दिवाळी संपून आता जवळपास एक आठवडा झाला. शाळा, महाविद्यालयेही आता सुरू होतील. दिवाळीची जास्तीची कामं, पाहुण्यांची ये-जा, कधी ट्रीपसाठी तर कधी आणखी काही कारणाने केले जाणारे प्रवास यांमुळे काहीसा थकवा आला असण्याची शक्यता असते. सणवार, ट्रीप म्हणजे रोजच्या रुटीनमधून थोडासा ब्रेक. हा ब्रेक घेऊन पुन्हा रोजच्या रुटीनला येण्यासाठी आपल्याला नक्कीच काही वेळ लागू शकतो. यामध्ये आपल्याला थकवा किंवा काहीसा आळस आला असेल तर तो घालवण्यासाठी काय करायचं असा प्रश्नही कदाचित आपल्याला पडू शकतो. तर योगासनं हा यावरील सर्वात उत्तम उपाय असून थकवा घालवण्यासाठी करता येतील अशी ४ आसनं कोणती ते पाहूया (Yoga Poses For Instant Energy)...
१. भुजंगासन
भुजंगासन हे सूर्यनमस्कारातील एक आसन असून त्याचे अनेक फायदे आहेत. पाठीच्या मणक्यासाठी या आसनाचा चांगला फायदा होतो. पोटावर झोपून दोन्ही हात कानापाशी ठेवावेत आणि बेंबीपर्यंतचा भाग वर घ्यावा. यामुळे पूर्ण शरीराला एकप्रकारे चांगले स्ट्रेचिंग होते. यामुळे आळस जाऊन आपल्याला फ्रेश वाटण्यास चांगली मदत होते.
२. मार्जारासन
मार्जारासनामध्येही पाठ आणि पोटाला चांगला व्यायाम होतो. दोन्ही हात आणि गुडघ्यांवर बसून पाठ एकदा वर घ्यायची आणि एकदा खाली वाकवायची. मांजर असेच करत असल्याने या आसनाला मार्जारासन म्हणतात. यामध्ये हात, पाय, पाठ, मान या सगळ्याच अवयवांचे स्ट्रेचिंग होते आणि आराम मिळतो.
३. त्रिकोणासन
दोन्ही पायांवर उभे राहून कंबरेतून एका बाजूला वाकावे. दुसरा हात सरळ वर घेऊन त्या हाताकडे पाहावे. दोन्ही हात एका रेषेत सरळ असायला हवेत. असे दोन्ही बाजूला केल्यास त्याने कंबर, हात, पाय, पाठ अशा सगळ्या अवयवांना चांगला व्यायाम होतो आणि फ्रेश वाटते.
४. शवासन
करायला अतिशय सोपे आणि आरामदायी असे हे आसन आपण प्रत्येकाने नियमित करायला हवे. स्वत:च्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला लावणारे आणि संपूर्ण शरीराला एकप्रकारचा आराम देणारे हे आसन केल्यानंतर आपल्याला नक्कीच रिलॅक्स वाटू शकते.