डाळ खिचडी हा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. मूगाच्या डाळीची खिचडी ही अनेक घरांत रात्रीच्या वेळी आवर्जून केला जाणारा पदार्थ. रात्रीच्या वेळी झटपट होणारा आणि हलका आहार असल्याने आठवड्यातून एकदा तरी खिचडीचा बेत केला जातोच. पण या खिचडी खऱ्या अर्थाने शरीराला पोषण देणारी असते.भाताचा प्रकार असला तरी चविष्ट, पौष्टीक आणि करायला सोपा असल्याने खिचडी करण्याला प्राधान्य दिले जाते. यातील मूगाची डाळ प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असल्याने ती डाळ आणि शक्य असतील तर भाज्या घातल्यास खिचडी पौष्टीक होते. ही डाळ हिरव्या सालांची असेल तर त्यातून नेहमीच्या डाळीपेक्षा थोडी जास्त प्रमाणात प्रथिने मिळतात (2 Tips to make moong dal khichadi more tasty and healthy).
लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांनाच खिचडी आवडत असल्याने आवडीने खाल्ली जाते. लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी किंवा ज्यांना पोटाच्या समस्या असतील त्यांना आहारतज्ज्ञ मूगाच्या डाळीची खिचडी खाण्याचा सल्ला देतात. यासोबत पापड, लोणचं, कढी किंवा ताक असेल तर जेवणाची रंगत आणखीनच वाढते. या नेहमीच्याच खिचडीची चव वाढवायची असेल तर त्यासाठी आज आपण २ सोप्या टिप्स पाहणार आहोत. या टिप्समुळे खिचडी चविष्ट होते आणि त्याचा पौष्टीकपणाही वाढण्यास मदत होते. पाहूयात या टिप्स कोणत्या.
१. मूगाच्या डाळीची खिचडी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेळी असते. पण नेहमीपेक्षा थोडी वेगळी आणि चविष्ट खिचडी करायची असेल तर यामध्ये मूगाच्या डाळीसोबतच तूर, मसूर अशा इतर डाळींचाही वापर करायला हवा. तसंच नुसत्या डाळ-तांदळाची खिचडी करण्याऐवजी यात भाज्या घातल्यास मुलांच्या पोटात भाज्या जाण्यास मदत होते. घरात उपलब्ध असतील अशा पालक, मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, गाजर, लाल भोपळा, दुधी भोपळा, बीट, मटार, फरसबी अशा कोणत्याही भाज्या आपण घालू शकतो. यामुळे भाज्याही पोटात जातात आणि खिचडीचे पोषण वाढण्यास मदत होते.
२. खिचडी नेहमीपेक्षा आसट म्हणजेच जास्त मऊ-पातळसर केल्यास ती खायलाही छान वाटते आणि गरमागरम छान लागते. या खिचडीची चव आणखी वाढवायची असेल तर आपण त्यामध्ये लसूण, ओलं खोबरं यांचा आवर्जून वापर करु शकतो. हे दोन्ही मिक्सरमध्ये वाटून फोडणीत घातले तरी खिचडीला खूपच छान स्वाद येतो. नाहीतर खिचडी शिजवून घेऊन वरुन त्याला लसूण, लाल मिरची, कडीपत्ता असा वरुन छान तडका दिला तरी ही खिचडी हॉटेलस्टाईल अतिशय चविष्ट लागते. यावर वरुन ओलं खोबरं, कोथिंबीर घातल्यास ही आसटसर खिचडी खाऊन मन तृप्त नाही झाले तरच नवल.