अभिनेत्री नीना गुप्ता या 62 वर्षांच्या असल्या तरी तरुणांनाही लाजवेल इतका त्यांच्यात उत्साह आणि ऊर्जा आहे. सध्या त्यांची ‘सच कहूं तो’ या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकामुळे खूप चर्चा होते आहे. समाज माध्यमांवरही नीना या खूप सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्यांनी धनुरासन हे योगासनातील आसन करतानाचा फोटो पोस्ट केला होता. या वयातही त्यांच्यातली लवचिकता हा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला. कारण शरीर लवचिक असल्याशिवाय योग्य पध्दतीनं धनुरासन करता येत नाही. समाज माध्यमांवर त्यांनी नुकताच भ्रामरी प्राणायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे मनशांतीसाठी भ्रामरी प्राणायाम किती महत्त्वाचा आहे हा संदेश त्यांनी दिला आहे. ध्यानधारणा करण्याची ज्यांना इच्छा आहे पण त्यासाठी लागणारी मनाची एकाग्रता ज्यांना साध्य होत नाही त्यांच्यासाठी भ्रामरी प्राणायाम हा योग्य पर्याय आहे. भ्रामरी प्राणायाम नियमित केल्यास ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली एकाग्रता साध्य होते.
भ्रामरी प्राणायाम कसा करावा?
भ्रामरी प्राणायाम हे नाव भ्रमर अर्थात मधमाशीच्या नावावरुन पडलं. हा प्राणायाम करताना श्वास सोडताना कंपन स्वरुपात जो आवाज होतो तो मधमाशीच्या गुणगुण्यासारखा होतो.भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी कोणत्याही ध्यानमुद्रेत बसावं. पद्मासन, वज्रासन, सिध्दासन या कोणत्याही आसनात बसावं. दोन्ही डोळे बंद करावेत. दोन्ही कान हाताच्या अंगठ्यांनी बंद करावे. दोन्ही हाताचे पहिले बोट भुवयांच्या वर ठेवावं मधली दोन बोटं आणि करंगळीनं डोळे झाकावेत.एक दीर्घ श्वास घ्यावा. जीभ टाळूला लावावी. तोंड बंद ठेवावं पण दातांमधे अंतर ठेवावं. श्वास नाकावाटे बाहेर सोडावा आणि तो सोडताना मधमाशीसारखा गुणगुण्याचा आवाज करावा. दम टीकेपर्यंत हे गुणगुणनं चालू ठेवावं. मग थांबून पुन्हा पहिल्यासारखं करावं. अशी पाच ते सात किंवा क्षमतेनुसार आवर्तनं करावीत. सुरुवातीला हा गुणगुणण्याच्या आवाजाचे कंपन केवळ गळ्यात जाणवतात. पण नियमित सराव केल्यास डोक्यापासून संपूर्ण शरीरात हे कंपन जाणवतं. गुणगुणतांना ‘न’ या तालव्य ध्वनीचा वापर करावा. म या ओष्ठ्य ध्वनीचा वापर करु नये. अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करताना कान जोरात दाबू नये. श्वास घेताना तो नाकाने घ्यावा तोंडाने नाही. भ्रामरी प्राणायाम करताना आजूबाजूच्या आवाजानं लक्ष विचलित होवू नये म्हणून डोळे आणि कान बंद करायचे असतात. तोंडाद्वारे होणार्या कंपनामुळे लक्ष एकाग्र होतं.
भ्रामरी प्राणायाम का करावा?
- नियमित भ्रामरी प्राणायाम केल्यानं बुध्दी वाढते.
- राग येत नाही. मन शांत राहातं.
- उच्च रक्तदाबाची समस्या भ्रामरी प्राणायामच्या नियमित सरावानं कमी होते.
- रात्री झोप शांत लागते.
- डोकेदुखीचा त्रास असल्यास भ्रामरी प्राणायामच्या सरावानं तो कमी होतो.
- भ्रामरी प्राणायामामुळे आवाज गोड होतो.
- गरोदरावस्थेत हा प्राणायाम केल्यास त्याचा फायदा होतो.