महिला वर्ग म्हणजे सतत काही ना काही कामात व्यस्त असणारा वर्ग. घरातली कामं तर संपता संपत नाहीत. त्यात सणवार, पाहुणेरावळे, आजारपणं असं सगळं करताना आपली अगदी दमछाक होऊन जाते. यात ऑफीसचे टार्गेट्स, डेडलाईन्स असतातच. घर, ऑफीस सगळं सांभाळता सांभाळता आपण रोजच्या धबडग्यात पार अडकून जातो. घरातील प्रत्येकासाठी आपण सतत काही ना काही करत राहतो. हे सगळं करता करता आपण स्वत:ला प्राधान्य द्यायलाच विसरतो. आपल्याला आपल्यासाठी असा काही वेळ दिवसभरात मिळायला हवा असंही आपल्याला बरेचदा वाटून जातं. पण तो काढणं शक्य होतंच असं नाही. महिला दिन म्हणून या दिवशी आपला खास सन्मान केला जातो. पण आपण खरंच स्वत:कडे इतकं लक्ष देतो का? प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहोली यासाठीच एक महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करतात. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या आपल्याला स्वत:साठी काय करायला हवं यासाठी एक सोपी ट्रिक सांगतात (Women's Day Special).
ही एक सोपी गोष्ट तुम्ही रोज कराच..
दररोज न चुकता १० मिनीटे स्वत:साठी काढा असे त्या म्हणतात. या १० मिनीटांत तुम्ही तुम्हाला हवे ते काहीही करु शकता. आवडते वाचन करा, गाणी ऐका किंवा अगदी काहीच करु नका. पण हा वेळ तुम्ही खास तुमच्यासाठी राखून ठेवा. तुम्हाला वाटलं तर डायरीमध्ये काहीतरी लिहा, गाणी म्हणा पण हा वेळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच असेल हे लक्षात ठेवा.
हे का करायचं?
आपण सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना किंवा सगळं काही करत असताना स्वत:ला मात्र पुरेसं महत्त्व देत नाही. अशाप्रकारे नियमितपणे काही वेळ स्वत:साठी काढला तर तुम्हाला नक्कीच शांत वाटायला याची मदत होईल. तुम्ही नकळत स्वत:वर प्रेम करायला लागाल. वाटायला ही अतिशय साधी वाटणारी गोष्ट आहे पण प्रत्यक्षात अशाप्रकारे स्वत:साठी वेळ काढणं वाटतं तितकं सोपं नाही.