Join us  

World Bicycle Day : नको बाई लाज वाटते? सायकलिंग करण्यात महिला मागे का? महिलांना सायकलिंगचे 5 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2022 1:46 PM

Fitness Tips: नको नको म्हणत किती दिवस सायकल नाही चालवायची, कोण काय म्हणेल याचा विचार आता सोडून द्या आणि बिंधास्त सायकल चालवा (cycling).... मग तुमचा तुम्हीच फरक अनुभवा...

ठळक मुद्देअमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार सायकलिंग करणाऱ्यांची ब्रेन पॉवर ही इतरांच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी अधिक असते.

लहानपणी बहुतेक सगळ्या जणींनीच सायकल चालवलेली असते.. सायकल चालवायला खूप आवडतंही पण लग्न, बाळ हे सगळं झालं की मग त्यानंतर सायकल चालवायला अनेक जणींना लाज वाटते.. खरं तर कोणी काही म्हणत नसतं. पण नको बाई लोक काय म्हणतील, आपण कसे दिसू, आणि सायकल चालवताना धडपडलो तर, लग्न झालं मुलं झाली आता काय सायकल चालवायचं वय आहे का... असं काय काय आपण आपल्याच मनात विचार करत बसतो आणि हा एवढा चांगला व्यायाम करण्यापासून स्वत:च स्वत:ला थांबवतो.. म्हणूनच मैत्रिणींनो हे सगळे विचार सोडा आणि आजच्या वर्ल्ड सायकल डे (3rd June- World Bicycle Day) च्या निमित्ताने पुन्हा एकदा बिंधास्त सायकलिंग करायला सुरुवात करा..

 

सायकलिंग करण्याचे फायदे (benefits of cycling)१. मन राहते फ्रेशसायकलिंग हा असा एक व्यायाम आहे, जो शरीरासाठी तर उपयुक्त आहेच, पण मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे.. आपण सायकलिंग करतो आहोत, हीच भावना मुळात आपल्याला अधिक फ्रेश करणारी असते. त्यातून एक नवा आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे जेव्हा कधी नैराश्य येईल, मनाला थकवा आलेला असेल तेव्हा सायकलिंग करा, असं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार सायकलिंग करणाऱ्यांची ब्रेन पॉवर ही इतरांच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी अधिक असते.

 

२. हृदयाचे आरोग्य सुधारते सायकलिंग करणे हृदय आणि फुफ्फुसासाठी फायद्याचे आहे. कारण त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची गती वाढते. हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते. नियमित सायकलिंग केल्यास एलडीएल या बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

३. रात्री चांगली झोप येतेरात्री शांत झोप न लागणे ही आजकाल अनेकांची समस्या आहे. काही जणांना तर मध्यरात्रीनंतरच झोप येते. झोप पुर्ण न झाल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे अशा लोकांना सायकलिंग करणे फायद्याचे ठरते. यामुळे संपूर्ण शरीराचा, मांसपेशींचा व्यायाम होतो आणि त्यामुळे शांत झोप लागते.

 

४. वेटलॉससाठी फायदेशीरवजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज अर्धा तास सायकलिंग करणेही खूप फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे ५०० ते ८०० कॅलरीज बर्न करणे शक्य आहे. मांड्या, हिप्स, पोटऱ्या या भागात जमा झालेले चरबीचे थर कमी करण्यासाठी सायकलिंग करणे खूपच चांगले. ५. त्वचा होईल चमकदारआपला चेहरा छान ग्लोईंग असावा, असं प्रत्येकीला वाटतंच.. यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे सायकलिंग. सायकलिंग केल्यामुळे शरीरातले रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे संपूर्ण शरीरालाच ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो. याचाच परिणाम म्हणजे तुम्ही अधिक तरुण आणि चार्मिंग दिसू लागता. त्वचेलाही वेगळाच ग्लो येतो. 

 

खूप जास्त सायकलिंग करत असाल तर....- महिलांनी दररोज अर्धा ते पाऊण तास सायकलिंग करण्यास काहीच हरकत नाही. - ज्या महिला सायकलिस्ट असतात, त्या दिवसातून ३ ते ४ तास सायकलिंगचा सराव करतात. यामुळे महिलांच्या genital health वर परिणाम होऊ शकतो, असं काही अभ्यासातून समोर आलं आहे.- गरोदर महिलांनी सायकलिंग करू नये.- ओटीपोटासंदर्भात काही त्रास असल्यास महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सायकलिंग करावे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यसायकलिंगमहिला