Join us  

दसरा विशेष: दसऱ्याच्या मुर्हूतावर स्वत:ला द्या प्राणायामाची भेट! रोज प्राणायाम करण्याची लावा सवय, स्ट्रेसला द्या निरोप..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2022 6:26 PM

नवरात्र विशेष योग: प्राणायामुळे मन:शांती मिळते. दिवसभर ताजेतवाने वाटते. ताण कमी होतो. 

वृषाली जोशी-ढोके

प्राणायाम करा. प्राणायामाचे फायदे. ताणतणाव आणि ध्यानधारणा हे सारे आपण नेहमी ऐकतो. पण खरंच वेळ काढून प्राणायाम करतो का? प्राणायाम म्हणजे आपल्या श्वास आणि उच्छ्वास या क्रियेवर ठरवून नियंत्रण आणणे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात प्राणशक्ती संचार करत असते. तिचा संबंध मन आणि बुद्धीशी जोडलेला आहे. आसनांचा अभ्यास शरीर निरोगी रहावे म्हणुन सांगितला आहे तर प्राणायामाचा अभ्यास मन निरोगी राहण्यासाठी सांगितला आहे. म्हणून रोज ठरवून, स्वत:साठी वेळ देऊन प्राणायाम करायला हवा.

(Image : google)

 

प्राणायामाचे फायदे

1. प्राणायामामुळे चिर तारुण्य मिळते.2. आध्यात्मिक शक्ती वाढते.3. मनःशांती मिळते. दिवसभर फ्रेश वाटते.4.  चिंता, नैराश्य, काळजी कमी होते5. श्वसन संस्थेची कार्यक्षमता सुधारते, फुप्फुसाचे कार्य सुधारते.

(Image : google)

प्राणायाम करताना  काय काळजी घ्याल?

1. प्राणायाम करण्याची जागा स्वच्छ, हवेशीर आणि पुरेसा प्रकाश असणारी हवी.2. प्राणायाम करताना सैलसर कपडे असावेत.3. जेवणाच्या ३ ते ४ तास आधी प्राणायाम करावा. जेवल्यावर लगेच प्राणायाम करू नये.4. प्राणायाम तज्ज्ञांकडून शिकून मगच करावा.5. प्राणायाम संथ गतीने सावकाश करावा कोणतीही घाई गडबड करत करू नये.6. शक्यतो पद्मासन किंवा सुखासन या मध्ये बसुन प्राणायामाचा अभ्यास करावा.

कोणते प्राणायाम उपयुक्त?

ताणतणाव दूर करण्यासाठी तसेच शरीराला व मनाला शांती देणारे, चिडचिड कमी करण्यासाठी, पित्त प्रकोप दूर करण्यासाठी खालील काही प्राणायाम प्रकार अतिशय उपयुक्त ठरतात.

1. शितली प्राणायाम- यामध्ये तोंडातून जीभ बाहेर काढून जिभेची पन्हाळी करून तोंडाने थंडगार हवा आत ओढून घ्यावी त्यानंतर तोंड बंद करून नाकाने दीर्घ श्वास सोडावा. या प्रक्रियेत शरीरातील जास्तीतजास्त कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर टाकला जातो. उन्हाळ्यात या प्राणायामाचा विशेष उपयोग होतो तसेच तहानेने व्याकुळ झाल्यास आणि जवळ पाणी नसेल तर या प्राणायामाच्या थोड्या अभ्यासाने तहान कमी होऊन शरीराला थंडावा मिळतो.2. सीत्कारी प्राणायाम- तोंडामध्ये दातांवर दात ठेऊन दातांच्या मागे जिभेचे टोक टेकवून घ्यावे नंतर तोंडाने थंडगार हवा आत ओढून घ्यावी. हे करत असताना स्... स् असा आवाज तोंडाने येतो म्हणुन सीत्कारी असे नाव पडले आहे. तोंड बंद करून नाकाने दीर्घ श्वास सोडावा असे ८ ते १० आवर्तनं करता येतील. दातांचे तसेच जिभेचे आरोग्य सुधारते. तहान आणि भुकेवर सहज नियंत्रण करता येते. शरीराला थंडावा मिळतो.3. चंद्रभेदन प्राणायाम - हा प्राणायाम करताना उजव्या हाताची प्रणव मुद्रा करून उजवी नाकपुडी बंद करावी व डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा. ८ ते १० आवर्तनं करावीत. या प्राणायामामुळे चंद्र नाडी कार्यरत होऊन शरीराला थंडावा मिळतो. चिडचिड, राग, नैराश्य दूर होऊन मनःशांती मिळते.

(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेआरोग्य