भारतात हिरव्या मिरच्यांचा वापर अधिक होतो. महाराष्ट्रात तिखट खाण्याचे शौकीन गल्लोगल्लीत सापडतील. हिरव्या मिरच्यांशिवाय फोडणी, चाट अपुरे आहे. हिरव्या मिरच्यांमुळे पदार्थाचे स्वाद द्विगुणीत होते. मात्र, हिरव्या मिरच्यांना स्टोर करून ठेवणे कठीण जाते. हिरव्या मिरच्या लवकर लाल पडतात, काहींची चव लवकर बदलते. त्यामुळे आपण अधिक प्रमाणात मिरच्या साठवू शकत नाही.
घरात आपण थोडे - थोडे करून मिरच्या आणतो. मात्र, अचानक मिरच्या संपल्या की काय करावे हे सुचत नाही. पुन्हा बाजारात जाऊन मिरच्या आणाव्या लागतात. अशा स्थितीत एक ट्रिक मिरच्या स्टोर करण्यासाठी उपयुक्त पडेल. ही ट्रिक फॉलो केल्याने हिरव्या मिरच्या स्टोअर करणे सोपे जाईल. यासह ते खूप दिवस टिकतील.
टिश्यू पेपरचा करा असा वापर
हिरवी मिरची साठवण्यासाठी आपण टिश्यू पेपरची मदत घेऊ शकता. सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घ्या. आता एका भांड्यात थंड पाणी घ्या, या पाण्यात हिरव्या मिरच्या भिजवा. काही वेळानंतर हिरवी मिरची पाण्यातून काढा, त्यावरील देठ तोडून घ्या. यासह खराब हिरव्या मिरच्या काढून वेगळे करा. आता हिरव्या मिरच्या सुकण्यासाठी ठेवा. मिरच्या सुकल्यानंतर टिश्यू पेपरमध्ये ठेवा आणि चांगले गुंडाळा. यामुळे मिरच्या महिनाभर ताज्या आणि हिरव्या राहतील.
हिरव्या मिरचीची चटणी बनवा
हिरव्या मिरच्या साठवण्याचा सोपा उपाय म्हणजे त्याची चटणी बनवणे. हिरव्या मिरच्या पाण्यात टाकून धुवा. त्यानंतर त्याचे देठ काढा. . यानंतर हिरव्या मिरच्या ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा. पेस्ट बनवत असताना पाणी घालू नये. पेस्ट तयार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे हिरव्या मिरचीची पेस्ट जास्त काळ टिकेल.