आपण बॉलिवूडमधील तारे तारकांच्या फिटनेसबद्दल कायमच बोलत असतो. उद्देश हाच की यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावं. फिटनेस आपल्या जगण्याचा भाग आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वत:चा घात करणं असं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील कायम सांगत असतात. पण ते केवळ सांगतच नाही तर स्वत:च्या आरोग्याबद्दल आणि फिटनेसबद्दल ते खूप जागरुकही आहेत. ‘हम फिट तो इंडिया फिट ’ हा मोदी यांचा नारा आहे.
छायाचित्र:- गुगल
सतत कामात, दौर्यात गढलेले, अगदी मोजकेच तास विश्रांती घेणारे आपले पंतप्रधान इतके उत्साही आणि फिट कसे राहातात हा कुतुहलमिश्रित प्रश्न सगळ्यांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या जीवनशैलीत आहे. नवभारत टाइम्स दैनिकातील वृत्तानुसार कामाचा कितीही व्याप असला तरी आपली आरोग्यदायी जीवनशैली जपण्याच्या सवयीवर पंतप्रधान ठाम असतात. मोदी हे आपल्या फिटनेससाठी काय करतात हे जाणून घेतल्यास प्रत्येकाला त्यातून नक्कीच काहीना काही स्वत:साठी करुन बघावंसं वाटेल.
छायाचित्र:- गुगल
आपले पंतप्रधान एवढे फिट कसे ?
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दिवसाची सुरुवात योग साधनेने करतात. योग साधनेने शारीरिक आणि मानसिक आरोग्यास खूप लाभ होतात असं पंतप्रधान म्हणतात. योग केल्यानं स्नायुंची लवचिकता वाढते, मनावरचा ताण निघून जातो तसेच झोपेची समस्या असल्यास तीही दूर होते. म्हणून पंतप्रधान स्वत: तर योग करतातच पण सगळ्यांनी तो करावा असा आग्रह धरतात.
* पायी चालण्यावर त्यांचा भर असतो. संधी मिळेल तेव्हा समुद्रकिनारी ते वाळूत चालतात. निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करणं ही त्यांची आवड. पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश या पंचमहाभुतांशी आपण जोडलेलो असल्यास आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहातं , पंचमहाभूतातून शरीराला आणि मनाला ऊर्जा मिळते. म्हणूनच पंतप्रधान योग देखील चार भिंतींच्या बाहेर मोकळ्या हवेत , निसर्गाच्या सान्निध्यात करतात.
छायाचित्र:- गुगल
* रिफ्लेक्सोलॉजी रस्त्यावर चालणं हा त्यांच्या नियमित व्यायामाचाच भाग आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर शेअर केला आहे. त्यात आपण नियमित योग सोबतच रिफ्लेक्सोलॉजी रस्त्यावरही चालतो असं म्हटलं आहे. रिफ्लेक्सोलॉजी रस्ता म्हणजे पायांच्या तळव्यांच्या अँक्युप्रेशर पॉइण्टसना मसाज देणारा एक खास रस्ता. रिफ्लेक्सोलॉजी रस्त्यावरुन चालल्याने रक्तदाब नियंत्रणात राहाणं, तणावरहित जगणं, सदैवी उत्साही असणं शक्य होतं. शरीराला ही महत्त्वपूर्ण ऊर्जा मिळण्यासाठी रिफ्लेक्सोलॉजी रस्त्यावर अवश्य चालायला हवं असं पंतप्रधान म्हणतात.
* योगसाधनेसोबतच ध्यानधारणेलाही पंतप्रधान खूप महत्त्व देतात. 45 मिनिटांच्या आपल्या व्यायामात ते ध्यानधारणा आवर्जून करतात. तसेच जेव्हा जेव्हा मनावर ताण येतो तेव्हा तेव्हा मोदी दीर्घश्वसन करतात. आयुष्यात शांतता , आनंद आणि सकारात्म्क ऊर्जा मिळावी यासाठी ध्यानधारणेला आपल्या जगण्यात महत्त्वाचं स्थान देण्याचा सल्लाही मोदी देतात.