मयूर पठाडे
सायकल हे गरीबांचं, सर्वसामान्य लोकांचं वाहन आहे, असं मानलं जात असलं तरी सध्या जगभरात श्रीमंतांमध्ये सायकलिंगची आवड मोठ्या प्रमाणात पसरली आहे आणि श्रीमंतांचं, सुखवस्तु घरातल्या लोकांचं सायकल चालवण्याचं प्रमाणही वाढलं आहे, असं सांगितलं तर कोणालाही आश्चर्य वाटेल. आता अनेक महिलाही उत्तम सायकलिंग करत नवनवे विक्रम करत आहेत. आपली तब्येत चांगली राखत आहेत. याचं कारण सायकलिंगमुळे होणारे शारीरिक, मानसिक फायदे. पर्यावरणाच्या दृष्टीने तर सायकल हे एकमेव असं वाहन आहे, जे शून्य टक्के प्रदुषण करतं. कोरोना काळात तर सायकलिंगचं महत्त्व अधिकच अधोरेखित झालं. आजही अनेक देशांत सार्वजनिक वाहतुकीला, कार, मोठमोठ्या गाड्या रस्त्यावर आणायला प्रतिबंध असला तरी सायकलिंगला मात्र उत्तेजन दिलं जात आहे.
भारत सरकारही त्याला अपवाद नाही. मोठमोठे प्रतिष्ठित लोकही सायकलिंग करीत असल्यानं आता त्याला ग्लॅमर प्राप्त झालं आहे. प्रत्येकाला फिट ठेवणारं हे वाहन आता फक्त गरीबांचं राहिलेलं नाही. अतिशय स्वस्त, चालवायला सहजसोपं आणि अनेक आजारांना गुंडाळून ठेवणारं हे वाहन तब्बल दोनशे वर्षांपासून प्रचलित असलं तरी सध्या सायकलिंगला सुगीचे दिवस आहेत. सायकलिंगमुळे होणारे फायदे पाहूनच संयुक्त राष्ट्रसंघानंही एप्रिल २०१८ रोजी तीन जून हा आंतरराष्ट्रीय सायकल दिवस’ म्हणून घोषित केला.
नियमित सायकलिंगमुळे तुमचं हृदय मजबूत होतं, शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद वाढते. सांध्यांची गतिशीलता वाढते. मानसिक ताण कमी होतो, शरीराची ठेवण सुधारते, त्यातला समन्वय वाढतो. हाडांची क्षमता वाढते, चरबी कमी होते..
सायकलिंगचे आणखी किती फायदे सांगायचे? नियमित सायकलिंगमुळे येणारा आत्मविश्वास कोरोना आणि इतर आजारांपासून तर तुम्हाला दूर राखेलच, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला ‘श्रीमंत’ बनवेल. गर्भश्रीमंत, धनाढ्य लोकही आज सायकलिंगकडे वळले ते यामुळेच! शरीरिक श्रीमंती ही कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची आहे. सायकल चालवल्याने विनासायास, सहजपणे ती तुम्हाला उपलब्ध होते.
(लेखक उत्साही सायकलिस्ट आहेत.)