डॉ. देविका गद्रे
‘जुन्या काळातल्या गुंतता हृदय हे ’.. या गाण्यापासून ते अगदी आत्ताआत्ताच्या ‘ हृदयात वाजे समथिंग’ या गाण्यापर्यंत अनेक सदाबहार गाण्यांनी हृदयाबद्दलची व्यथा मांडली आहे. गाण्यात असो व खऱ्या आयुष्यात, खरोखरीच किती महत्व आहे नाही आपल्या हृदयाला! आपण जसे आपल्या हातापायांकडे व हालचालींकडे नीट लक्ष देतो तसे हृदयाकडे देतो का? हार्ट अटॅक किंवा बायपास सर्जरी याबद्दल सर्वांनीच ऐकलं असेल. आजकाल हार्ट अटॅकच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे. तसेच पुरुषांइतकाच वयाची पन्नाशी पार केलेल्या स्त्रियांनाही हार्ट अटॅकचा धोका संभवतो. परंतु मुळात हे सगळं कशामुळे उद्भवतं व त्यासाठी कोणते उपचार आवश्यक असतात तसेच यात फिजिओथेरपीला काय महत्व असते या व अशा अनेक गोष्टींबद्दल आज जाणून घेऊयात.
ढोबळमानाने सांगायचं झालं तर आपल्या हृदयात ४ मुख्य भाग असतात जे रक्ताभिसरण क्रियेचे काम करतात. हृदयाला रक्तपुरवठा करण्याचे काम कोरोनरी आर्टरी (रक्तवाहिन्या) करतात. या रक्तवाहिन्या जेंव्हा निमुळत्या होतात (ज्याला आपण हृदयातील ब्लॉकेज म्हणतो) तेंव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊ लागतो व त्यामुळे साहजिकच हृदयाचे कार्य मंदावते. हार्ट अटॅक येण्याचे हे सर्वसाधारण कारण आहे. तसेच हृदयातील अजून काही ठिकाणी होणारे बिघाडही हृदयाच्या समस्यांसाठी जबाबदार असू शकतात.हृदयाच्या बाबतीत सर्वाधिक ऐकिवात येणारी शस्त्रक्रिया म्हणजे बायपास सर्जरी म्हणजेच वैद्यकीय भाषेत कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (CABG). यात कोरोनरी आर्टरीचे काम मंदावल्यामुळे त्याठिकाणी शरीरातील दुसरी नस वापरून कोरोनरी आर्टरीला बायपास करण्यात येते म्हणजेच शरीरातील दुसरी नस कोरोनरी आर्टरीचे कार्य पार पाडते. ह्यासाठी सामान्यतः पायातील नसेचा वापर केला जातो. ह्या शस्त्रक्रियेआधी ईसीजी, इकोकार्डिओग्रॅम, अँजिओग्राफी, छातीचा एक्स रे, रक्त व लघवीची तपासणी इत्यादी चाचण्या, रक्तवाहिन्यांतील बिघाडाचे स्वरूप व रुग्णाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन मगच डॉक्टर सर्जरीचा सल्ला देतात.शस्त्रक्रियेच्या आधी व नंतर फिजिओथेरपी करणे का अत्यावश्यक आहे?यामुळे रुग्णाच्या रोजच्या क्रिया सुखकर होतात, हृदयाची कार्यक्षमता वाढते, नियमित व्यायाम केल्याने हृदयाच्या बाकी आजारांचा धोकाही कमी होतो. शस्त्रक्रियेआधी रुग्णाला मानसिक आधार दिला जातो, त्याला शस्त्रक्रियेसंबंधी सर्व माहिती सांगण्यात येते तसेच रुग्णाच्या कुटुंबियांनासुद्धा शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी व इतर गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगितले जाते. थोडे श्वासाचे व्यायाम, शरीरात साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण तंत्रांचा वापर, हाताच्या हालचालींसाठीचे व्यायाम इत्यादी गोष्टी रुग्णाला शिकवल्या जातात.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची हृदयाची गती, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, श्वासाची गती इत्यादी बाबींवर कडक लक्ष ठेवण्यात येते. सर्व स्तरांवर रुग्ण स्थिरावल्याची खात्री झाली की मगच फिजिओथेरपी सुरु करण्यात येते. ह्यासाठीच्या फिजिओथेरपीची विभागणी ४ टप्प्यांमद्धे करण्यात आली आहे.
