Lokmat Sakhi >Food > गणपतीच्या खिरापतीसाठी १० सोपे सकस तिखट-गोड पदार्थ, रोज खिरापत काय- चिंताच नको..

गणपतीच्या खिरापतीसाठी १० सोपे सकस तिखट-गोड पदार्थ, रोज खिरापत काय- चिंताच नको..

उद्या गणपती बाप्पाचं आगमन. घरोघर खिरापत आणि नैवेद्याची धावपळ, त्यासाठीच सोप्या पदार्थांच्या या काही आयडिया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 05:43 PM2022-08-30T17:43:34+5:302022-08-30T18:09:32+5:30

उद्या गणपती बाप्पाचं आगमन. घरोघर खिरापत आणि नैवेद्याची धावपळ, त्यासाठीच सोप्या पदार्थांच्या या काही आयडिया.

10 Easy Sweets for Ganapati's Khirapati -traditional food for Ganpati Naivedya. | गणपतीच्या खिरापतीसाठी १० सोपे सकस तिखट-गोड पदार्थ, रोज खिरापत काय- चिंताच नको..

गणपतीच्या खिरापतीसाठी १० सोपे सकस तिखट-गोड पदार्थ, रोज खिरापत काय- चिंताच नको..

Highlightsयंदा घरी आलेल्या गणपतीसाठी करुन पहा काही गोड, तर काही तिखट खिरापती / नैवेद्य.

शुभा प्रभू साटम


गणेश चतुर्थी. गणपतीचे आगमन. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव दणक्यात साजरा होतोच पण पूर्ण भारतभरही हा सण उत्साहात साजरा केला जातो. या लाडक्या बाप्पासाठी देशातल्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य केले जातात. प्रसादाचे खास पारंपरिक पदार्थ असतात. ते स्थानिक रीतीभातींप्रमाणे केले जातात. महाराष्ट्रात त्याला खिरापत म्हणतात, काही तिखट, काही गोड. काही ठिकाणी साखर आणि दूध तर कुठे गूळ आणि नारळ. पण एकूणच खाण्या - पिण्याची रेलचेल या काळात असते. स्थानिक साहित्य वापरुन अनेक पदार्थ विविध प्रांतात केले जातात. काही झटपट होतात, काही निगुतीने - वेळ देत शांतपणे करायचे काम असते. पदार्थांची चव वेगळी मात्र उत्साह आणि परस्परांसह सण साजरा करत, एकमेकांना आनंदानं खाऊ घालणं, खाणं खिलवणं गप्पा सर्वत्र सारख्याच. गणेश उत्सव माहोल असा असतो, की भक्तिभावाने जे कराल ते सुंदरच लागेल.
यंदा घरी आलेल्या गणपतीसाठी करुन पहा काही गोड, तर काही तिखट खिरापती / नैवेद्य.


 

सुका मेवा मोदक


उकडीचे मोदक प्रसिद्ध असतातच. पण हे थोडे वेगळे आणि झटपट होणारे सुका मेवा मोदक बघू.
साहित्य
खजूर बी काढून बारीक तुकडे करून २ वाटी, सुका अंजीर तुकडे करून १ वाटी आणि याच्या अर्धे काजू, बदाम, चारोळी किसमिस पिस्ते अक्रोड खसखस (सर्व एकत्र)
आवडीने प्रमाण घ्यावे. हे सर्व कोरडे शेकवून भरड पूड करून घ्यावे. वेलची - जायफळ पूड
कृती
खजूर अंजिर किंचित तुपावर थोडे लालसर करून घ्यावे.
नंतर व्यवस्थित कुस्करून घ्यावे. त्यात भरड पूड घालून, वेलची जायफळ घालून एकत्र करून घ्यावे. हाताने लाडू बांधता आले पाहिजे.
मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.
यात सुकलेल्या गुलाब पाकळ्या पण घालता येतात.
अक्षरशः अर्ध्या तासात होणारा झटपट नैवेद्य.
अगदी आरतीपूर्वी केला तरी छान सुटसुटीत खिरापत.

(Image :google)

सोप्पे रवा बेसन लाडू


साहित्य:
खरखरीत रवाळ बेसन १ वाटी, जाड रवा १ वाटी, पिठीसाखर अर्धी वाटी, बदाम काजू काप / आवडीने सुका मेवा तुपावर लालसर करून भरड पूड, तूप.
कृती
रवा बेसन एकत्र करून त्यात पातळ तूप आणि किंचित पाणी घालून घट्ट मुटके वळून घ्यावेत. कढईत थोडे तूप घालून हे मुटके खमंग लालसर करून घ्यावेत.
गॅस मंद हवा. मुटके गार झाले की फोडून, मिक्सरमधून कोरडी पूड करून घ्यावी. जाड वाटल्यास चाळून घ्यावी. त्यात बदाम काप / सुका मेवा वेलची पूड पिठीसाखर घालून कडकडीत तूप हळूहळू घालून लाडू बांधावेत. तूप एकदम ओतू नये. बेसन रवा भाजत बसावा लागत नाही. आणि खमंग चवदार लाडू पटकन तयार होतात.
वरून हवे तर वर्ख लावावा.

