Join us  

सर्दी-तापाने तोंडाची चव गेली, अन्नच नको वाटते? ३ चविष्ट पदार्थांचे सोपे पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 12:37 PM

3 Diet Options If You Have Cold and Cough : शरीराची ताकद भरुन काढणारे, घशाला आराम देणारे असे पदार्थ आहारात आवर्जून घ्यायला हवेत.

सध्या वातावरणात वेगाने बदल होत असल्याने सर्दी, ताप, घसादुखी, कफ यांसारख्या रुग्णांचे प्रमाण ठिकठिकाणी वाढल्याचे दिसते. एकदा सर्दी-कफ झाला की आपली अन्नावरची इच्छा उडते. ताप असेल तर आपल्याला सगळं कडू लागतं आणि काहीच खावसं किंवा प्यावसं वाटत नाही. त्यामुळे शरीरात ताकद नसते, सतत ग्लानी येते आणि नुसतं पडून राहावसं वाटतं. अशात आपण अन्न घेतलं नाही तर अशक्तपणा वाढत जातो आणि मग आजारातून बाहेर यायला जास्त वेळ लागतो. मात्र अशावेळी शरीराची ताकद भरुन काढणारे, घशाला आराम देणारे असे पदार्थ आहारात आवर्जून घ्यायला हवेत. त्यामुळे आजारपणातून लवकर बाहेर येण्यास मदत होईल (3 Diet Options If You Have Cold and Cough). 

(Image : Google)

१. आळणी भात किंवा भाताची पेज

आळणी भात म्हणजे तांदूळ भाजून मिक्सरमध्ये बारीक करावा. एका पातेल्यात नेहमीपेक्षा जास्त पाणी घालून शिजत ठेवावा. त्यामध्ये ओवा, जीरं, मीठ घालून तो चांगला शिजवावा. बारीक केलेला असल्याने आणि पाणी जास्त असल्याने हा भात लवकर शिजतो. यामध्ये तूप आणि मेतकूट घालून हा गरमागरम भात खाल्ल्यास तोंडाला चव येते आणि घशालाही हा गरम भात बरा वाटतो. पातळ असल्याने ताकद भरुन येण्यासही याचा चांगला उपयोग होतो.

(Image : Google)

२.धिरडे

ताप असताना आपल्याला पोळी किंवा भाकरी खायची इच्छा होत नाही. अशावेळी तांदूळ आणि डाळींचे धिरडे करुन खाल्ल्यास तोंडाला चव येते आणि गरम खाल्ल्याने खाण्याची इच्छाही होते. यासोबत खोबऱ्याची किंवा दाण्याची चटणीही चांगली लागते. 

(Image : Google)

३. उपमा किंवा दलिया 

उपमा पचायला हलका असतो, त्यामुळे नेहमीचा रवा किंवा गव्हाचा रवा याचा गरम उपमा करता येतो. यामध्ये उडदाची डाळ, हरभरा डाळ आणि गाजर, मटार, फ्लॉवर अशा भाज्या घातल्यास त्याची पौष्टीकता वाढण्यास मदत होते. उपमा पोटभरीचा असल्याने ताप असताना आलं, लिंबू घालून घालून दिल्यास तोंडाला चव येते आणि पोटही भरते. 

(Image : Google)

टॅग्स :अन्नपाककृतीआरोग्यहेल्थ टिप्स