शकतो. खरंच. सिरियसली. आपण कंटाळा घालवू शकतो आणि त्यासाठी अनेक वेळा अनेक लोकांनी सांगितलेला घिसापिटा उपायच कामी येतो. ‘वन स्टेप ऍट अ टाइम’. ‘एकावेळी एकाच पावलाचा विचार करा…’
अर्थातच व्यायामाच्या बाबतीत आपण हा एकावेळी एक पाऊल सिद्धांत शब्दशः घेऊ शकत नाही, पण एका वेळी एकाच दिवसाचा विचार करायचा. फार फार तर आठवड्याचा.
‘आता मी आयुष्यभर रोज चालायला जाईन.’ असं आपण ठरवतो तेव्हाच आपल्याला कंटाळा येऊ लागतो. पण एक महिना, एक आठवडा असं छोटं टार्गेट साध्य करणं तुलनेनं सोपं जातं. आणि खरं म्हणजे टार्गेट छोटंच ठेवावं, म्हणजे ते आपल्याला काही दिवसांनी बदलता येतं. चालायला जायला लागून तीन-चार महिने झाले की आपल्या चालण्याचा वेग आणि कालावधी दोन्ही बऱ्यापैकी वाढलेलं असतं.
एकदा आपल्या पायाच्या स्नायूंना या व्यायामाची सवय झाली की आपण हळूहळू त्यात थोडं जॉगिंग करायला सुरुवात करू शकतो. एक मिनिट चालायचं, दहा सेकंड जॉगिंग करायचं अशी सुरुवात करू शकतो. आणि मग आपल्या लक्षात येतं, की चालणं हा व्यायाम जितका एकसुरी आणि कंटाळवाणा वाटू शकतो तितका धावण्याचा कंटाळा येत नाही. उलट आपण जर सलग धावायला शिकलो तर त्याची आपल्याला झिंग चढते. ती बरीच पुढची पायरी असते, पण निदान मध्ये मध्ये जॉगिंग करता यायला लागलं, तरी त्यामुळे बराच जास्त घाम येतो, श्वास फुलतो, दम लागतो, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि एकूणच आपण छान काहीतरी व्यायाम केला आहे अशी भावना मनात निर्माण होते.
पण या पायरीपर्यंत पोचायला सुद्धा किमान काही काळ चालायला जावं लागतं. आपला जर तोवरसुद्धा दम टिकणार नाही असं वाटलं, तर त्यासाठी इतर काही मार्ग आपण अवलंबू शकतो. त्यातला सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे रोज वेगळा एरोबिक व्यायाम करायचा. किंवा दोन-तीन प्रकारचे व्यायाम आलटून पालटून करायचे. असे बदलून बदलून व्यायाम केले तर आपल्याला त्यात जास्त मजा येते. चालण्याचा जसा व्यायाम करता येतो तसं सायकल चालवायला जाता येतं. जिने चढणं हा एक असा सहज करण्यासारखा व्यायाम आहे. यातल्या प्रत्येक व्यायामाची सुरुवात हळूहळू करायची आणि मग आलटून पालटून वेगवेगळे व्यायाम करायचे बरेच फायदे होतात. पहिला अर्थातच हा की कंटाळा येत नाही.
तर कंटाळ्याचा असा बंदोबस्त करुन एक पाऊल पुढे टाकता येतं.