सतत बैठे काम, वाकून किंवा उभ्याने काम करुन आपली कंबर दुखते. कंबर एकदा दुखायला लागली की आपल्याला काहीच सुचत नाही. अशावेळी कोणीतरी पाठ, कंबर चेपून द्यावी अशी आपल्याला इच्छा होते. मात्र ते सतत शक्य नसते. अशावेळी योगासने करणे हा उत्तम उपाय ठरु शकतो. नियमितपणे काही आसने केल्यास कंबरेला त्याचा काय आणि कसा फायदा होतो हे समजून घेऊया. योगा ही प्रक्रिया असून काही दिवसांच्या सरावाने आपल्याला ही आसने जमायला लागतात आणि मग एखाद्या समस्येपासून योग्य पद्धतीने आरामही मिळण्यास मदत होते. पाहूया कंबरदुखी कमी करण्यासाठी कोणती आसनं करावीत (Yoga For Lower Back Pain).
१. मार्जारासन
या आसनात पाठ वर-खाली केल्याने पाठिच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच मिळण्यास मदत होते. मणका, खांदे, मान या सगळ्याठिकाणी ताण पडल्याने हे आसन कंबरदुखी किंवा पाठदुखीसाठी अतिशय उपयुक्त असते.
२. अधोमुख श्वानासन
शरीराता तोल राखण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते. हात आणि पाय जमिनीला टेकलेले ठेवून कंबरेचा भाग वर उचलायचा असतो. त्यामुळे बॅलन्स नीट करावा लागतो. पण अशा पोझिशनमुळे कंबरेच्या सगळ्या स्नायूंना ताण पडतो आणि ताकद वाढण्यास मदत होते. नियमितपणे या आसनाचा सराव केल्यास दुखणे नकळत कमी होण्यास मदत होते.
३. शलंभ भुजंगासन
भुजंगासन हा पाठीच्या सगळ्या स्नायूंना आराम देणारा एक उत्तम योगप्रकार आहे. या आसनामुळे मणका आणि कंबरेचा भाग ताकदवान होण्यास मदत होते. तसेच कंबर दुखत असेल किंवा हालचांलींवर मर्यादा येत असतील तर हे आसन अतिशय उपयुक्त आहे. शलंभ भुजंगासनामुळे पाठीला नेहमीपेक्षा जास्त ताण पडतो.
४. उत्थित त्रिकोणासन
या आसनामुळे मणका, कंबर आणि खुबा या सगळ्याला स्ट्रेचिंग होते. विशिष्ट पद्धतीने स्ट्रेचिंग झाल्याने कंबर आणि पाठीला ताण पडतो आणि कंबरदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणूनच करायला सोपे असणारे हे आसन नियमितपणे करायला हवे.