बाजारांत किंवा फळं गाड्यांवर लालचुटुक सफरचंद रचलेले पाहून ते खरेदी करण्याचा मोह आपल्याला होतो. आपण कित्येकवेळा बाजारांतून लालचुटुक सफरचंद दिसली म्हणून विकत आणतो. परंतु ही सफरचंद लालचुटुक दिसण्यासाठी, किंवा त्यांना एक प्रकारची चकाकी येण्यासाठी त्यांवर वॅक्सचा (मेणाचा) थर दिला जातो. सफरचंदांवर वॅक्सचा थर दिल्याने त्यांचा लाल रंग अधिकच खुलून दिसतो. सफरचंद विकण्यासाठी किंवा त्यांचा जास्तीत जास्त खप व्हावा यासाठी त्यांवर वॅक्सचा थर चढविला जातो. मेणाच्या पातळ थरामुळे सफरचंदाच्या अंतर्भागातील आर्द्रता अगदी उन्हाळ्यातसुद्धा उडून जात नाही व त्यामुळे सफरचंदे लवकर विक्रीतून बाद होत नाहीत. याच मुख्य कारणांमुळे सफरचंदांवर विक्रेते वॅक्सचा थर चढवितात. सफरचंद छान चकचकीत दिसावे, बघणाऱ्या प्रत्येकाला ते घ्यावेसे वाटावे या हेतूने त्यावर वॅक्सचा थर लावला जातो.
असं म्हणतात की, “An Apple a Day Keeps the Doctor Away” दररोज सफरचंद खाण्यामुळे अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. थोडक्यात तुमचे आरोग्य तंदरुस्त होते आणि शरीराला पुरेसे पोषण मिळते. असे असले तरीही वॅक्सचा लेअर असणारी ही सफरचंद दिसायला कितीही सुंदर असली तरी आरोग्यासाठी ती धोकादायक ठरु शकतात. आपण कितीही पाण्याने हे फळ धुतलं तरी मेण निघत नाही आणि ते खाल्ल्यानंतर थेट आपल्या पोटात जातं. आजकाल अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. फळं आणि भाज्या टिकवण्यासाठी त्यांच्यावर केमिकल्सचा मारा केला जातो. कधी कधी कीटकनाशके मारलेली असतात. सफरचंदावर ती टिकण्यासाठी मेणाचा थर लावला जातो. त्यामुळे अनेक लोक सफरचंद सोलून खाणं योग्य समजतात. परंतु असे केल्याने सफरचंदाच्या सालीत असणारे आवश्यक पोषक घटक आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे सफरचंदाच्या सालींवर असणारा वॅक्सचा धोका टाळण्यासाठी ते सोलून खाण्यापेक्षा, वॅक्सचा थर घालविण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात(2 Ways to Clean Wax, Pesticides, and Bacteria from Apples).
सफरचंदावरील मेणाचा थर कसा काढावा ?
पर्याय १ :-
१. एका मोठ्या भांड्यात ४ कप हलके गरम केलेले पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून मीठ, २ टेबलस्पून खायचा सोडा घालून ते पाण्यांत व्यवस्थित विरघळवून घ्यावे.
२. आता या पाण्याच्या मिश्रणांत सफरचंद १५ ते ३० मिनिटे भिजत ठेवावीत.
३. १५ ते ३० मिनिटांनंतर एका स्वच्छ टूथब्रशच्या मदतीने सफरचंदांवर चढविलेला वॅक्सचा थर हलक्या हातांनी घासून घ्यावा.
४. परत त्याच पाण्याच्या मिश्रणांत ही सफरचंद २ ते ३ मिनिटे ठेवून द्या.
५. आता ही सफरचंद या पाण्याच्या मिश्रणातून काढून स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावीत.
६. सफरचंद स्वच्छ सुती कापडांनी पुसून घ्यावीत.
पर्याय २ :-
१. एका भांड्यात हलके गरम पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून लिंबूचा रस आणि खाण्याचा सोडा घालावा. या पाण्यांत सफरचंद १५ ते ३० मिनिटे भिजत ठेवावी. (बाकी कृती पर्याय एक प्रमाणेच करायची आहे.)
गरम पाण्याने सर्व प्रकारचे मेण वितळते, फळांमधून रसायनेही बाहेर पडतात. सफरचंद खाताना ते सालीसकट खाणंच गरजेचं असत. मात्र त्यावरील मेणाचा थर आणि कीटकनाशके जर आपल्या पोटात गेली तर आरोग्य सुधारण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता अधिक असते. यासाठी या सोप्या ट्रिक वापरुन आपण बाजारांतून विकत आणलेलं सफरचंद स्वच्छ करु शकतो. ज्यामुळे सफरचंदावरील जीवजंतू आणि मेणाचा थर निघून जाईल आणि सफरचंद सालीसकट खाण्यासाठी योग्य होईल.