दिवसभरातून थोडा सुध्दा शारीरिक व्यायाम न करणं ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक बाब आहे. शरीराला अजिबात व्यायाम नसल्यानं हदयासंबंधीच्या गुंतागुंतीचा, मधुमेह, कर्करोग, स्थुलता, उच्च रक्तदाबाचा, हाडं आणि सांध्यांच्या विकाराचा, नैराश्यासारख्या मानसिक आजाराचा धोका वाढतो.
व्यायाम आणि आरोग्य याबाबत झालेले कितीतरी अभ्यास हेच सांगतात की, व्यायामामुळे अनेक आजार रोखले गेल्याचे अभ्यासातून सिध्द झालं आहे.अनेक गंभीर आजारांचा, अकाली मृत्युचा धोका नियमित व्यायामानं टळतो. व्यायाम आणि आरोग्य यांच्यात घनिष्ठ नातं आहे. ज्या लोकांना सतत आरोग्यासंबंधीच्या तक्रारी होत्या त्यांनी व्यायाम सुरु केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाल्याचंही अभ्यास सांगतो.
पण अनेकांना जिममधे जाणं, वजनं उचलणं यासारखे व्यायाम करायला आवडत नाही. पण म्हणून त्यांनी व्यायामच करायचा नाही असं नाही. त्यांच्यासाठी व्यायामाचे अन्य पर्याय आहेतच. झुम्बा आणि एरोबिक्स हे ते दोन पर्याय. पण दोघांमधला कोणता व्यायाम चांगला हे सांगणं मात्र अवघड. हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायला हवा. हा निर्णय घेणं सोपं जावं यासाठी झुम्बा आणि एरोबिक्सचे फायदे जाणून घेणं आवश्यक आहे.
छायाचित्र:- गुगल
झुम्बा केल्यानं काय होतं?
* झुम्बा व्यायाम हा एक नृत्यातून करण्याचा व्यायाम आहे. झुम्बात केल्या जाणार्या हालचाली या लॅटिन अमेरिकन नृत्य आणि संगीतावर आधारित आहेत. सध्या झुम्बा करुन व्यायाम करण्याचा व्यायामातला फॅशनेबल ट्रेण्ड जगभरात लोकप्रिय झाला आहे. झुम्बाद्वारे शरीरातील उष्मांक (कॅलरीज) जळतात, हाता पायाचे स्नायू मजबूत होतात आणि स्नायुंना बांधीव आकार येतो.
* झुम्बा हा पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. झुम्बामधे साल्सा आणि एरोबिक्स यांचा मेळ केलेला आहे. 2012 मध्ये झालेला एक अभ्यास सांगतो की 40 मिनिटं रोज झुम्बा केल्यास एका मिनिटाला सरासरी 9.5 कॅलरीज जळतात. झुम्बा जर सलग बारा आठवडे केला तर एरोबिक फिटनेस प्राप्त होतो.
छायाचित्र:- गुगल
* झुम्बामधे संगीताच्या तालावर लयबध्द आणि वेगवान हालचाली केल्या जातात. यामुळे शरीराची, स्नायुंची लवचिकत वाढते. हदयाचं आरोग्य सुधारतं, काम करण्याची क्षमता वाढते. हदयचे ठोके एका स्थिर लयीत ठेवणं शक्य होतं.
एरोबिक्स
छायाचित्र:- गुगल
* कुठल्याही प्रकारचा एरोबिक व्यायाम श्वसनाचा वेग आणि हदयाचे ठोके वाढवतो. एरोबिक प्रकारक्या व्यायामाने हदयाचं आरोग्य , फुप्फुसांचं काम आणि रक्त प्रवाह सुरळीत राहातो. एरोबिक्स व्यायाम हे अनएरोबिक्स व्यायामापेक्षा वेगळे असतात, त्याचे परिणाम वेगळे दिसतात. वजन उचलणं यसारखे अनएरोबिक्स व्यायाम शरीरातील ऊर्जा त्वरित वाढवतात पण ती ऊर्जा लवकर कमी देखील होते. पण एरोबिक्स व्यायाम हे जास्त वेळ केले जातात. एरोबिक्स व्यायाम प्रकारात एका लयीत काही मिनिटं किंवा तासभर चालणं, पोहोणं, पळणं, सायकलिंग करणं, दोरीवरच्या उड्या मारणं हे प्रकार येतात.
* एरोबिक्समुळे हदयाची स्थिती सुधारते. हदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी एरोबिक्स व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचे असतात. एरोबिक्समुळे हदयासंबंधीचे आजार होण्याचा धोका टळतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहातो.
* शरीरातील लायोप्रोटिन्सचं अर्थात चांगल कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. एरोबिक्समुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहाण्यास मदत होते. तसेच एरोबिक्स व्यायामानं शरीरातील चयापचयाची क्रिया सुधारते आणि शरीरात एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
छायाचित्र:- गुगल
* एरोबिक्स प्रकारचे व्यायाम रक्तातील साखर नियंत्रित करतात शिवाय वजन कमी होण्यासही त्याचा उपयोग होतो. आरोग्य तज्ज्ञ तर मधुमेही रुग्णांना रोज एरोबिक्स प्रकारचे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. एरोबिक्स प्रकारचे व्यायाम जर नियमित केले तर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहातं आणि वजनही घटतं.
* झुम्बा आणि एरोबिक्स या व्यायाम प्रकारच्या तंत्रात जरी फरक असला तरी या दोन्ही प्रकारच्या व्यायामातून आरोग्य सुधारतं, जगण्याची गुणवत्ता सुधारते हे मात्र नक्की.
झुम्बा आणि एरोबिक्स यांचे स्वतंत्र फायदे आणि तंत्र आहेत. पण दोन्ही व्यायामप्रकार शरीरासाठी सारख्याच प्रमाणात महत्त्वाचे असल्याने आपल्या आवडीनुसार झुम्बा किंवा एरोबिक्स हा व्यायाम प्रकार निवडावा आणि न चुकता करावा एवढंच.