कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तर तिसरी लाट अवघ्या काही आठवड्यांमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार असल्याचे सांगितले जाते. अशा काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि श्वसन संस्था मजबूत ठेवणे हे प्रत्येकासमोरचे आव्हान आहे. या दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर योगा आणि प्राणायाम या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
नियमितपणे प्राणायाम केल्याचे फायदे
१. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास प्राणायाम म्हणजे श्वासाचा व्यायाम. प्राणायाम करताना छाती भरून श्वास घेतला जातो आणि तो तितक्याच संथ गतीने सोडला जातो. यामुळे फुफ्फुसे कार्यक्षम होतात आणि ते अधिकाधिक मजबूत होत जातात.
२. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढल्यामुळे सर्व शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागतो. यामुळे मन शांत होते. मन शांत होणे म्हणजेच मनावरचा ताण कमी होणे. ताण-तणाव विरहित मन सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक असते.
३. प्राणायाम केल्यामुळे शरीरात नायट्रस ऑक्साईड वायू तयार होतो. या वायुचा परिणाम फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांवर होतो आणि त्या प्रसरण पावतात. रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे त्यांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते.
फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविणारे ४ श्वसनप्रकार
१. कपालभाती
सर्वप्रथम नाकाने दिर्घ श्वास घेणे आणि त्यानंतर पोट आत घेऊन नाकाने जोरात श्वास सोडणे म्हणजे कपालभाती प्राणायाम. हा प्राणायाम प्रकार अतिशय लोकप्रिय असून याचे अनेक फायदे आहेत. शरीर आतून स्वच्छ करणारी क्लिंजींग टेक्निक म्हणून कपालभाती ओळखले जाते. दररोज ६ ते १२ मिनिटे कपालभातीचा सराव करावा. यामुळे फुफ्फुसातील अनेक अगदी लहान रक्तवाहिन्या उघडल्या जातात. यामुळे श्वसन संस्था अधिक बळकट होत जाते.
२. अनुलोम- विलोम
करण्यासाठी अतिशय सोपा पण तेवढाच जास्त परिणामकारक श्वसन प्रकार म्हणून अनुलोम विलोम ओळखला जातो. यामध्ये सगळ्यात आधी दिर्घ श्वास घ्यावा. यानंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर डाव्या नाकपुडीनेच श्वास घ्यावा आणि मग ती नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा. ही क्रिया वारंवार केल्याने वात, पित्त आणि कफ दोष दुर होतात. रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होते, तणाव व चिंता दूर होतात.
३. दिर्घ श्वसन
कोणतेही प्राणायाम न करता दररोज काही मिनिटांसाठी केवळ दिर्घ श्वसन केले तरी ते आरोग्यासाठी अतिशय परिणामकारक असते. दिर्घ श्वसन म्हणजे नाकाने मोठा श्वास घेणे आणि तेवढ्याच संथ गतीने श्वास सोडणे. दिर्घ श्वसनामुळे फुफ्फुस आणि हृदयाचे स्वास्थ्य सुधारते. मानसिक ताण हलका होऊन आपण सकारात्मक विचार करू लागतो. याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास होतो.
४. भ्रामरी
भ्रामरी प्राणायाम करताना दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करावेत. करंगळी, त्याच्या बाजूचे बोट आणि मधले बोट डोळ्यांवर ठेवून डोळे बंद करावेत. अनामिका कपाळावर ठेवावी. यानंतर दिर्घ श्वसन करावे आणि कंठातून आवाज करून श्वास बाहेर सोडावा. भ्रामरी प्राणायाम केल्याने हायपरटेंशनचा त्रास कमी होतो. मन प्रफुल्लित होते. मेंदूला चालना मिळते.