पहिला टप्पा
फिजिओथेरपीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णालयातील सुरुवातीच्या ५ दिवसांचा समावेश होतो.(शस्त्रक्रियेनंतरच्या दिवशी) पहिला दिवस: रुग्णाचा व्हेंटिलेटर काढला जाऊन रुग्ण स्वतः श्वासोच्छवास करू शकतो. त्यामुळे हळुवार श्वासाचे व्यायाम शिकवले जातात.दुसरा दिवस: रुग्णाच्या बेडला सेमी फाऊलर पोझिशनमध्ये म्हणजेच थोडे वर उचलण्यात येते. तसेच रुग्णास चेस्ट बाईंडर नावाचा एक पत्ता छातीला बांधण्यासाठी देण्यात येतो. तसेच दुसऱ्या दिवसापासून रुग्णाला चेस्ट फिजिओथेरपीमधील काही तंत्रे शिकवण्यात येतात ज्यामुळे कफ बाहेर काढण्यास मदत होते. यासोबतच स्पायरोमीटरनावाच्या यंत्राने व्यायाम शिकवण्यात येतात व श्वासाचे व्यायामही शिकवले जातात. पायाच्या पावलांसाठीचे व्यायामही करण्यात येतात ह्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.तिसरा दिवस: दुसऱ्या दिवशीच्या व्यायामांसोबतच खांद्याचे, कोपरांचे, मनगटाचे व हाताच्या बोटांचे काही व्यायाम देण्यात येतात. तसेच पायासाठी खुब्याचे व्यायाम, गुडघा दुमडण्याचे व्यायाम इत्यादी व्यायामांवर भर दिला जातो. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे तिसऱ्या दिवशी रुग्णाला बेड वर उठून बसवण्यात येते.चौथा दिवस: आधीचे सर्व व्यायाम करून त्यात थोड्याश्या चालण्याची भर करण्यात येते. रुग्ण स्वच्छतागृहात चालत जाऊ शकण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच शरीरात ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी काही व्यायाम शिकवले जातात.पाचवा दिवस: आधीचे व्यायाम करून झाल्यावर रुग्णाला उभे राहून काही व्यायाम शिकवण्यात येतात. पाचव्या दिवशी रुग्णास हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात येते.
दुसरा टप्पाहा सहाव्या दिवसापासून ६ आठवड्यांपर्यंत असतो. सर्वप्रथम शस्त्रक्रिया यशस्वी होऊन घरी आल्याने रुग्ण आनंदात असतात. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था हळू हळू सुधारत असते. या टप्प्यात रुग्णाला श्वासाचे व्यायाम, ऑक्सिजन वाढवण्यासाठीचे व्यायाम, मर्यादित चालणे, घरातील छोट्या छोट्या कामांना सुरुवात करणे इत्यादी गोष्टी करण्यास प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक व्यायाम १० वेळा करा, व्यायाम करताना मंद गतीने श्वासोच्छवास सुरु ठेवा, श्वास रोखून धरू नका इत्यादी सूचना दिल्या जातात.
तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यात सहावा आठवडा ते बारावा आठवडा यांचा समावेश होतो. यात फिजिओथेरपिस्ट रुग्णाला शरीराची ताकद वाढवण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे व्यायाम देतात. ट्रेडमिल वर चालणे, हाताचे व पायांचे ताकदीसाठीचे व्यायाम, लवचिकता वाढवण्यासाठीचे व्यायाम इत्यादी व्यायाम देण्यात येतात.
चौथा टप्पा म्हणजे मेंटेनन्स फेज. म्हणजेच आत्तापर्यंत शिकलेल्या सर्व गोष्टींना व व्यायामांना सुरु ठेवून जास्तीत जास्त प्रगती करणे व आपल्या रोजच्या कामांना नेहमीप्रमाणे सुरुवात करणे.
शस्त्रक्रियेनंतर लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी
१) जखमेची व टाक्यांची नीट काळजी घ्या.२) औषधं वेळेवर घ्या३) हृदयाची व फुफुसांची ताकद वाढवण्यासाठी फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने योग्य ते व्यायाम करा४) रोजच्या दिनक्रमांमध्ये आवश्यक ते बदल करून चांगल्या सवयी जोपासा.हृदयाच्या संदर्भात अजून एक मोठा मुद्दा असतो तो म्हणजे ताणतणाव (स्ट्रेस). बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींचाही ताण घेण्याची सवय काहींना असते. कधी कधी नकळत हा ताण आपल्या मानसिक आरोग्याचे संतुलन बिघडवून टाकतो. म्हणूनच शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक आरोग्याची विशेष खबरदारी घ्या व हृदयाला सदाबहार आणि तंदुरुस्त ठेवा!
(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)devikagadre99@gmail.comhttps://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/