Join us  

वजनच वाढत नाही, लुकडेसुकडे टोमणे खावे लागतात; मग ही ८ योगासनं करा, व्हा ब्यूटीफुल ॲण्ड फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:04 PM

वाढत्या वजनावर कंट्रोल मिळविण्यासाठीच बहुतांश लोक योगा करत असतात. योगा किंवा व्यायाम यासंदर्भात आपण जेवढ्या गप्पा ऐकतो, त्यातूनही वजन कमी करण्यासाठीच हे सगळे असते असे वाटायला लागते. पण ज्यांना वेट गेन करायचे असते, त्यांच्यासाठीही योगासने अत्यंत उपयुक्त ठरतात.

ठळक मुद्देकाही योगासनांमुळे चयापचय क्रिया, पचन क्रिया सुधारते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते. त्यामुळे शरीर आतून सशक्त होत जाते आणि नैसर्गिकरित्या वजन वाढण्यासाठी फायदा होतो.काही योगासनांमुळे शरीराच्या सर्व भागांना रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळायला सुरूवात होते. याचा परिणाम म्हणजे रक्तातील पोषणमुल्येही सगळ्या शरीरात पोहोचतात.

योगासनांमुळे केवळ शरीर निरोगीच होत नाही, तर शरीर सुदृढ देखील होते. बॉडी टोन मेंटेन करण्याचे काम योगाच्या माध्यमातून अतिशय उत्तम रितीने केले जाते. वजन कमी होत नाही, ही जशी काही जणांची अडचण असते, त्याचप्रमाणे वजन वाढतच नाही, या समस्येनेही अनेक जण हैराण असतात. 'लुकडीसुकडी', 'बारकी', 'काठी'.. असे कित्येक टोमणे त्यांना ऐकावे लागतात. वजन वाढविण्यासाठी हवे ते प्रयत्न करायला असे लोक तयार असतात. अशा लोकांनी योगासनांची चांगली मदत होऊ शकते. काही योगासनांमुळे केवळ वजनच वाढत नाही तर बॉडी टोनही परफेक्ट होतो. 

 

वजन वाढण्यासाठी करा ही काही आसने

 

१. चक्रासन (व्हिल पोज)या आसनामुळे शरीराच्या सगळ्या भागात रक्तपुरवठा होतो आणि पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. हात, खांदे, मांड्या, मनगट यांची ताकद वाढते आणि हार्मोन्सचे संतूलन राखले जाते. जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळच आसनस्थिती ठेवा. ओढून ताणून आसन स्थिती लांबविण्याचा प्रयत्न करू नका.

 

२. धनुरासन (बो पोज)पाठ आणि पोटाच्या मसल्सला सशक्त ठेवण्याचे काम या आसनाद्वारे केले जाते. थायरॉईड संदर्भातले आजार दूर होतात. पचन क्षमता सुधारते आणि प्रजनन संस्थेचाही विकास होतो. हे आसन केल्याने मांसपेशींना आलेला थकवा आणि ताण दूर होतो. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्या लोकांनी हे आसन डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावे. 

 

३. भुजंगासन (कोब्रा पोज)या आसनामुळे खांदा, हात, पोट, मान आणि पाठीचे स्नायू ताणले जातात. यामुळे या अवयवांचा थकवा दूर होतो. या आसनामुळे चयापचय क्रिया आणि पचन संस्थेचे कार्य सुधारते. तसेच रक्त आणि ऑक्सिजन सर्व शरीरापर्यंत पोहोचविण्याचे कार्यही अधिक परिणामकारक पद्धतीने होते. त्यामुळे सर्व शरीराला पोषणमुल्ये मिळतात. भुजंगासन करताना दोन्ही पायातले अंतर जास्त वाढवू नये. यामुळे पाठीच्या कण्याला त्रास होऊ शकतो.

 

४. वज्रासन (डायमंड पोज)शरीराला मन:शांती देण्याचे काम वज्रासनातून केले जाते. जेवण झाल्यावर वज्रासनात बसणे अतिशय चांगले असते. या आसनामुळे पचनसंस्था आणि चयापचय क्रिया सुधारते. कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. ज्या लोकांना गुडघेदुखी किंवा घोट्याचे दुखणे असेल, त्यांनी हे आसन करू नये.

 

५. सर्वांगासन (शोल्डर स्टॅण्ड)रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यासाठी सर्वांगासन सर्वोत्तम मानले गेले आहे. या आसनामुळे अपचन आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. पाठीचा कणा देखील लवचिक होतो. थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित होण्यासाठीही सर्वांगासन उपयुक्त ठरते. उच्च रक्तदाब आणि डोळ्यांचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी हे आसन करू नये. 

 

६. मत्स्यासन (फिश पोज)मत्स्यासनामुळे छाती, मान, पाठीचा खालचा भाग आणि पोटावरचे स्नायू ताणले जातात. ताणतणाव दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते. हृदयाशी संबंधित कार्य, पचन संस्था सुधारण्यासाठी हे आसन फायदेशीर मानले जाते. त्यामुळे वजन वाढविण्यासाठी हे आसन आवर्जून करावे. मायग्रेन, मानेला दुखापत, स्पाँडेलायसिसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी हे आसन करू नये. 

 

७. पवन मुक्तासन (वाईंड रिलिव्हिंग पोज)ॲसिडीटी, अपचन, कॉन्स्टिपेशन असा पचनासंदर्भात कोणताही त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पवन मुक्तासन करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे आपोआपच पचनसंस्था सुधारून वजन वाढीसाठी फायदा होतो.  मासिक  पाळी काळातील दुखणे कमी करण्यासाठीही हे आसन उपयुक्त आहे. सहजपणे जेवढी आसनस्थिती घेणे शक्य असेल, तेवढ्याच प्रमाणात हे आसन करावे.

 

८. शवासनसगळे आसन करून झाल्यावर शरीर आणि मनाला आराम देण्यासाठी आणि रिफ्रेश करण्यासाठी शवासन केले जाते. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, थकवा घालविणे असे अनेक फायदे या आसनातून मिळतात. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्ययोग