वृषाली जोशी - ढोके
बाय वन गेट वन फ्री! फ्री! फ्री! अश्या ऑफर्स चटकन लक्ष वेधतात, आणि आपण पण अश्या ऑफर्स कुठे आहेत का हे शोधतही असतो. आपले योगशास्त्र सुद्धा आपल्यासाठी ऑफर घेऊन आलेले आहे. योगासने करा आणि मनःशांती, चिरकाल टिकणारा आनंद आणि अध्यात्मिक प्रगती फ्री मिळवा. इथे तर एकापेक्षा अधिक गोष्टी फ्री मिळणार आहेत मग आपण आता थोडे स्वार्थी होऊ आणि या सगळ्या फायद्याच्या गोष्टी कशा पदरात पाडून घेता येतील त्या बघू . योग या शब्दाची व्युत्पत्ती मूळ संस्कृत धातू 'युज' या पासून झाली आहे ज्याचा अर्थ जोडणे, एकत्र येणे, किंवा मिलन असा होतो. म्हणजेच बघा आपण कोणाला खूप वर्षांनी कुठे तरी अचानक भेटलो तर पटकन म्हणतो काय 'योगायोग आहे ना आज '. म्हणजेच योग याचा अर्थ लावायचा झाला तर आत्म्याची परमातम्याशी भेट घडवून आणणे किंवा एकमेकांना ते जोडणे.
आता ही भेट कशी घडवून आणणार? तर त्या साठी साधना करणे आवश्यक आहे आणि त्या साधनेसाठी योग करणे गरजेचे आहे कारण योग ही एक साधना आहे तसेच विज्ञान आणि जीवनशैली आहे. मानवी जीवनात योग अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. 'योग' द्वारे मानवाचा भौतिक आणि अध्यात्मिक विकास होणे अतिशय सहज शक्य आहे.
१. भौतिक विकास :- म्हणजेच आपला शारीरिक आणि मानसिक विकास. हे एक साधारण उद्दिष्ट आहे. जसे की आसनं केली की शरीर सुदृढ आणि निरोगी राहते. प्राणायाम आणि ओमकार जप केल्याने मनाची एकाग्रता वाढते,मनःशांती मिळते, मानसिक आनंद मिळतो, सकारात्मकता वाढते, मन प्रसन्न राहते. शरीर आणि मन जेव्हा निरोगी असेल तेव्हा आपण कोणतीही साधना सहज करू शकतो.
२. अध्यात्मिक विकास :- योगचे मूळ ध्येय हे समाधी आहे. इथे समाधी या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूप जाणून घेणे, आत्मानंदात रमणे किंवा ज्या अवस्थेत मनाची कमालीची शांतता मिळते असा घ्यायला सांगितला आहे. म्हणजेच काय तर योगाभ्यास केल्याने आपल्या मनात सतत चालू असलेले विचार जसे की ही एक गोष्ट आहे ती करू की नको, केले तर काय होईल,
नाही केले तर काय होईल अशा द्वंद्वा मध्ये अडकलेल्या मनाला स्थिर करणे सहज शक्य आहे. आणि त्या चंचल मनाला स्थिर केल्या नंतर आपल्याला सहज अंतर्मुख होता येईल. अंतर्मुखतेतून आत्मद्याना कडे सहज जाता येईल आणि निर्भेळ आनंद अनुभवता येईल.
सद्य परिस्थितीत मध्ये आपण फक्त भौतिक विकास एवढंच ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. जसे की डॉक्टरांनी सांगितले म्हणून योग वर्गाला शिकायला जाणे, किंवा कुठल्या तरी आजाराची सुरुवात होते म्हणून योगा कडे वळणे किंवा अगदी वरवर बघितले तर सकाळी सकाळी बरेच लोक योगामॅट घेऊन जाताना रस्त्याने दिसतात म्हणून आपणही फॅड म्हणून योगा कडे वळतो. शास्त्रकारांनी आपल्याला अध्यात्मिक उन्नती साठी योगशास्त्र दिले आहे जेणे करून आपण आपले शरीर निरोगी आणि निकोप ठेऊ शकू आणि समाधी पर्यंत पोहचू शकू पण योगा मागची मूळ अध्यात्मिक बैठक आपण विसरून गेलो आहोत आणि एक उपचार पद्धती म्हणून आपण त्या कडे बघत आहोत.
त्यामुळे योग करताना मुळात आपण हे करतो आहोत, हे फक्त आसनांपुरतं मर्यादित आहे की आपण जीवनशैली म्हणून स्वीकारणार आहोत हे ठरवायला हवं. ते ठरवलं तर योग शिकणं जास्त अर्थपूर्ण होईल!
( लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)