धावपळीच्या जीवनशैलीत आज जवळपास प्रत्येक व्यक्ती वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. (Weight loss) वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. यानंतरही त्यांचे वजन कमी होत नाही. जीम, डाएट करून वजन कमी होईल असं वाटतं पण अनेकांना त्यामुळे फरक जाणवत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत जिने केवळ एका वर्षात कोणतीही शस्त्रक्रिया न करता 55 किलो वजन कमी केले आहे. (Woman lost 55 kg in just 15 months)
रोज चालायला जाऊन 55 किलो वजन घटवलं
तुमचा विश्वास बसणार नाही पण या महिलेने केवळ संतुलित आहार घेऊन आणि रोज चालून तब्बल ५५ किलो वजन कमी केले आहे. या 27 वर्षीय महिलेनं वजन कमी करण्यासाठी फळे आणि भाज्यांच्या ज्यूसचाही आहारात समावेश केला. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, न्यू साउथ वेल्सची रहिवासी सिसिली गुडविन दिवसभरात 10-10 कप कॉफी प्यायची. याशिवाय तिला केएफसी फूड खाण्याचीही आवड होती.
या सवयींमुळे तिचे वजन 128 किलोवर गेले होते. जेव्हाही ती स्वत:ला आरश्यात पाहायची तेव्हा खूप न्यूनगंड वाटायचा. त्यानंतर तिनं वजन कमी करण्याचा विचार केला. आपल्या आहारात जंक फूडऐवजी हेल्दी पदार्थांचा समावेश केला. त्यानंतर अवघ्या 15 महिन्यांत महिलेचे 55 किलो वजन कमी झाले.
ताण तणाव घेणं पूर्ण बंद केलं
सिसिलीनं सांगितलं की वजन कमी करण्यासाठी तिने टेंशन घेणे बंद केले. ती नेहमी रिलॅक्स मूडमध्ये असायची. यादरम्यान बाहेरचे खाणं सोडले नाही. अधून मधून ती चॉकलेट्सही खायची. आधीचा आहार बदलून पूर्णपणे निरोगी खाणे सुरू केले आणि काही महिन्यांत जिममध्ये न जाता 20 किलो वजन कमी केले.
यादरम्यान ती फक्त पायीच चालायची. ती दिवसातून 3 लिटर पाणी प्यायची. रोज तिला किमान 10,000 पावलं चालावं लागत होतं. ती रोज 100 स्क्वॅट्स करायची. चालणं, घरगुती व्यायाम आणि आहारातील बदलांमुळे वजन कमी करण्यात यशस्वी झाल्याचं ती सांगते.