Join us  

आई, नाश्त्याला काहीतरी भारी कर! म्हणणाऱ्या मुलांसाठी करा ३ भन्नाट पदार्थ, नाश्ता सुपरकुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2023 9:25 AM

3 Different Breakfast Recipes for Summer : ब्रेकफास्टला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर करता येतील असे चविष्ट पर्याय...

ब्रेकफास्ट ही दिवसभरातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर दिवसा ऊन्हाचा कडाका जास्त असताना आपल्याला अन्न नको होते. अशावेळी सकाळी ऊन पडायच्या आत आपण पोटभर ब्रेकफास्ट केला असेल तर आपल्याला दिवसभर भूक भूक होत नाही. नाश्ता म्हटला की आपण साधारणपणे नेहमी पोहे किंवा उपमा करतो. पण सारखं तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं हवं असतं. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत पाणी पाणी झाल्याने तोंडाला  विशेष चव नसते. अशावेळी ब्रेकफास्टसाठी थोडे वेगळे काही पदार्थ केले तर घरातील सगळेच खूश होतात. विशेष म्हणजे हे पदार्थ फक्त पोटभरीचे नसून त्यातून शरीराला भरपूर पोषण मिळत असल्याने आरोग्यासाठीही ते उत्तम असतात. पाहूयात हे पदार्थ कोणते आणि ते कसे करायचे (3 Different Breakfast Recipes for Summer)...

१. दलियाची हटके रेसिपी

पाव कप दलिया आणि पाव कप मूगाची डाळ एकत्र करुन स्वच्छ धुवायची आणि कुकरमध्ये ४ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची. त्यानंतर हा शिजवलेला दलिया पूर्ण गार होऊ द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये १ वाटी दही, २ आंब्याच्या फोडी किंवा आपल्या आवडीचे कोणतेही फळ घालायचे. १ चमचा पिनट बटर आणि १ चमचा भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया घालायच्या. ही रेसिपी आदल्या दिवशी रात्री करुन फ्रिजमध्ये ठेवल्यास सकाळी झटपट नाश्ता करता येतो. 

२. राजमा आणि मँगो सॅलेड 

१ वाटी भिजवलेले आणि शिजवलेले राजमा घ्या. त्यात एका आंब्याच्या फोडी घाला. त्यात अर्धा कांदा आणि अर्ध्या काकडीचे तुकडे घाला. त्यात ५ ते ६ पुदिन्याची पाने घाला. हे सगळे चांगले एकत्र करुन खायला घ्या. राजमा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असल्याने शरीराचे पोषण होण्यास मदत होईल. 

३. सिझनल फ्रूट मुसली

अर्ध्या आंब्याचे तुकडे, अर्ध्या डाळींबाचे दाणे, २ चमचे भिजवलेल्या चिया सीडस, १ कप बदामाचे दूध, ४ ते ५ भिजवलेले काजू आणि बदाम, २ चमचे मुसली सगळे एकत्र करावे आणि खावे. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.