Join us  

पावसाळ्यात शिळी पोळी खायला नको वाटते? राहिलेल्या पोळ्यांचे करा २ हटके पदार्थ, ब्रेकफास्ट होईल झक्कास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 11:54 AM

2 Easy Different Recipes From Leftover Reties : शिळे वाटणार नाही आणि तरीही अतिशय चविष्ट लागतील असे हे पदार्थ झटपट होतात

पावसाळ्याच्या दिवसांत कधी कमी भूक लागते तर कधी पोळी खायला नको वाटते. काही वेळा पावसात अडकल्याने बाहेरच खाल्ले जाते. अशावेळी आपल्या नावच्या केलेल्या पोळ्या हमखास उरतात. या पोळ्या सकाळपर्यंत ठेवल्यावर शिळ्या होतात आणि पावसाळ्याच्या दिवसांत शिळे अन्न खायला नको वाटते. शिळी पोळी उरली की ती एकतर कडक करुन चहासोबत खाल्ली जाते नाहीतर फोडणीची पोळी आणि गूळ तूप पोळी हे तर अगदी ठरलेलेच. नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि वेगळे काहीतरी ट्राय करायचे असेल तर या शिळ्या पोळ्यांचे काही हटके पदार्थ करता येतात. शिळे वाटणार नाही आणि तरीही अतिशय चविष्ट लागतील असे हे पदार्थ झटपट होत असल्याने सकाळच्या घाईत फारसा वेळही जात नाही. पाहूयात हे हटके पदार्थ कोणते आणि ते कसे करायचे (2 Easy Different Recipes From Leftover Roties).

१. पोळीचे बारीक तुकडे करुन मिक्सरमध्ये त्याचा बारीक भुगा करुन घ्यायचा. 

२. यामध्ये अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घालून १० मिनीटांसाठी बाजूला ठेवावे.

३. यामध्ये १ मोठा साले काढून किसलेला बटाटा, कांद्याचे उभे बारीक काप, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

४. या मिश्रणात १ चमचा चिली फ्लेक्स, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १ चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ घालून हे सगळे हाताने चांगले एकजीव करुन घ्यावे. 

५. कढईमध्ये तेल घेऊन ते तापल्यावर याची खरपूस भजी तळून घ्यावीत आणि तळलेली मिरची किंवा हिरव्या चटणीसोबत ही भजी खावीत.

६. उरलेल्या पीठात थोडेसे पाणी घालून ते एकसारखे करावे आणि तव्यावर तेल घालून हेच पीठ कटलेटसारखे पसरुन घालावे. 

७. हे पॅनकेक किंवा कटलेट दोन्ही बाजूने तेलावर चांगले खरपूस भाजून घ्यावेत आणि डीशमध्ये घेऊन त्यावर हिरवी चटणी आणि सॉस घेऊन खावे. 

८. हे दोन्ही पदार्थ आपण शिळ्या पोळ्यांपासून केले आहेत हे घरातील मंडळींना कळणारही नाही. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.