कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी चटणी पुरेशी असते. जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी, तोंडी लावायला म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ओल्या, सुक्या चटण्या घरात बनवून ठेवतो. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, खोबर असे साधे सोपे साहित्य वापरून ही झटपट चटणी तयार करू शकतो. हिरवी चटणी अगदी बेचव जेवणाची देखील चव वाढवते. हिरवी चटणी स्नॅक्ससोबत किंवा स्टफ पराठा, कटलेट, पॅटिस, सामोसा वडा अशा पदार्थांसोबत छान लागते.
काही लोकांना ही चटणी वरण भात किंवा भाजी पोळी सोबत खायला देखील आवडते. हिरवी चटणी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. सकाळी नाश्त्याला किंवा जेवणासोबत या चटणीचा वापर केला जातो. परंतु प्रत्येक वेळा ही चटणी बनवण्यासाठी वेळ असेलच असे नाही. त्यामुळे हिरवी चटणी जर आपण एकदाच बनवून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवली तर आपल्याला हवी त्या वेळी फ्रिजमधून बाहेर काढून इतर पदार्थांसोबत सर्व्ह करता येते. हिरवी चटणी बनविण्याची व किमान सहा महिने स्टोअर करण्याची नवीन पद्धत पाहूयात(Green Chutney Recipe : 1 Easy Trick To Store).
साहित्य :-
१. कोथिंबीर - १ जुडी २. हिरव्या मिरच्या - ८ ते १० ३. आलं - २ इंचाचा तुकडा ४. लिंबाचा रस - २ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार ६. सैंधव मीठ - १/२ टेबलस्पून ७. जिरं - १ टेबलस्पून ८. चणा डाळ - २ टेबलस्पून (भाजून घेतलेली)९. बर्फाचे खडे - ६ ते ८ खडे
कृती :-
१. हिरवी चटणी बनविण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात वरील सर्व साहित्य घालून घ्या. २. आता मिक्सरच्या मदतीने ही चटणी बारीक वाटून घ्यावी. ३. इतर पदार्थांसोबत खायला हिरवी चटणी तयार आहे.
हिरवी चटणी वर्षभर स्टोअर करून ठेवण्याची योग्य पद्धत :-
१. हिरवी चटणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्यानंतर एका बर्फाच्या ट्रेमध्ये ही चटणी चमच्याने भरून घ्या. २. बर्फाच्या ट्रेमध्ये चटणी भरून ठेवल्यानंतर तो ट्रे काही तासांसाठी डिप फ्रिजरमध्ये ठेवावा. ३. डिप फ्रिजरमध्ये ठेवल्यामुळे या चटणीचे बर्फाप्रमाणे चौकोनी क्यूब तयार होतील. ४. चटणीचे क्यूब तयार झाल्यावर ते ट्रे मधून काढून एका डब्यात भरून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवावेत. ५. असे केल्याने आपली हिरवी चटणी वर्षभर फ्रिजमध्ये चांगल्या प्रकारे स्टोअर केली जाते. जेव्हा आपल्याला ही चटणी खावीशी वाटेल त्याच्या किमान तासभर आधी हे क्यूब फ्रिजमधून बाहेर काढून नॉर्मल तापमानाला आणावेत. ६. अशाप्रकारे रोजच्या नाश्त्यासोबत लागणारी चटणी आपण एकदाच तयार करून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता.
हिरवी चटणी साठवून ठेवण्यासाठी काही टिप्स :-
१. हिरवी चटणी जास्त काळ साठवण्यासाठी ती बनवताना चटणीच्या भांड्यात एक छोटा चमचा ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचे तेल टाका.२. हिरवी चटणी जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी ही चटणी घट्ट काचेच्या हवाबंद बरणीतही ठेवू शकता.३. हवाबंद काचेच्या बरणीत चटणी साठवताना त्यात पाण्याचा थेंबही पडणार नाही याची काळजी घ्यावी.