(Image :google)

अव्वल लाडू / पोहे लाडू

तामिळनाडूमध्ये जन्माष्टमी दिवशी हा प्रसाद होतो. मात्र, खिरापत म्हणून हे लाडू अगदी सोपे. चवीला उत्तम.
साहित्य
जाड पोहे १ वाटी, सुके खोबरे किस अर्धी वाटी, गूळ किसून पाव वाटी. तूप, वेलची, काजू.
कृती
पोहे कोरडे भाजून कुरकुरीत करून घ्यावेत. पोहे बाजूला काढून त्यात खोबरे किस पण गुलाबी करून घ्यावा, पोहे किस वेलची मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
पूड अगदी मुलायम हवी, खरबरीत नको. त्यातच गूळ घालून परत दोन फेरे घ्यावेत. थोड्या गुठळ्या दिसायला हव्यात. त्यात काजू तुकडे घालावेत.
थोडे तूप कडकडीत गरम करून ते या मिश्रणात ओतून हळूहळू एकत्र करून लाडू बांधावेत.
लाल पोहे घेतल्यास खमंग लागतात आणि रंग पण सुरेख येतो.

(Image :google)

फ्रूट हलवा

गणपतीसमोर प्रसाद म्हणून अनेक फळे ठेवली जातात. पाहुणे मंडळी पण दर्शनाला येताना फळे आणतात. इतकी फळे संपणे कठीण असते. अशा वेळी हलवा करून प्रसाद दाखवता येतो.
साहित्य
केळी, अंजीर, आंबा, चिकू जी फळे असतील ती शक्यतो संत्री / मोसंबी / पेरू नसावेत. सर्व फळे मिक्सरमधून प्यूरी करून घ्यावीत. नॉनस्टिक पॅन मध्ये थोडे तूप घालून हा पल्प घालावा आणि मंद आगीवर ढवळत राहावे. किंचित घट्ट होऊ लागले की, अंदाजाने साखर घालावी. फळे गोड असतात, त्याबेताने साखर घ्यावी. मंद आगीवर परत ढवळत राहावे. मिश्रण बाजूने आळू लागले की, वेलची पूड, काजू घालून ढवळून काढावे.
वेगळा प्रसाद तयार.

(Image :google)

उकड - खीर

उरलेली उकड व्यवस्थित मळून गोळे करून उकडून घ्यावी.
तूप गरम करून त्यात लवंग वेलची घालून हे गोळे किंचित लाल करून घ्यावे. थोडे पाणी, किसलेला गूळ घालून छोटी उकळी आणावी. आता नारळ दूध घालून पाच मिनिटे गॅसवर ठेवून काढावे.
उकडीत मीठ असते. त्यामुळे शक्यतो दूध वापरू नये. दूध हवे तर मग साखर घ्यावी. दूध आधी आटवून पण करता येते.

(Image : google)

अननस रायते

अनेकदा अननस दह्यात घातला की कडू लागतो. त्यासाठी अननस फोडींना साखर लावून मुरवत ठेवावे. निदान तासभर.
अथवा साखर पाण्यात शिजवावे.
दह्याचा चक्का करून मुलायम फेटून घ्यावे. त्यात आवडीने साखर घालून अननस फोडी घालून ढवळून लगेच वाढावे फार वेळ ठेवू नये.

(Image :google)

चिकू हलवा

अधिक पिकलेले चिकू बिया काढून तुकडे करून तुपावर परतून घ्यावे.
प्रसाद म्हणून ठेवलेले मावा मोदक / पेढे / बर्फी इत्यादी त्यात कुस्करून घालून थोडे चरचरू देऊन काढावे.
मोजून दहा मिनिटात तयार होतो. परत काही वाया जात नाही. फक्त लगेच संपवून टाकावे.

गोड खाऊन खाऊन लगेच कंटाळा यायला लागतो. गोडाऐवजी तिखट खिरापतही करता येतेच. त्यासाठी हे काही पदार्थ...

(Image :google)

नीवग्र्या

मोदकांची उकड बरेचदा उरते. त्यात आले, मिरची, मीठ, जिरे घालून चपटा आकार देऊन उकडून घ्यावी. वरून तूप सोडून खावे. कोकणातला हा अनेकांचा आवडता आणि पोटभरीचा पदार्थ.

(Image :google)

मनी कोळकट्टई

फोडणीची उकड जशी असते थोडी त्याच प्रकारची पण अधिक खुमासदार. उकड व्यवस्थित मळून त्यात आले, मिरची, जिरेपूड, मीठ, साखर घालून छोटे गोळे करून उकडून घ्यावेत. तेल/तूप गरम करून राई, हिंग, कढीलिंब, सुक्या मिरच्या आणि आवडतं असल्यास चणा, उडीद डाळ यांची फोडणी करून त्यात हे गोळे घालून परतावे आणि वरून ओले खोबरे कोथिंबीर घालून खायला घ्यावे. छान नाश्ता होतो.

(Image :google)

फ्रूट कोशिंबीर

गणपतीसमोर प्रसाद म्हणून अनेक फळे असतात. त्यातील जास्त पिकलेली फळे आवडीने हवी ती घ्यावी. दूध किंचित गरम करून ठेवावे. फळांचे तुकडे करून घ्यावेत. अंजीर, खजूर यांचेही बारीक तुकडे करावे. दुधात विरजण घालून ही फळे घालावीत आणि व्यवस्थित ढवळून सेट करायला ठेवावे.मधुर अशी कोशिंबीर जेवणाच्या वेळी तयार होते. तेवढा वेळ नसल्यास गोड दह्यात कालवून घ्यावे. गोडासाठी मध घालावा. साखर टाळावी. उपवास असणाऱ्या व्यक्तीसाठी खूप योग्य फराळ. वरून हवे तर अक्रोडचे तुकडे घालावेत.

(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: 10 Easy Sweets for Ganapati's Khirapati -traditional food for Ganpati Naivedya.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.