आपण सगळेच अतिशय वेगवान जीवन जगत असतो. त्याबरोबरच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे ताण आणि चिंता असतातच. आपल्याला असणारे ताण हे जास्त स्वरुपात असले तर त्याचा मनावरच नाही तर शरीरावरही परीणाम होतो. अनेकदा आपल्याला रोजच्या धावळीतून कुठेतरी शांत ठिकाणी जावे, काही वेळ शांत बसावे असे वाटते. पण ते जमतेच असे नाही, म्हणूनच योगासने हा त्यावरील एक सर्वोत्तम उपाय आहे. योगामुळे मन शांत होतेच, पण आपल्या ताणाचे आणि चिंतेचे व्यवस्थापन होण्यास योगासनांची चांगलीच मदत होते. काही आसने नियमीतपणे केल्यास शरीराला आणि मनाला आराम मिळतो. इतकेच नाही तर या आसनांमुळे आनंदी हार्मोन्सची निर्मिती होते आणि मन शांत करण्यास आणि तणाव कमी करण्यास त्याची मदत होते (Yogasana To Calm The Mind).
कोणत्याही प्रकारची हालचाल अत्यंत उपचारात्मक असते. योगासन मनाला केंद्रस्थानी ठेवण्यास आणि शरीराची जागरुकता आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करतात. कोणत्याही गोष्टीपेक्षा, योग तुम्हाला एका गोष्टीकडे परत आणतो जो तुमचा श्वास जिवंत ठेवण्यास मदत करतो. म्हणूनच प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी मन शांत होण्यासाठी काही सोपी योगासने सांगतात. ही योगासने कोणती आणि ती कशी करायची याबाबत त्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून माहिती देतात. नियमितपणे ही आसने केल्यास मन शांत होण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात ही आसनं कोणती...
१. बालासन
गुडघ्यांवर बसायचे, दोन्ही गुडघे थोडे बाजूला घेऊन शरीर मागच्या बाजूला ताणायचे. यावेळी दोन्ही हात जमिनीवर पुढे ठेवायचे आणि ताणायचे. यामध्ये संपूर्ण शरीराला ताण पडतो आणि अतिशय रीलॅक्स वाटते.
२. साईड ट्वीस्ट
मांडी घालून बसायचे कंबरेतून एका बाजूला वळायचे. त्यानंतर डोक्यावर नमस्कार करायचा आणि दुसऱ्या बाजुला वळायचे. प्रत्येक बाजूला किमान १० वेळा अशाप्रकारे ताण द्यायचा. यामुळे कंबरेचे किंवा पाठीचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते.
३. बटरफ्लाय पोज
दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिकटवायचे आणि गुडघे फुलपाखरासारखे वर खाली हलवायचे. सुरुवातीला १५ सेकंद आणि नंतर किमान २ मिनीटांपर्यंत हा व्यायाम करायचा. यामुळेही रीलॅक्स वाटण्यास मदत होते.
४. पवनमुक्तासन
पाठीवर झोपायचे, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पोटावर दाबायचे. यामुळे पोटात साचलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते. रिलॅक्स वाटण्यासाठी हे अतिशय आवश्यक असते.
५. शवासन
शांत आणि रिलॅक्स वाटण्यासाठी हे सर्वात सोपे आणि अनेकांच्या आवडीचे आसन आहे. तुम्हाला रिलॅक्स वाटेपर्यंत तुम्ही हे आसन करु शकता. यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर जास्त रिलॅक्स वाटण्यास मदत होते.