आपल्यापैकी बहुतांश जणांचे काम सध्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरचे असते. दिवसाचे ८ ते १० तास एकाच स्थितीत बसल्याने अनेकदा आपलं पोश्चर बिघडतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे त्रास म्हणजे पाठ आणि खांदेदुखी. बरेचदा आपण खुर्चीत नीट न बसता खांदे पाडून, कॉम्पुटर डेस्कवर खूप वाकून बसतो. बराच काळ असे बसल्याने खांदेदुखी तर उद्भवतेच पण खांदे पुढच्या बाजूला वाकलेले राहतात. एकदा शरीराची ठेवण अशी झाली की ती तशीच राहते आणि खूप प्रयत्न करुनही त्यामध्ये फारसा फरक पडत नाही. खांदे वाकलेले असतील तर आपल्यामध्ये आत्मविश्वास नाही असे जाणवते (Yoga For Strengthening up Drooping Shoulders).
आपले पोश्चर नीट नसेल तर आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्याचा नकळत परीणाम होतो. आता हे बिघडलेले पोश्चर पुन्हा नीट करायचे असेल तर काय करायला हवे? प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी यासाठी काही सोपे आणि अगदी कमी वेळात होणारी आसनं सांगतात. अंशुका या अभिनेत्री करीना कपूर आणि आलिया भट यांच्या फिटनेस ट्रेनर असून सोशल मीडियावर त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत. आपल्या फॉलोअर्सना त्या कायम काही ना काही महत्त्वाच्या फिटनेस टिप्स देत असतात. ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनात चांगला उपयोग होतो. आताही त्यांनी खांद्याचे आणि एकूण बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ५ महत्त्वाची आणि सोपी आसनं सांगितली असून व्हिडिओच्या माध्यमातून ती करुनही दाखवली आहेत.
अंशुका सांगतात...
१. खांदे आणि छाती यांच्यातील समतोल बिघडला की खांदे पुढच्या बाजूला वाकण्याची समस्या उद्भवते.
२. चुकीचे पोश्चर किंवा जड बॅग, सामान घेतल्याने ही समस्या उद्भवते.
३. वेळीच यावर योग्य तो उपाय केला नाही तर यामुळे पाठीचा वरचा भाग, मानेचे स्नायू यांना इजा पोहोचण्याची समस्या असते.
४. यासाठी काही आसने नियमितपणे आवर्जून करायला हवीत. सुरुवातीला ही आसने टिकवण्याचा कालावधी २० ते ३० सेकंद असावा आणि हळूहळू तो २ ते ३ मिनीटांपर्यंत न्यावा.
ही आसनं नक्की करा...
१. मार्जारासन (Cat Pose)
२. बालासन (Puppy Pose)
३. शसाकासन (Rabbit Pose)
४. मकर अधोमुख श्वानासन (Dolphin Plank Pose)
५. गोमुखासन (Cow Face Arm Pose)