-डॉ. देविका गद्रे
हल्ली वर्क फ्रॉम होम म्हणजे ‘ऑन ड्युटी २४ तास ’असं काहीसं झालंय. कामाच्या वेळेचे न ठरलेले स्वरूप,
घरातल्या कामांसोबत कार्यालयीन कामे करताना उडणारी तारांबळ आणि हे सगळं करताना उद्भवणारी दुखणी असं काहीसं चित्र घराघरात दिसू लागलंय. वेळेबरोबरचं कामाचं समीकरण कधीच मागे पडलंय. खाजगी कार्यालये मात्र वर्क फ्रॉम होमचा भविष्यकाळासाठीही विचार करताना दिसत आहेत. या सगळ्यामध्ये घरुन काम करणाऱ्यांना तब्येत सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर आज जाणून घेऊयात घरून काम करताना का व कोणते त्रास उद्भवू शकतात आणि त्यांच्यावरचे उपाय काय आहेत. घरून काम करताना येणाऱ्या समस्यांना स्नायू व सांध्यांचे विकार (Musculoskeletal Disorders) असे
म्हणतात. ह्यात हाडे किंवा स्नायूंच्या समस्या (पाठदुखी, मानदुखी किंवा मनगट दुखणे), नसांच्या समस्या (Nerve
Entrapment), रक्ताभिसरण क्रियेच्या समस्या, स्नायूंच्या कंडरांना सूज येणे (tendon injuries) अशा प्रकारच्या
समस्यांचा समावेश होतो.
या समस्या का उद्भवतात?
१) सतत एखादी क्रिया केल्याने त्रास होऊ शकतो. संगणकासमोर बसलेले असताना मनगटाची हालचाल
अनेक वेळा होत असते. याचा ताण मनगटाच्या हाडांवर आणि स्नायूंवर पडू शकतो. तसेच बऱ्याच लोकांना काम
करताना लेखणी घट्ट पकडण्याची सवय असते. इथे जास्त ताकद वापरली गेल्याने बोटांच्या पेरांवर ताण येतो.
२) घरात कार्यालयासारखी कामाला बसण्यासाठी वेगळी जागा असतेच असं नाही. त्यामुळे जर चुकीच्या
प्रकारे बसले गेले तर पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंवर वाईट परिणाम होतो. दिवसभर अशा स्थितीत बसल्याने ह्या शारीरिक स्थितीची सवय होते व त्यामुळे शरीराच्या मूळ स्थितीत बदल घडून येतात.
३) एकाच शारीरिक स्थितीत खूप काळासाठी बसले गेल्याससुद्धा त्रास होऊ शकतो. एकाच प्रकारच्या
स्नायूंचा सतत वापर झाल्याने पोक येण्यासारख्या समस्या दिसू लागतात व त्यांची कार्यक्षमता मंदावते.
आपल्या शरीरातील हाडांना आणि स्नायूंना एक मूळ स्थिती प्राप्त झालेली असते. स्नायूचे काम आणि
त्याचा वापर ह्याप्रमाणे ही रचना ठरलेली असते. तसेच कोणत्या दिशेला स्नायू किती हलू शकतो हे सुद्धा ठरलेले
असते. कोणतीही समस्या जाणवत असल्यास लगेचच डॉक्टरचा वा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.
फिजिओथेरपिस्टकडे गेल्यावर प्रथम तुमची व्यवस्थित तपासणी केली जाते. तुमच्या कामाचं स्वरूप, तुमची काम
करतानाची शारीरिक स्थिती आणि येणाऱ्या समस्या ह्याबद्दल पाहणी केली जाते. त्यानंतर तुमच्या समस्येप्रमाणे
व्यायाम व उपाययोजना सांगितल्या जातात.
आता घरून काम करताना होणारे आजार व त्यांच्या उपचारांबद्दल माहिती घेऊ.
१) कार्पल टनेल सिन्ड्रोम: मनगटाच्या अस्थिरज्जूला (लिगामेंट) होणारी इजा, सूज ह्यामुळे हा
आजार उद्भवतो. मनगटाच्या आजूबाजूला दुखणे, तिथली शक्ती गेल्यासारखी वाटणे, झिणझिण्या येणे,
एखादी गोष्ट उचलताना त्रास होणे यासारख्या समस्या कार्पल टनेल सिन्ड्रोममद्धे दिसून येतात. यासाठी
डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
फिजिओथेरपिस्ट ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम सांगतात. जसे की मनगट खाली वर
करणे, गोल फिरवणे, थेराबँड वापरून व्यायाम करणे इत्यादी. या व्यायामांमुळे दुखणे कमी व्हायला मदत
होते.
(थेराबँड वापरून व्यायाम)
२) क्यूबायटल टनेल सिन्ड्रोम: हातातील अलनार नावाच्या नसेला झालेल्या इजेमुळे वा ही नस २
स्नायूंमद्धे अडकल्यामुळे हा आजार होतो. ह्याची लक्षणे कोपरांमद्धे दिसून येतात. सतत कोपर दुमडणे
किंवा अतिशय कठीण पृष्ठभागावर कोपर विसावणे ह्यामुळे ह्या आजाराचा धोका संभवतो. कोपरापासून
खाली करंगळीपर्यंत मुंग्या येणे, तेथील संवेदना कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात.
फिजिओथेरपिस्ट यासाठी कॉमप्रेशन बॅंडेजचा वापर करण्याचा सल्ला देतात. तसेच विविध व्यायाम
प्रकार मदतीला असतात. ह्याप्रमाणे कठीण पृष्ठभागावर कोपर न विसावण्याचा प्रयत्न करा. ह्यामुळे
अनावश्यक दाब कमी होतो.
(कॉम्प्रेशन बँडेज)
३) थोरॅसिक आउटलेट सिन्ड्रोम: आपल्या काखेत ‘ब्रॅकीयल प्लेक्सस’ नावाचं एक नसांचं जाळं
असतं. ह्या भागाला सतत लागणाऱ्या धक्क्यामुळे किंवा त्यावर आलेल्या ताणामुळे तिथल्या स्नायूंना सूज
व घट्टपणा येतो. आणि ह्यामुळे आपल्या मूळ शारीरिक स्थितीत बदल दिसू लागतात. हातात
झिणझिण्या येणे, मुंग्या येणे, डोक्यावर हात नेताना त्रास होणे व दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.
ह्यासाठी फिजिओथेरपिस्ट काही यंत्रांच्या सहाय्याने मदत करतात. तसेच काही व्यायामप्रकारही
शिकवतात. ह्यात ऍक्टिव्ह असिस्टेड व्यायामाचा चांगला उपयोग होतो. म्हणजेच रुग्णाने व्यायाम
करताना थेरपिस्टने केलेली मदत. ह्यामुळे व्यायाम करताना दुखणे कमी होऊन लवकर सुधारणा होण्यास
मदत होते.
ह्या लेखात आपण घरून काम करताना होणारे नसांसंबंधित आजार व त्यावरील उपाय पहिले.
पुढील लेखात स्नायूंचे व स्नायू कंडरांचे आजार आणि त्यावरील उपचारपद्धती पाहू.
(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)
devikagadre99@gmail.com
https://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/