वृषाली जोशी-ढोके
शाळेत असताना घरचा अभ्यास केला नाही म्हणून वर्ग शिक्षक पायाचे अंगठे धरून वर्गाबाहेर उभे करत असत त्यावेळी कित्ती वाईट वाटायचे हाताने पायाचे अंगठे पकडायला, पण आज वयाच्या तीस -पस्तीसाव्या वर्षी हात पायापर्यंत टेकले तर अभिमान वाटतो. लहानपणी आपण सगळ्या गोष्टी किती सहजतेने करतो, कारण आपले शरीर खूप लवचिक असते. पण जस जसे वय वाढू लागते तस तशी शरीराची लवचिकता कमी होत जाते आणि अगदी रोजच्या दैनंदिन साध्या गोष्टी करायलाही अवघड जाते. लहान मुलांचे शरीर खूप लवचिक असते. कोणत्याही पद्धतीने ते वळू शकते. वाकू शकते. आपलं वय वाढू लागले की स्नायू आखडायला लागतात मग खाली बसणं, उठणे, वाकणे या गोष्टी सहजतेने होत नाहीत. लहान मुलं खूप वेळा धडपडतात तरीसुद्धा त्यांचे हात पाय फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण मोठ्यां पेक्षा खूप कमी असते कारण लवचिकता. ज्यांची लवचिकता चांगली आहे ते कोणत्याही गोष्टी सहजतेने करू शकतात. परंतु स्नायू आखडलेले असतील तर साध्य दिसणाऱ्या गोष्टी असाध्य होवून जातात. शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या तर मनात कितीही इच्छा असली तरी शरीर साथ देत नाही. योगासनं करताना आपल्या मनात अनेक हेतू असतात. त्या पैकी शारीरिक आजारांवर मात आणि मानसिक ताण दूर व्हावा हा मुख्य उद्देश असतो.
शारीरिक क्षमतेच्या विकासासाठी योगासनांमुळे खालील चार फायदे होतात.
१.स्नायूंची ताकद वाढते. (स्ट्रेंथ),
२.स्नायूंची दीर्घकाळपर्यंत तग धरण्याची क्षमता वाढते. (एन्ड्युरन्स)
३. हृदयाची आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढते.
४. स्नायूंची लवचिकता वाढते.(फ्लेक्झिबिलिटी)
हात, पाय, पाठ, कंबर या स्नायूंचे स्ट्रेचिंग करणे अतिशय महत्त्वाचे आहे. रोजच्या योगाभ्यासात शेवटचे काही मिनिट ताडासन, वृक्षासान, पर्वतासन ह्या काही आसनांचा समावेश केल्याने लवचिकता चांगल्या प्रकारे सुधारते. स्नायूंच्या लवचिकता वाढवण्यासाठी वयाची अट नाही अगदी कोणत्याही वयात स्ट्रेचिंग केले तरी फायदे मिळणार आहेतच पण ते करत असताना अतिशय सावकाश संथ गतीने आणि झेपेल एवढा ताण घेऊन करायला हवे.
स्ट्रेचिंगचे फायदे काय?
१. स्नायूंची लवचिकता वाढते.
२. कामात उत्साह आणि चपळता जाणवते.
३. शरीरात रक्तसंचार चांगला सुधारतो.
४. इजा किंवा दुखापत होण्याची शक्यता कमी होते.
५. स्नायू आणि नसांवर सूज येत नाही.
(लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)