Join us  

गौरी-गणपतीसमोर नैवैद्य म्हणून ठेवलेल्या भरपूर फळांचं करायचं काय? करा ३ उत्तम पदार्थ, फळंही संपतील चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 12:20 PM

3 Easy Ganpati Special Fruit Recipes : फळांचे घरातील सगळ्यांना आवडतील आणि चविष्ट होतील असे पदार्थ...

गौरी आणि गणपतीसमोर आपण ५ किंवा कधी जास्तीची फळंही नैवेद्य म्हणून ठेवतो. अनेकदा दर्शनाला येणारे पाहुणेही फळं घेऊन येतात. एरवी आपण आवर्जून फळं खातो पण या दिवसांत आधीच इतकं गोड खाणं होतं की मुद्दाम फळं खाल्ली जात नाहीत. तसंच गौरी-गणपतीसमोर ठेवलेली असल्याने ही फळं जास्त पिकून जातात. ही पिकलेली फळं खायला अनेकदा आपल्याला नको वाटते. अशावेळी या फळांचे काय करायचे असा प्रश्न पडतो. नेहमीपेक्षा दुप्पट दराने आणलेली ही फळं देवाचा प्रसाद असल्याने वायाही घालवता येत नाहीत. अशावेळी या फळांचे काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. तर या फळांचे घरातील सगळ्यांना आवडतील आणि चविष्ट होतील असे कोणते ३ पदार्थ करता येतील त्याचे पर्याय पाहूया (3 Easy Ganpati Special Fruit Recipes)...

१. फ्रूटसॅलेड

फ्रूटसॅलेड किंवा फ्रूट कस्टर्ड हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. सगळ्या फळांच्या बारीक फोडी करुन त्यामध्ये मिल्क कस्टर्ड किंवा मिल्क पावडर, साय आणि दूध, फ्रेश क्रिम घातलं तर मस्त गोडाचा पदार्थ तयार होतो. गौरी आणि गणपतीपुढे असणारी पपई, डाळींब, मोसंबी, केळी, सफरचंद, चिकू अशी सगळी फळं यासाठी वापरता येतात. आवश्यकतेनुसार यामध्ये साखर, सुकामेवा घालू शकतो.

२. फ्रूट कस्टर्ड

मारीची किंवा अन्य कोणत्याही बिस्कीटांचा चुरा करायचा, साय आणि दूध चांगले फेटून घ्यायचे तसेच फळांच्या बारीक फोडी करुन त्या साखरेच्या पाकात घालून त्याची जेली करायची. या सगळ्याचे एकमेकांवर थर लावायचे. बिस्कीटांचा चुरा त्यावर दूध आणि सायीचा थर आणि त्यावर फळांची जेली असे साधारण ३ वेळा लावले तर त्याचे मस्त फ्रूट कस्टर्ड तयार होते. 

(Image : Google)

३. फ्रूट जेली

गर असलेल्या गोडरस किंवा आंबट अशा वेगवेगळ्या चवीच्या फळांची एकत्र फ्रूट जेली करता येऊ शकते. अनेकदा आपण मुलांना पोळी किंवा ब्रेडसोबत विकतचे जॅम देतो. यामध्ये प्रिझर्व्हेटीवचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. पण त्यापेक्षा घरच्या घरी फळांचा गर काढून, साखरेचा पाक आणि वेलची पूड, केशर असे घालून जेली करुन ठेवली तर ती पोळी किंवा ब्रेडसोबत मुलांना देता येते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीफळेगणेशोत्सवकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.