Join us  

इडली मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ भिजवताना घाला फक्त १ गोष्ट; इडली फुगेल टम्म...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2023 9:24 AM

1 Easy Trick for Making Spongy Idli Recipe : इडली छान लुसलुशीत झाली नाही तर आपला मूड जातो. असं होऊ नये म्हणून इडलीचं पीठ भिजवताना करता येईल अशी एक सोपी ट्रिक

इडली म्हणजे कोणत्याही वेळेला खाण्यासाठी अगदी मस्त पदार्थ. गरमागरम वाफाळती इडली आणि त्यासोबत मस्त चटणी आणि सांबार म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीता पदार्थ. झटपट होणारा आणि पोटभरीचा असल्याने बऱ्याचदा अनेक घरी नाश्त्याला किंवा विकेंडला जेवायलाही आवर्जून इडली केली जाते. अचानक कोणी पाहुणे येणार असले किंवा काही घाईगडबड असली की आपण बाजारातून तयार पीठ आणतो आणि पटकन इडलीचा बेत करतो. कधी चटणीसोबत तर कधी सांबारसोबत इडली आवडीने खाल्ली जाते (1 Easy Trick for Making Spongy Idli Recipe). 

विकतच्या पीठापेक्षा घरी जास्त प्रमाणात डाळी घालून भिजवलेलं पीठ केव्हाही चांगलं. त्यामुळे साऊथ डंडियन लोकांप्रमाणे हल्ली अनेकांच्या फ्रिजमध्ये इडलीचं पीठ तयारच असतं. हे पीठ असेल की कधी भाज्या घालून आणि कधी आणखी वेगळ्या पद्धतीने इडलीचे वेगवेगळे प्रकारही ट्राय करता येतात. इडलीचं पीठ चांगलं झालं की इडल्या मस्त फुगतात आणि मऊ होतात. अशी गरमागरम इडली नुसती खाल्ली तरी छान लागते. पण हे पीठ नीट भिजले नाही तर मात्र इडल्या भगऱ्या किंवा कोरड्या होतात, मग त्या घशाखालीही उतरत नाहीत. कधी त्या इतक्या कडक होतात की अजिबातच फुगत नाहीत.

(Image : Google)

अशावेळी आपल्या इडलीचा बेत फसतो आणि मग त्याचे डोसे किंवा आणखी काही करुन आपल्याला वेळ मारुन न्यावी लागते. ही इडली छान लुसलुशीत झाली नाही तर आपला मूड जातो. असं होऊ नये म्हणून इडलीचं पीठ भिजवताना करता येईल अशी एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. पाहूया इडली परफेक्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 

काय आहे ट्रिक? 

इडलीचं पीठ भिजवताना आपण साधारणपणे तांदूळ आणि त्याच्या एक तृतीयांश उडदाची डाळ घेतो. हीच इडली जास्त पौष्टीक व्हायची असेल तर आपण थोडी मूग डाळ, हरभरा डाळ असेही घालतो. इडलीचं पीठ चांगलं आंबण्यासाठी त्यात थोड्या मेथ्या घालतात. तर इडल्या छान फुगण्यासाठी अनेक जण त्यात पीठ भिजवताना मूठभर पोहेही घालतात. हे सगळं केल्याने इडल्या छान होतातच. 

(Image : Google)

पण यामध्ये साबुदाणा हा आणखी एक पदार्थ घातल्यास हे पीठ जास्त हलकं होतं आणि इडल्या छान फुगून यायला मदत होते. त्यामुळे २ वाटी तांदूळ असेल तर अर्धी वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी साबुदाणा हे परफेक्ट प्रमाण आहे. हे तिन्ही ४ ते ५ तासांसाठी वेगळे भिजवावे आणि मिक्सरमधून वाटल्यानंतर एकजीव करावे. मग ८ ते १० तास पीठ मीठ घालून आंबण्यासाठी ठेवावे. नंतर हे पीठ फार न हलवता लगेचच त्याच्या इडल्या लावल्या तर छान मऊ आणि लुसलुशीत होतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.