Join us  

कॉफीत हळद घालून पिण्याचे ३ फायदे! कॉफीत हळद हे जरा नवीन असले तरी आहे उपयोगी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 7:38 PM

Turmeric Coffee कॉफीमध्ये हळद मिसळून पिण्याचे फायदे आहेत अनेक, जाणून घ्या हळदीची कॉफी कशी बनवायची..

सायंकाळच्या ६ नंतर बहुतांश लोकांना कॉफीची तलब लागते. कॉफी असो या चहा, हे गरम पेय प्रत्येक जण आवडीने पितात. मात्र, डॉक्टर किंवा आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार, कॉफी किंवा चहा जास्त पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. बरेच जण सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पितात. असे केल्याने शरीरात विविध आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. आपल्याला दूध आणि हळद हे पेय माहीतच असेल. आपल्या शरीरासाठी ते खूप उपयुक्त मानले जाते. आपण जर कॉफी प्रेमी असाल तर, कॉफीमध्ये हळद टाकून प्या. याच्या सेवनाने शरीराला पौष्टिक तत्वे मिळतील.

हळदीची कॉफी सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. हे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरीजपासून समृद्ध आहे. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट गुणधर्म यकृताला डिटॉक्स करण्याचे काम करतात. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. चला तर मग हळदीची कॉफी बनवण्याची पद्धत आणि फायदे जाणून घेऊया.

हळद कॉफी बनवण्याची पद्धत

हळदीची कॉफी बनवण्यासाठी आधी कॉफी फेटून घ्या, नंतर एका भांड्यात दूध घ्या. त्यात थोडी हळद घालून गरम करा. जेव्हा कॉफी चांगली फेटली जाईल तेव्हा त्यात गरम हळदीचे दूध घालून मिक्स करा. अशा प्रकारे हळदीची कॉफी रेडी.

अॅसिडिटी कमी करण्यास मदत

हळदीची कॉफी आम्लता पूर्णपणे कमी करते. हे अॅसिडिक पीएच कमी करते आणि अॅसिडिटीची समस्या कायमची दूर करते. या कॉफीमुळे हळदीचे थेट फायदे शरीराला मिळू शकतात.

हाडे आणि सांध्याच्या समस्या होईल कमी

कॉफीमध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म, हाडे आणि सांध्याच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. ज्यांच्या हाडे किंवा सांधे दुखत असतील त्यांनी कॉफी प्यावी. त्यांना या कॉफीमुळे नक्की आराम मिळेल.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते

हळदीची कॉफी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यासह अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य