आपण कोणत्याही वयात असताना एकदम फिट आणि हेल्दी असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र जसजसे वय उतरत जाते तसे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या व्याधी डोकं वर काढतात. वयाची चाळीशी उलटल्यानंतर महिला असो किंवा पुरुष त्यांना काही ना काही शारीरिक त्रास होतोच. चाळीशी नंतर पुरुषांपेक्षा महिलांना अधिक आरोग्यासंबंधित विकार होत असल्याचे दिसून येते. महिलांना चाळीशीनंतर पाठ, हातपाय, घुडघे दुखण्याच्या समस्या उद्भवू लागतात. अशा वेळी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासोबतच योग्य डाएट, व्यायाम, योगा केल्यास त्यांच्या आरोग्याला ते फायदेशीर ठरू शकते.योगासाधनेत विविध प्रकार असून शरीराच्या प्रत्येक भागासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे जर आपण चाळीशीच्या वयातील महिला असाल तर ही काही योगासने आपणांस फायदेशीर ठरु शकतात. वयाची चाळीशी पूर्ण झाल्यावर कोणती योगासने करावीत ते समजून घेऊयात(Yoga Poses for Women Over 40).
कोणती आहेत योगासने ?
१. बालासन - मांड्या, पोटऱ्या यांच्यावर ताण येऊन तेथील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरेल.
बालासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनाची अवस्था घेऊन योगा मॅट किंवा सतरंजीवर बसा.त्यानंतर पायाचे तळवे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करा.गुडघे शक्य होतील तेवढे एकमेकांपासून दूर करा. आता कंबरेतून खाली वाका आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमचे पोट, छाती असेल, अशा पद्धतीने शरीराची अवस्था घ्या. डोके खाली जमिनीवर टेकवा आणि हात समोरच्या बाजूने सरळ रेषेत पसरवा.
२. सेतुबंधासन - सेतुबंधासन केल्याने छाती, मान आणि कण्याला ताण मिळतो. या आसनाने पचनक्रिया चांगली होते.
सर्वात प्रथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून कमरेचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे करताना दोन्ही हात जमिनीवरच चिकटून ठेवा. कमरेचा भाग जितका शक्य होईल तितकाच वर उचलावा. सवयीनुसार आणि शरीराच्या लवचिकतेनुसार त्याची क्षमता वाढवता येईल. या स्थितीत काही सेकंदं थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या स्थितीत यावे.
३. वीरभद्रासन - वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या आणि पाठीचे स्नायू बळकट होतात.
सर्वप्रथम हात जोडून सरळ उभे रहा. दोन्ही पायांत ३-४ फूट अंतर असू द्या. उजवा पाय बरोबर समोर नेऊन गुडघ्यात वाकवा जेणेकरून तुमच्या पायांमुळे ९० अंशाचा काटकोन तयार होईल. डावा पाय सरळ रेषेत मागे न्या. दोन्ही हात उचलून खांद्यांच्या रेषेत आणावे. हात जमिनीस समांतर आहेत का हे तपासून पहा. त्यानंतर श्वास सोडत उजव्या गुडघ्यातून वाका आणि उजवीकडे वळून पहा. या आसनात स्थिर उभे रहा. नंतर हीच कृती डाव्या बाजूसही करा. यावेळी डावा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस तर उजवा पाय सरळ रेषेत मागे न्या.
४. फुलपाखरू आसन - फुलपाखरू आसन केल्याने पाठदुखी आणि स्नायूंचा ताण दूर होतो त्याचबरोबर रक्ताभिसरणही सुधारते.
फुलपाखरू आसन करण्यासाठी योगा मॅटवर सूर्याकडे तोंड करून निवांत मुद्रेत बसावे. मग आपले दोन्ही पाय पुढे पसरवून गुडघ्यात वाकवा, ज्यामुळे दोन्ही पायांचे तळवे एकमेकांशी जोडले जातील. आता दोन्ही हातांनी पायांचे तळवे घट्ट पकडून पाय वरखाली हलवा. सुरुवातीला एक-दोन मिनिटे हे आसन करा, नंतर हळूहळू आपल्या क्षमतेनुसार त्याचा वेळ वाढवा.