Join us  

स्क्रीनसमोर बसून लठ्ठ होणारी चिडचिडी मुलं, त्यांना योगासनं शिकवावी का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 3:41 PM

मुलांना अमूक शिकवावे, तमूक क्लास, ढमूक प्रेशर असं पालकांनी करण्यापेक्षा स्वत: आधी योगाभ्यास करावा, मुलांना अनुकरणं करु द्यावे, नाहीतर जे आपण करत नाही, त्याची मुलांना सक्ती करुन काय उपयोग?

ठळक मुद्देकर के देखो हीच यातली गंमत आहे.

वृषाली जोशी-ढोके

थ्री इडिएट्स चित्रपटातला खूप हिट झालेला डायलॉग आठवतो का? "लाईफ इज रेस" आणि खरंच आपण रेस मधले घोडे असल्यासारखे मुलांना  प्रत्येक परीक्षेला बसवतो. आणि नुसतेच बसवत नाही तर त्यांनी प्रत्येक वेळी टॉप केले पाहिजे हा देखील अट्टाहास धरतो. या सगळ्या रेस मध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण त्यांना काय वाटते, त्यांना काय करायचे आहे हे कधी विचारतच नाही आणि आपल्याला जे करायला मिळाले नाही ते सगळे आपल्या मुलांनी करावे म्हणून हा क्लास तो क्लास ही एक्झाम ती एक्झाम अशा सतराशे साठ गोष्टींमागे त्यांना पळवतो. मग त्यासाठी हेच मुलं रात्रंदिवस मेहनत करतात. कमी ३ तास झोपतात आणि पालकांनी टाकलेल्या ओझ्याचा भार ओढण्याचा प्रयत्न करतात. खरंतर हे सारे ताण वाईटच, पालकांनी हे सारं मुलांवर लादणं थांबवलं पाहिजे.

 

 

आणि त्यासोबतच मुलांना या सगळ्या ताणाला सामोरे जाण्यासाठी अगदी बालवाडी पासून जर मुलांना योगाभ्यास शिकवला तर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आता बरेच जण म्हणतील बालवाडीत मुलं किती लहान असतात त्यांना काय योगाभ्यास कळणार. मग विद्यार्थ्यांना साधा ओमकार म्हणायला शिकवला तरी त्यांच्या स्वभावात फरक जाणवायला लागेल. आजकाल मुलांना खेळायला मोकळी जागा नाही त्यामुळे त्यांना शुद्ध हवा मिळत नाही, दिवस रात्र मोबाईल, टीव्ही, टॅब, यामुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. शालेय जीवनाचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा आणि विकासाचा कालखंड आहे त्यामध्ये दिलेले योगशिक्षण फायदेशीर ठरणार आहे. परंतु योगशास्त्रा बद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत त्यामुळे योगशिक्षण देण्याचा फारसा कल दिसून येत नाही. आधुनिक जीवनशैली मध्ये पहाटे लवकर उठण्याची सवय पण कमी झालेली दिसते, आपण लहान वयातच मुलांना बाकी शालेय अभ्यासा बरोबरच योगभ्यास करण्याची आवड निर्माण केली तर त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढायला मदत होईल, प्राणायामाच्या अभ्यासाने शुद्ध हवा मिळाली, तर मन एकाग्र होण्यासाठी ओमकार जप, आसनांचा अभ्यास यांची मदतच होईल. विद्यार्थ्यांसाठी विशेष योगनिद्रा असते, त्यातून परीक्षेची भीती, अभ्यास लक्षात न राहणे,ताण, आणि अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून येणारी निराशा हे सगळे टाळता येणे सहज शक्य आहे.

 

जस जसे मुलांचे वय वाढत जाणार आहे तस तसा योगाभ्यास सुद्धा बदलत जाणारा आहे कारण त्यांच्या शारीरिक विकासासाठी उपयुक्त असे आसनं जर त्यांना शिकवले तर त्यांच्या उंची संवर्धनाला, मानसिक विकासाला मदत होणार आहे. योगाभ्यासाने ज्ञान ग्रहण करणारे जे ज्ञानेंद्रिय आहेत ( डोळे कान नाक जीभ त्वचा) त्यांचा विकास आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणे सहज शक्य आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्वांगिण संवर्धन योगाने निश्चित साधू शकते. हे संवर्धन मुख्यतः खालील पातळ्यांवर व्हायला हवे.१. आरोग्य संवर्धन२. बुध्दी संवर्धन३. उंची संवर्धन४. कौशल्य संवर्धन५. चारित्र्य संवर्धनहा चमत्कार फक्त योगाभ्यासाने साधू शकेल .  भारतात येणारी नवी पिढी अनेक नवीन आव्हानांना पेलू शकेल आणि त्याहीपेक्षा संयत, सम्यक आयुष्य आनंदानं शिकण्याची, आरोग्य राखण्याची गरज त्यांना समजेल. अर्थात हे सारं मुलांनीच करावं म्हणून पालकांनी योगाभ्यास त्यांच्यावर लादू नये. आधी पालकांनी स्वत: करावं, मुलं पालकांचं पाहून शिकतात, अनुकरणातून शिकतात. त्यामुळे कर के देखो हीच यातली गंमत आहे.

(लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)

टॅग्स :योग