Lokmat Sakhi >Food > झणझणीत मस्त पिठलं करण्याच्या 3 चविष्ट रेसिपी, पिठलं तेच पण चव अशी की..

झणझणीत मस्त पिठलं करण्याच्या 3 चविष्ट रेसिपी, पिठलं तेच पण चव अशी की..

रात्रीच्या वेळी भाजी आणि आमटी अशा दोन गोष्टी न करता झटपट एकच काहीतरी करायचं असेल तेव्हा पिठल्याचा उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 05:25 PM2022-05-23T17:25:21+5:302022-05-23T17:32:49+5:30

रात्रीच्या वेळी भाजी आणि आमटी अशा दोन गोष्टी न करता झटपट एकच काहीतरी करायचं असेल तेव्हा पिठल्याचा उत्तम पर्याय

3 delicious recipes for making Pithala, it is the same but it tastes like .. | झणझणीत मस्त पिठलं करण्याच्या 3 चविष्ट रेसिपी, पिठलं तेच पण चव अशी की..

झणझणीत मस्त पिठलं करण्याच्या 3 चविष्ट रेसिपी, पिठलं तेच पण चव अशी की..

Highlightsज्यांना झणझणीत खायला आवडते त्यांच्यासाठी रावण पिठलं हा उत्तम पर्याय आहे. झटपट होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो...

पिठलं असं नुसतं म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो तव्यावर केलेला झुणका असो किंवा कांदा घालून केलेलं पातळ पिठलं. ऐनवेळी घरात भाजी नसेल की पोळी किंवा भाकरीशी आणि भाताशीही खायला मस्त लागणारं हे पिठलं म्हणजे मराठी घरांमधील एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय. डाळीच्या पीठापासून अगदी झटपट केलं जाणारं आणि तरीही चविष्ट असा हा पदार्थ अनेकांना जीव की प्राण असतो. आपल्याकडे एखादा पदार्थ करण्याची पद्धत ही मैलागणीक बदलते. त्याचप्रमाणे पिठलंही महाराष्ट्रात प्रत्येक गावात वेगळ्या पद्धतीने केलं जातं. ते कसंही केलं तरी छानच लागतं यात शंका नाही. पिठलं हा सर्वमान्य शब्द असला तरी काही भागात याला झुणका, काही भागात बेसन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. रात्रीच्या वेळी भाजी आणि आमटी अशा दोन गोष्टी न करता झटपट एकच काहीतरी करायचं असेल किंवा गावाहून आल्यावर पटकन घरात भाजी नसताना काय करावं असा प्रश्न असेल तर होणारा हा झक्कास पदार्थ करण्याच्या तीन आगळ्यावेगळ्या रेसिपी आज आपण पाहणार आहोत. 

(Image : Google)
(Image : Google)

१. गाठीचं पिठलं

आता गाठींचं पिठलं म्हणजे काय असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडू शकतो. तर डाळीच्या पिठाच्या गाठी ज्यामध्ये राहतात ते पिठलं. तर यामध्ये आपण ज्याप्रमाणे फोडणी घालतो तशी फोडणी घालून घ्यायची. आपल्या आवडीनुसार फोडणीमध्ये लसूण, कांदा, मिरची, कडिपत्ता जे आवडते ते घालायचे आणि फोडणी झाली की त्यामध्ये पाणी घालायचे. पाण्यात मीठ, तिखट असे बाकी जिन्नस घालायचे. या पाण्याला चांगली उकळी आली की वरुन डाळीचे पीठ हातानी मोकळे करुन या उकळत्या पाण्यात घालायचे. वरुन पीठ घातल्याने त्याच्या छान जाडसर गाठी होतात आणि या गाठींसकट हे पिठलं शिजतं. भाकरी किंवा भातासोबत हे पिठलं अतिशय मस्त लागतं. 

(Image : Google)
(Image : Google)

२. वाटणाचं पिठलं

भिजवलेले दाणे, लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, कोथिंबीर या सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यात एकत्र करुन त्याचे छान वाटण करुन घ्यायचे. पिठल्यासाठी फोडणी घातल्यावर त्यामध्ये हे वाटण घालून चांगले परतून घ्यायचे. त्यामध्ये पाण्यात एकत्र केलेले पीठ घालून वरुन पाणी आणि मीठ घालून पिठलं चांगलं उकळू द्यायचं. लसूण, दाणे आणि मिरची कोथिंबीर याचा एक अतिशय वेगळा आणि सुंदर स्वाद या पिठल्याला लागतो आणि ते नेहमीपेक्षा वेगळे आणि चविष्ट लागते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. रावण पिठलं

यासाठी जितकं डाळीचं पीठ तितकंच तेल आणि तितकंच तिखट असं प्रमाण घ्यायचे. असं असलं तरी आपण जास्त तिखट खात नसल्याने तिखट आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे. कढईमध्ये एक वाटी तेल घालून त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करुन घ्यायची. फोडणी झाली की त्यामध्ये कांदा आणि लसूण आवडीप्रमाणे घालायचा. तो चांगला गुलाबी झाला की त्यामध्ये वाटीभर तिखट घालून ते परतून घ्यायचे. तिखट घातल्यावर लगेचच यामध्ये बेसन घालायचे आणि सगळे एकजीव करुन घ्यायचे. तेलामुळे बेसन चांगले परतले जाते. यामध्ये मीठ आणि साधारण एक ते दिड वाटी पाणी घालून हे पिठलं चांगलं शिजू द्यायचे. हे पिठलं फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही असे मध्यम स्वरुपाचे असते. ज्यांना झणझणीत खायला आवडते त्यांच्यासाठी रावण पिठलं हा उत्तम पर्याय आहे. 

Web Title: 3 delicious recipes for making Pithala, it is the same but it tastes like ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.