Join us  

योगा तू हमसे नहीं होंगा!- तुमच्याही मनात योगासनांविषयी असे काही गैरसमज आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:43 PM

योगाची बाजारपेठ मोठी असली तरी आजही योगअभ्यासाविषयी अनेक गैरसमज आहेत, आणि महिलांसंदर्भात तर जास्तच.

ठळक मुद्दे जर आपण हा सगळा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने शिकलो आणि रोज सराव केला तर त्यात अवघड असे काही नाही

वृषाली जोशी-ढोके

चला! झाली तयारी सगळी उद्याची. अलार्म लावलाय, योगा मॅट आणलीये, ड्रेस तयार करून ठेवलाय, आता उद्या पासून काही झालं तरी "योग" सुरूच करणार. पण "योगा" करायचा म्हणजे नक्की काय करायचे? सुरुवात कुठून, कशी करायची? सकाळी जागच नाही आली तर काय करायचे? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि ज्या जोमाने आपण ठरवतो त्याच्या दुप्पट वेगात तो उत्साह विरून जातो.सर्व प्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे "योगा" असा शब्दच नाहीये. शब्द आहे तो योगशास्त्र आणि त्या मध्ये सांगितलेली आसनं, प्राणायाम, ध्यान यांचा अभ्यास आणि बरेच काही. "योगा" हा परदेशी लोकांनी मांडलेली बाजारपेठ आहे असे म्हणता येईल. योग मात्र  जगण्याची पध्दती आहे, सकारात्मक राहत योग स्वीकारायचा, तो जीवनशैली म्हणून केवळ व्यायाम-आसनं म्हणून नव्हे. मात्र तरीही योग विषयी आजकाल बरेच गैरसमज दिसतात.१. योग हा सर्वांनाच जमेल का, की ते जुन्या काळच्या ऋषीमूनींनाच जमावे.२.योग हा शारीरिक पातळीवर कष्ट देणारा प्रकार आहे.३. हे एक तंत्र, जादू, चमत्कार आहे.४. विशिष्ठ वयोगटातल्या लोकांसाठीच आहे.५. स्त्रियांनी योग करु नये.६. वृध्द आणि बालकं योग करूच शकत नाहीत.

या गैरसमजांची कारणं काय आहेत?

१. योग हा तत्वज्ञानाचा विषय आहे. त्याला अध्यात्मिक बैठक आहे आणि सर्वसामान्य माणसांना त्याचा उपयोग नाही.२. योग साधनेतून मिळणारे परिणाम या बद्दल असलेले अज्ञान आणि गैरसमज.३. योग साधनेचे फळ तर्काने सिध्द करता येत नाही असा समज आहे.४. योग साधनेचे फायदे फक्त रोगोपचारासाठीच आहेत.असे अनेक गैरसमज या योग साधने बद्दल आहेत. काही लोकांमध्ये तर भय निर्माण झालेले आहे की प्राणायाम चुकीच्या पद्धतीने केला तर काय होईल?  आज काल अगदी घंटागाडी वर सुद्धा योग प्रचार प्रसाराची धून लावलेली आहे. त्यात म्हटले आहे हलका व्यायाम, योग, प्राणायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनखाली शिकूया. जर आपण हा सगळा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने शिकलो आणि रोज सराव केला तर त्यात अवघड असे काही नाही किंवा घाबरून भय बाळगण्यासारखे तर अजिबातच काही नाही. योगाभ्यास शिकायला वयाची कोणतीही अट नाही अगदी वयाच्या १० व्या वर्षा पासून ८० वयापर्यंत कोणीही शिकून अभ्यास करू शकते. आजारी व्यक्तींसाठी सुद्धा हलका योगाभ्यास सांगितलेला आहे. स्त्रियांनी मासिकपाळीचे ४ दिवस सोडले तर बाकी दिवस रोज अभ्यास करणे गरजेचे आहे.त्यामुळे सगळे गैरसमज बाजूला ठेवायचे आणि जोमाने योगाभ्यासाला सुरुवात करायची आहे. मात्र तज्ज्ञांचं मार्गदर्शनही हवंच.

( लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.) 

टॅग्स :योगमहिला